Saturday 4 July 2020

प्रिय नातवांनो
हल्ली बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की अडीच ते तीन वर्षाच्या बालकांना शाळा पूर्व वर्गात दाखल केले जाते बालकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पालकत्व असलेल्या सर्वच घटकांनी (आई-वडिलांसह समाजाने) एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचा आहे की शाळा पूर्वतयारीच्या नावाखाली अवघ्या तीन वर्षाच्या बालकांवर आपण शैक्षणिक क्रियाकलाप (अभ्यास) लादत तर नाही ना ? कारण या वर्गांमध्ये बालकांना दाखल करून घेण्याचा उद्देश त्यांच्या पोषणासंबंधी आणि आरोग्याच्या आणि परिसर ज्ञानाशी संबंधित आहे जे हसत खेळत बालकांच्या कलाने होईल,पण काही पालक मात्र मूळ उद्देश समजून न घेता मुलांच्या नाजूक हातात पेन्सिल, पेन देऊन त्यांना लिहिण्याचा अट्टाहास करतात. योग्य त्या वयात योग्य असा शारीरिक (Fine Motor Skills ) आणि मानसिक विकासाचा विचार न करता शाळा पूर्वतयारीच्या नावाने असा आग्रह धरण कितपत योग्य आहे ?
कुटुंबात व्यवस्था होऊ शकत नसल्यास अथवा स्वेच्छेने शाळा पूर्वतयारी बाल सुलभ हालचाली आणि पोषणाचा विचार करून केली जाऊ शकते असे याचे समर्थनही केले जाऊ शकते. तीन-चार वर्षाच्या बालकाला भविष्यातील शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेसाठी तयार करण्याचा हा कसला प्रयत्न ? खरंतर या वयात मुलांनी त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, आजी -आजोबा,काका काकू आणि भावंडांसोबत हसत खेळत संस्कारित होण्याचा कालावधी असतो.
औद्योगिक क्रांतीसह वाढणारे शहरीकरण आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या या साऱ्यांचाच परिणाम म्हणून संयुक्त कुटुंब पद्धती (एकत्र कुटुंब) पद्धती आता पाहायला मिळत नाही. पूर्वीसारखं आजी-आजोबा,काका काकू असं संयुक्त कुटुंब नसल्यामुळे कुटुंबातील लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्यासोबत खेळण्यासाठी वडीलधारी मंडळी नसते अशा विभक्त कुटुंबात लहान बालकांसाठी सर्वच पालकांना पुरेसा वेळ असतोच असे नाही. अशावेळी पाळणा घर आणि त्या पुढील टप्प्यात एक पर्यायी व्यवस्था म्हणून शाळा पूर्व तयारी करून घेणाऱ्या ठिकाणांचा शोध पालकांकडून सुरू होतो.
आपल्या विविध अडचणींमुळे जर काही पालकांना मुलांकडे अगदी लहान वयापासून लक्ष द्यायला वेळ नसल्यास भविष्यात ही बालके मोठी झाल्यावर आणि त्यांचे आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांनाही वेळ नसल्यामुळे तेही आपल्या वृद्ध आई-वडिलांसाठी वृद्धाश्रमाचा शोध घेऊ शकतात. तुमच्या तरुण वयात तुमच्या मुलांसाठी पाळणाघर जशी एक सुविधा आहे तशीच सुविधा वृद्धाश्रम देखील असू शकते हेही विसरू नका कारण शिक्षणाच्या अट्टाहासापाई अगदी लहान वयापासून आपलं बालपण हसत खेळत जाण्याऐवजी दबावात गेल्याची भावना त्यांच्या घर करू शकते.
आम्ही चांगले पाच सहा वर्षाचे पूर्ण झाल्यावर शाळेत दाखल झालो त्यापूर्वी घरीच आजी सोबत सर्व भावंडांसोबत मातीत,चिखलात,वाळूत खेळणं असायच...
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे..
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे..
कधि बाजारी तर कधि नदीच्या काठी,
राईंत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळू थबकत जावें कधि कानोसा घेत कधि रमत गमत वा कधि भरारी थेट...
असे दामोदर अच्युत कारे यांच्या कवितेतील ओळी प्रमाणे तेव्हाही वाटायचे आणि आजही वाटते..
पण नातवांनो, स्पर्धेच्या युगात अति महत्वकांक्षा,कामाचा ताण तणाव, जबाबदारी या साऱ्यांमुळेच कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील दुरावा निर्माण होऊ शकतो असे चित्र आहे.
तुमचा आजोबा.
शैलेश.
१९ जुलै २०२० चा माझा (शैलेश शिरसाठ) व्हिडिओ 👇
२१ डिसेंबर २०२२ चा व्हिडिओ Video Courtesy & special Thanks to viciousprime