गेल्या दशकभरात व्यसनाधीनता वाढण्यासोबतच व्यसनाधीन होण्याचा वयोगट हा कमी होत जात आहे. कुमारवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण सध्या वाढत आहे. वेब सिरीज, चित्रपटांसह मोबाईल,टीव्ही यासारख्या माध्यमातून तसेच इतरही समाज माध्यमातून व्यसनांचे उदात्तीकरण होतांना दिसत आहे याखेरीज लाइफस्टाइलचा एक भाग म्हणून एक social acceptance मिळू लागला आहे.
भारतीयांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास चित्रपटांचा, वेब सिरीजचा खूप मोठा प्रभाव सर्वांवर असतो विशेषतः तरुणाईवर त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो. तरुणांना आदर्श वाटणारे कलावंत जर तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करत असतील तर त्याचा परिणाम व्यसनांच्या उदात्तीकरणाचा होण्याचा धोका वाढतो. वेब सिरीज मध्ये,चित्रपटांमध्ये त्यातील नायक दाखवलेले पात्रसर्रासपणे व्यसन करताना दाखवला जातो पूर्वीच्या चित्रपटांमध्येही तसं दाखवलं जात होतं पण त्या वेळेला चित्रपटातला खलनायक व्यसन करताना दाखवला जात होता.
कथानकाचा भाग म्हणून आणि खूप मोठ अर्थकारण त्यामागे दडलं असल्यामुळे असं जरी दाखवलं जात असलं तरी त्याचा अतिशय नकारात्मक परिणाम विविध समाज घटकांवर होत असतो म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Social drinking सोशल ड्रिंकिंग.
एखाद्या सामाजिक कार्यक्रमात गेट-टुगेदर पार्टीमध्ये किंवा सणाच्या निमित्ताने वर्षभरात क्वचितच केले जाणारे मॉडरेड ड्रिंकिंग म्हणजे मर्यादित स्वरूपात केले जाणारे मद्यपान या प्रकारात येते. साधारणपणे हे कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत सामूहिक स्वरूपात घेतले जाते आणि तशा प्रकारचे पार्टी करणं हा एक प्रकारे स्टेटस सिम्बल समजल जात आणि अलिशान लाइफस्टाईलचा भाग समजला जातो.
अशा प्रकारच्या सोशल ड्रिंकिंग हे लोकांशी संवाद वाढवणे, ओळखी वाढवणे, विशिष्ट प्रसंग, कार्यक्रम समुदायांमध्ये अधिक आरामदायी आणि आनंददायी पद्धतीने वेळ घालवण्यासाठी केलं तर काय बिघडलं ? समर्थन करत असताना लोक दिसतात.
सततच्या वाढत चाललेल्या ताण-तणावामुळे आणि मानसिक आरोग्य बिघडत असल्यामुळे रिलॅक्सेशनसाठी मोठ्या प्रमाणात विकेंड सेलिब्रेशन अर्थात वीकेंड पार्ट्या होत असतात अशा पार्ट्यांमध्ये होणारे सोशल ड्रिंकिंग हे व्यसनाधीनतेकडे वळण्याचा खूप मोठा धोका असतो.
व्यसनाधीनता हा denial म्हणजे नाकारण्याचा एक आजारच म्हणावा लागेल. सोशल ड्रिंकिंग करून व्यसनाधीन तिकडे जाणारी व्यक्ती शक्यतोवर हे मान्य करतच नाही की ते व्यसनाधीन होत आहे.
व्यसनात अडकणाऱ्या वयात येणाऱ्या मुलांची व्यसनाधीनतेची सुरुवात साधारणत विडी सिगरेट, गुटखासारख्या यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून होते त्याला गेटवे ड्रग्स असेही म्हटले जाते. यातूनच कुमारवयीन मुलांचा प्रवास हा चहाच्या छोट्या हॉटेल पासून कॅफे सेंटर, पब आणि बियर बार कडे जाण्याचा धोका असतो.
संवादाचा अभाव हे देखील व्यसनाधीनतेचे एक महत्त्वाचे कारण आहे अर्थात ते सर्वच वयोगटाला लागू होते परंतु वयात येणाऱ्या मुलांच्या दृष्टीने ते अधिक महत्त्वाचे आहे. सुजान पालकत्वाच्या दृष्टीने संवाद हा विसंवाद न होता सुसंवाद असला पाहिजे.
