Tuesday 16 April 2024

दोन अति लघुकथा..
देश पारतंत्र्यात असताना तो स्वातंत्र होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशभक्त सेनानी असणाऱ्या,हृदयाची जटिल शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या 90 वर्षाच्या वडिलांना टॅक्सी मधून घेऊन जाणारा मुलगा टॅक्सीवाल्याला विनंती करत होता की हळू आवाजात गाणी वाजवा परंतु टॅक्सीतील इतर प्रवाशांसह टॅक्सी ड्रायव्हर यांची दोन विरुद्ध तीन अशी मेजॉरिटी असल्यामुळे शेवटी जोरात गाणी वाजवण्याचा निर्णय कायम झाला आणि कर्णकर्कश संगीताच्या बिट्स चालू राहिल्यात आणि लोकशाहीवादी असणाऱ्या आजोबांच्या बिट्स कायमच्या बंद झाल्या.....
मताधिक्याने झालेल्या निर्णयाच तात्पर्य वाचकांनी ठरवावं की,मानवतावादी विचार महत्त्वाचा की उन्मत्त बहुसंख्यीय भावनाहीन मताधिक्य...
आटपाट नगर होते प्रचंड संख्येने उपस्थित भाविकांची मिरवणूक निघाली होती लोक मोठ्या व्यक्तीभावाने त्यात नाचत होते परंतु मिरवणुकीत सुमधुर गाण्यांच्या ऐवजी कर्णकर्कश घोषणांसह मिरवणूक सुरू होती. अबाल वृद्धांसह विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत होता पण बोलायला कोणी तयार नव्हत. मिरवणुकीतील एका सहृदयी (?)व्यक्तीच्या हे लक्षात आले परंतु बहुसंख्य लोकांची इच्छा मिरवणूक मोठ्या आवाजातच निघाली पाहिजे अशी असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला परंतु असे असले तरी मिरवणुकीतून मात्र बाहेर न पडता मिरवणुकीचाच एक भाग होऊन ती व्यक्तीही नाचू लागली.
आता मिरवणुकीतला तो खरा प्रश्नांकित सह्रदयी मीच असं मिरवणुकीतील प्रत्येकाला वाटत असेल तर नवलच.....
(सदर कथा या काल्पनिक असून त्याचा कोणत्याही घटनेशी तसेच कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही तो तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

Thursday 11 April 2024

 नामस्मरणाचा रोग - पु. ल. देशपांडे

जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेवायचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल. वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल.


फुले मानायचे म्हणजे पूर्वजन्म आणि कर्मसिद्धांत ही दरिद्री जनतेने दारिद्र्याविरुद्ध बंड करून उठू नये, म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे, या श्रद्धेने सर्वकाही आपोआप चांगले होईल, ही भावना टाकून द्यावी लागेल. `स्तियो वैश्यास्तथाशूद्रा:' अशा प्रकारच्या `जन्माने ब्राह्मण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' असल्या माणसामाणसात भेद करणार्‍या गीतेसारख्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथही काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत, असेच मानून वाचावे लागतील.


शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री - पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल.


स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये. अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे. कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.


एकदा नामस्मरणाच्या सोप्या साधनाने जन्मजन्मांतरीच्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात, हे भाबड्या जनसमुदायाच्या मनावर बिंबले किंवा बिंबवीत राहिले की, या जन्मी हवी तेवढी पापे करावी. त्यातूनच मग कागदावर `लाख वेळा `श्रीराम जयराम' लिहा, म्हणजे सर्व आधीव्याधी नष्ट होतील', हे सांगणारे महापुरुष आणि ते ऐकणारे महाभाग निर्माण होतात. ज्या देशात दुधाच्या थेंबाथेंबासाठी हजारो अर्भके आसुसलेली आहेत, तेथे दगडी मूर्तीवर जेव्हा दुधाच्या कासंड्याच्या कासंड्या अभिषेकाच्या नावाने उपड्या केल्या जातात आणि हा प्रकार राज्यकर्त्यांपासून सगळे जण निमूटपणे पहातात, नव्हे असल्या गोष्टीचे कौतुकही करतात, त्या वेळी ज्योतिबा फुले हे नाव उच्चारण्याचादेखील अधिकार आपण गमावून बसलो आहोत, असे वाटते.


