Sunday 10 October 2021

 प्रिय नातवंडांनो.

सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

तुमची पत्नी ज्या पद्धतीने तुमच्या आई-वडिलांची म्हणजेच तिच्या सासू-सासर्‍यांची काळजी घेते आणि त्यांची सेवा करते त्याच पद्धतीने तुम्ही देखील जावई म्हणून तुमच्या सासू-सासर्‍यांची सेवा करता का ? आणि तुमचं लग्न अजून व्हायचं असेल तर भविष्यात फक्त जावई म्हणून नाही तर मुलगा समजूनच सेवा करणार का ? कारण समाजात अशी  उदाहरणे देखील आहेतच.

कोरोनाच्या सावटाखाली असताना मी हे पत्र तुमच्यासाठी मुद्दामहून लिहीत आहे  या महामारीत प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असताना कुटुंबीयांच्या काळजीने देखील व्यथित झाला आहे विशेषतः लहान बालके आणि कुटुंबातील वयोवृद्धाबाबत.

उतार वयात आई-वडिलांची सेवा करावी अशा संस्कृतीत आपण वाढलो परंतु एखाद्या दांपत्याला फक्त मुलगीच असेल तर अशा मुलीचं लग्न झाल्यानंतर एकट्या पडलेल्या आपल्या आई-बाबांची सेवा किंवा त्यांची काळजी ती मुलगी घेऊ शकत नाही जसे मुलासोबत आई-बाबा जसे राहतात तसे मुली सोबत तिचं लग्न झाल्यावर ते राहत नाहीत अशा वेळेला मुलगा नसल्याची खंत त्या आई-वडिलांना वाटू शकते अशा वेळेला मुलगी आणि जावई यांचे नैतिक, सामाजिक कर्तव्य (आणि एक आनंद) म्हणून त्यांनी  आई-वडिलांचे काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं यासाठी तुम्ही देखील तुमच्या आई बाबांसह सासू-सासर्‍यांची देखील आई-वडिलांसारखेच काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच.मुलांच्या तुलनेत मुलींची कमी असणारी संख्या ही एक सामाजिक समस्या बनली आहे.

हुंडा आणि लग्नात तसेच लग्नानंतर देखील असणारा एकतर्फी मानपान हे मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे हे देखील आंतरराष्ट्रीय बालिका दिना निमित्ताने ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे.

परंपरेने कुटुंब पद्धती मातृसत्ताक असो, पितृसत्ताक असो किंवा मातृ-पितृ सत्ताक असो ती भविष्यात मानवतासत्ताक देखील कायम असली पाहिजे तरच पृथ्वीवरील मानवी संस्कृतीची पायमुळं घट्ट राहतील अन्यथा आपली आठवण मानव न राहता केवळ प्राणी (जनावर) अशी राहील असे वाटते.आणखी काय लिहिणार तुम्ही साक्षर आहात आणि सुशिक्षितही...✍️