मोबाईलचे व्यसन
धूम्रपान,मद्यपान या व्यसना खेरीज आणखी एक व्यसन आपल्याला सध्या दिसून येतं आणि ते व्यसन म्हणजे वर्तनाच व्यसन ज्यात जास्तीत जास्त वेळ हा टीव्ही मोबाईलच्या स्क्रीनवर घालवण्याचे वर्तन किंवा सवय.
पूर्वी लहान बाळ खात नसेल तर त्याला चिऊ काऊ ची गोष्ट सांगून घास भरवले जात होते परंतु हल्ली पालकच मोबाईलची स्क्रीन लहान बाळांसमोर धरून त्यांना खाण्यासाठी विनवण्या करत असताना बघायला मिळते. आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मोबाईल वापरावा लागत असला तरी आपल्याला आता मोबाईलचा वापर,गैरवापर आणि व्यसन असे वर्गीकरण करावे लागणार आहे, आणि मग हेही ठरवता येईल की कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा. असं करू शकलो तरच आपला क्वालिटी टाईम आपल्या फॅमिलीसाठी वेळेचे नियोजन करू शकतो.
खरं तर प्रत्येकच वेळी कुठल्याही परिपत्रकाची वाट न बघता शाळा महाविद्यालयांमध्ये याबाबतीत विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न शिक्षणातील सर्वच घटक करत असतात,पण समाजाच्या सर्वच घटकांनी,माध्यमांनी याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
मोबाईलचे व्यसन हे मुलांसह सर्वच वयोगटासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पालक आणि समाजाने काही प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
१. पालकांनी करावयाचे उपाय:
• वेळेचे व्यवस्थापन करूया :
मुलांच्या मोबाइल वापरासाठी वेळेची मर्यादा ठरवूया (उदा. दररोज 1 तास).
अभ्यास, खेळ, झोप आणि इतर क्रियाकलापांसाठी वेळ निश्चित करूया.
•पर्याय उपलब्ध करून देऊया :
मुलांना शारीरिक खेळांमध्ये खेळण्यात प्रोत्साहित करूया जसे की क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग.
वाचन, चित्रकला, संगीत, नृत्य यांसारख्या सृजनशील गोष्टींसाठी प्रोत्साहन देऊया.
•संवाद वाढवूया:
मुलांशी नियमित संवाद साधा आणि त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊया.
त्यांचे विचार ऐका आणि त्यांना सकारात्मक मार्गदर्शन देऊया.
• स्वतःचा आदर्श ठेवूया:
पालकांनी स्वतः मोबाइलचा योग्य वापर करून मुलांसमोर चांगला आदर्श ठेवावा.
कुटुंबीयांसोबत जेवणाच्या वेळी मोबाइलचा वापर टाळा.
• तांत्रिक उपाय:
मोबाइलमध्ये पॅरेंटल कंट्रोल आणि ऍप्सच्या वापरावर मर्यादा ठेवणारे तंत्रज्ञान वापरा.
मुलांनी कोणत्या प्रकारच्या ऍप्स आणि वेबसाइट्स वापराव्यात, यावर देखरेख ठेवा.
२. समाज घटकांनी करायचे उपाय:
•जनजागृती मोहिमा:
शाळा, ग्रामसभा, आणि सामाजिक गटांद्वारे मोबाइलच्या दुष्परिणामांवर चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे.
पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते.
•मैदानी खेळांचे आयोजन:
शाळा आणि स्थानिक संस्थांनी मुलांसाठी मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास अधिक चांगला उपयोग होऊ शकतो.
अशा उपक्रमांमध्ये मुलांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया.
• डिजिटल डिटॉक्स डे:
महिन्यातून एक दिवस 'डिजिटल डिटॉक्स डे' म्हणून साजरा करूया, जिथे सर्वजण मोबाइलचा वापर टाळतील.
• तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक उपक्रम:
मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करूया, जसे की कोडिंग, सायबर सुरक्षितता इत्यादी.
• पालकांसाठी मार्गदर्शन:
पालकांसाठी मोबाइल व्यसनावर उपाययोजनांवर आधारित मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याची आवश्यकता आहे.
३. शाळांचे योगदान:
शाळांनी मोबाइलच्या दुष्परिणामांवर आधारित प्रबोधनात्मक नाटके, गाणी, आणि उपक्रम राबवता यईल.
विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, खेळांचे साहित्य, आणि इतर सृजनशील उपक्रम उपलब्ध करून देता येईल.