एकीकडे रस्ते, चौक, विद्यालये, विद्यापिठे, वाचनालये, मंडळे अशा ठिकाणी ज्योतिबांचा नामघोष आणि दुसरीकडे पंढरपूरला विठोबाची मंत्र्यांकडून भटजीबुवांच्या दिग्दर्शनाखाली साग्रसंगीत पूजा. त्यातले खरे कुठले समजायचे आणि नाटक कुठले समजायचे ? ज्या पूजेअर्चेविरुद्ध आणि भटजीबुवांच्या संस्कृत पोपटपंचीविरुद्ध फुले बंड करून उठले, त्यांच्या पुतळयांची उद्घाटने करणारे नेते सरकारी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी तसल्या भटजीच्या पुढे पूजेला बसलेले दिसतात. कुठल्यातरी दगडापुढे नारळ फोडतांना किंवा शेंदूर लावतांना घेतलेले मंत्र्यांचेच, नव्हे तर शिक्षणसंस्थांचे कुलगुरु आणि कुलपती यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांत झळकत असतात. अशा वेळी एकच प्रश्‍न मनापुढे उभा रहातो - आपण कुणाला फसवत आहोत ? ज्योतिबांना ? स्वत:ला ? कि नामस्मरणातच सर्वकाही आले असे मानणार्‍या जनतेला ? ज्योतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल, तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल.


एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचीहि देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्‍यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू !


एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मुळ विचार दुर टाकता येतात. जसे स्वच्छता हा मु्ळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे. देव केला कि देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.


- पु.ल. देशपांडे

( सामना, २५ नोव्हेंबर १९९० )




Sunday 7 April 2024

विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून,भाकड अवैज्ञानिक प्रवचनांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो.
विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे म्हणजे ते ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटनेकडे का? कोठे ? कसे ? अशा जिज्ञासा वृत्तीने बघतील आणि विवेकाने जाणून घेतील.
ग्रहण समज गैरसमज विद्यार्थ्यांना का? कोठे ? कसे ? अशा पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक जिज्ञासेला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून, विवेकाने स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, मग प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमात ग्रहणाचा पाठ असो किंवा नसो.
विविध वैज्ञानिक प्रयोग आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून ग्रहणांसह सर्वाच घटनांविषयी विद्यार्थ्यांत कार्यकारणभाव समजून घेणे वाढेल आणि गैरसमज दूर होतील.

Saturday 6 April 2024

माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतील बरीचशी पानं आणि विविध विचार मंचावरील मतानुसार सध्याच्या राजकीय सामाजिक विषयांची चिंता अधिक आहे.
भारतीय लोकशाही अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सजग राहण्याची कायमच गरज असते जी सध्याच्या काळात सर्वाधिक आहे असं वाटतं या कारणामुळे अनेक ठिकाणी ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला गेला.काही धर्मांध लोकांनी टीकाही केली परंतु सप्रमाण स्पष्टीकरण दिल्यामुळे काही शांत झाले आणि काही अधिक उग्र.
आता माझ्या पाठीशी किती लोक आहे याहीपेक्षा महत्त्वाचा हे आहे की येणाऱ्या पिढ्यांना, माझ्या नातवांना या गोष्टीचा अभिमान नक्की असेल की आमचे पूर्वज, आमचे आजोबा हे ज्या वेळेला आग लागली होती त्यावेळेला आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये होते.या देशाला संविधान आणि लोकशाही वाचवण्याची सर्वाधिक गरज आज आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, समता स्वतंत्रता बंधू भावाची सर्वाधिक गरज आज आहे. आता या कामात जो सोबत येईल त्याच्यासह आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय अनेक सहृदयी व्यक्तींसह माझेही कार्य सुरूच राहील....
अधिक अभ्यासू होऊ या
अधिक वाचते हो या.
चिकित्सकपणे अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचे म्हणणे तरी ऐकून घेऊया, नाही पटल्यास सोडून देऊयात....
Courtesy Image by Htc Erl from Pixabay

Wednesday 3 April 2024

एका एकत्र कुटुंबात आजीने खूप रुचकर स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता परिवारात 10 शाळकरी मुलं होती त्यापैकी फक्त तीन मुलांनीच व्यवस्थित जेवण केले.
आजीने सर्व मुलांना आग्रहाने वाढले परंतु उरलेल्या सात मुलांना भूक नव्हती ,खायची इच्छाच होत नव्हती.आजी त्यांना प्रेमाने भरवायला देखील तयार होती आणि आजोबा मात्र आजी वर चिडले आणि आजीने बनवलेला स्वयंपाक आणि घेतलेली मेहनत याचा कुठलाही विचार न करता आजीलाच उलट दोष देऊ लागले.
आजी म्हणाली तुम्ही स्वादिष्ट रुचकर आणि सकस आहार मेहनतीने आणि प्रेमाने बनवू शकतात, खाणाऱ्यांसाठी ताट तयार करून देऊ शकतो.खूप काळजी आणि प्रेम म्हणून तोंडात घासही भरून देऊ शकतो परंतु तो आनंदाने ग्रहण करून,चावून पचवण्याचं काम मात्र मुलांना कराव लागेल अर्थात हे सगळं तेव्हा ज्या वेळेला मुलांमध्ये भूक असेल भूकच नसल्यास ते कसे खाणार.
आजोबांचं जेवण झालं होतं तरीही आजीने बनवलेले एक दोन पदार्थ आजोबांनी मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्यांना शाळेत विद्यादानाचं काम केलेल्या आजीचं म्हणणं पटलं मग आजी म्हणाली कदाचित माझं काही चुकत असेल म्हणून उद्यापासून तुम्ही स्वयंपाक करा आजोबा घाबरल्या आणि ओशाळलेल्या चेहऱ्याने खिडकीतून बाहेर आकाशात चंद्र शोधू लागले... हे माहीत असताना की आज अमावस्या आहे..
ज्ञानांर्जनाच आणि शिकण्याची भूकच नसल्यास शिकणार काय...?

Saturday 23 March 2024

प्रिय नातवंडांनो
आज शहीद दिवस त्यानिमित्त महान क्रांतिकारकशहीद भगतसिंग यांनी ५,६ ऑक्टोबर १९३० रोजी लाहोरच्या तुरुंगात लिहिलेल्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर २७ सप्टेंबर १९३१ रोजी लाहोरच्या 'द पीपल' या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या 'Why am I an Atheist' अर्थात 'मी नास्तिक का आहे' या निबंध लेखाच्या रूपांतरित झालेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात.७ ऑक्टोबर १९३० रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना जॉन साॅन्डर्सच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी त्यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. 'मी नास्तिक का आहे' हे पुस्तक तुम्ही वाचले असल्यास चांगलेच
पण वाचले नसेल तर आवर्जून वाचावे आणि आपल्या देशाचे
महान क्रांतिकारक सुपुत्र भगतसिंग यांचे विवेकी विचार जाणून घ्यावेत
यासाठी हा पत्र प्रपंच...✍️
तुमचा आजोबा
'शैलेश कमल'
"असेलही माझे आयुष्य चार दिवसांचे पण,माझ्या आकांक्षेची मशाल शेवटचा श्वास असेपर्यंत माझ्या हृदयात पेटती राहील आणि उद्या जरी मी नसलो तरी माझ्या आकांक्षा देशाच्या आकांक्षा होऊन साम्राज्यवादी आणि भांडवलदारी शोषणकर्त्यांचा शेवटपर्यंत मुकाबला करीत रहातील.
माझा माझ्या देशाच्या भवितव्यावर विश्वास आहे. मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पहातो आहे. माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे. म्हणून मी आशावादी आहे. प्रेषितांविषयी बोलावयाचे झाल्यास, जर त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर आज जगाची अशी दुर्दशा दिसली नसती जी आपण आज पहात आहोत.प्रेषितांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखविला. म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत.
आजचा नवा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही. त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम जमिनीवर खणण्यास सुरुवात केली आहे. आजचा प्रत्येक मानव प्रेषित आहे. म्हणून माझा मानवावर विश्वास आहे.”
भगतसिंग
लघुकथा.
प्रवासादरम्यानचा एक किस्सा...
रेल्वेने प्रवास करत असताना एक अंध पती-पत्नी रेल्वेत भिक्षा मागत होते त्यांच्यासोबत असलेला त्यांचा एक आठ वर्षाचा मुलगा देखील अंध होता.
माझ्या कंपार्टमेंटमधे प्रवास करणाऱ्या अत्यंत धार्मिक सहप्रवाशाने त्याच्या सहा वर्षाच्या मुलाकडे बघत देवाचे आभार मानले की, माझ्या परिवारावर कुठलेही संकट नाही. हिंदी भाषिक तो प्रवासी मला सांगू लागला "मैं बचपन से ही सभी भगवानों की भक्ति रहा हूं और मैं भगवान की हरदिन आराधना करता हूं और इसलिए मैं और मेरा परिवार सुरक्षित है।" त्याच्या मुलाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, " अंकल आप गॉड को थैंक यू नहीं बोलोगे ? त्या मुलाच्या वडिलांकडे पाहत मी त्या मुलालाही म्हणालो की, बेटा अगर भगवान सचमुच है तो, बेटा मैं भगवान से थैंक यू तो कहूंगा पर यह जरूर पूछूंगा की जो लोग नहीं देख पा रहे हैं और बेहद गरीबी में जी रहे हैं इन लोगों की जिंदगी में इतनी मुश्किले क्यों है ? यह क्यों नहीं देख सकते सुंदर दुनिया ? आप तो दयालु हो क्या आपको इन पर दया नहीं आती ?
मी असं म्हटल्यावर रेल्वेच्या आमच्या कंपार्टमेंट मध्ये शांतता पसरली....
मग आमच्या कंपार्टमेंट मध्ये एक बाबा महाराज आले त्यांच्या गळ्यात फोटो होता आणि ते बाबा महाराज सांगत होते की जर तुम्ही मला या देवासाठी पैसे दिले तर तुमच्या आयुष्यात कुठलेही दुःख राहणार नाही आणि तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कारण माझ्या गळ्यातील हा देव नवसाला पावणारा आहे...
मग पुन्हा रेल्वेच्या आमच्या कंपार्टमेंट मध्ये शांतता पसरली आणि रेल्वे बोगद्यामधून जात असल्यामुळे अंधारही पसरला.....