Saturday 14 May 2022

गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत आहे का ? भाग १

अहिंसा परमो धर्म मानणाऱ्या बापूंच्या आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे मानवतावादी मर्म समजावून सांगणाऱ्या पूज्य साने गुरुजींच्या देशात हल्ली दोन चित्रपट कमालीचे लोकप्रिय झालेत विशेषत तरुणाईत.हे त्या चित्रपटातील सर्व टीमचे यश नक्कीच असेल परंतु चित्रपट पाहिल्यावर आणि सामाजिक जीवनात पडणाऱ्या प्रभावाकडे पाहिल्यास चित्रपटांच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतय का ? असा प्रश्न पडतो. कारण चित्रपटातील मुख्य पात्र हे चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध हिरो (नायक) आहेत, तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत, त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत त्यांच्या कपड्यांची, एकंदरीत लाईफ स्टाईलची कॉपी करतांना तरुणाई दिसते.या सुप्रसिद्ध नायक कलाकारांच्या यापूर्वीच्या चित्रपटातील भूमिका सकारात्मक आदर्शवादी नायकांच्या आहेत... या चित्रपटांमध्ये मात्र ते सहजपणे कायदा हातात घेतात आणि विविध प्रकारचे गुन्हे करतांना दाखवले आहे.विशेष चिंतेची बाब म्हणजे हे सगळं होत असताना चित्रपटगृहात नायकाच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध करण्याऐवजी टाळ्या आणि शिट्ट्यांची सलामी त्यांना दिली जात आहे.चित्रपटाची कास्टिंग करत असताना  गेल्या अनेक वर्षापासून परंपरेने विलनच्या, खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या  कलाकारांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजेच आताच्या नायिकांनी भूमिका म्हणजे तेच रोल केले असते तरीदेखील हे चित्रपट गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे राहिले असते का ? कदाचित आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे चित्रपटातील नायक असे घडले असतील हे दाखवण्याचा हा प्रयत्न असला तरी देखील तरुणाई हे कशाप्रकारे घेत आहे हे देखील महत्त्वाच आहे.चित्रपटातील नायकांच्या भूमिका या खलनायकांच्या वाटतात का ? चित्रपट कसं जगू नये हा धोका दाखवणारा आहे असं पळखाऊ समर्थन होऊ शकतं, अर्थात किती तरुण असा विचार करणार,सावध होणार की आपल्या आवडत्या नायकांच्या भूमिका फॉलो करणार? चित्रपटातील नायकाला रॉबिन हूड सारखा गरिबांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष मदत करताना दाखवलेलं नाही याचा आश्चर्य वाटल.गरिबांना मदत करणं दाखवलं असलं तरी कायदा हातात घेऊन बेकायदेशीर बाबींचे समर्थन करता येऊ शकत की नाही याचाही विचार ज्याने त्याने आपापल्या परीने करावा. याचा दुसरा भाग येणार असल्याबाबत चर्चा आहे कदाचित दुसऱ्या भागात नायक गरिबांना मदत करीत आहे असेही दाखवलं जाईल काही सांगता येत नाही आपल्या आवडत्या नायका प्रमाणे त्यांनी दाढी जरूर वाढवावी परंतु वाढवलेली स्टायलिश दाढी ही रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणाऱ्या जनतेच्या राजांप्रती प्रेम आणि प्रेरणा आहे किंवा चित्रपटांचा स्वॅग आणि केवळ दिखाऊ फॅशन हे सिद्ध करण्याची संधी देखील या निमित्ताने गमावू नये.....✍️

- (माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून..)
शैलेश शिरसाठ.

Friday 13 May 2022

 बीजांकुरण ते वटवृक्षात होणार वृक्षांचे रूपांतर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकायला मिळावं यासाठी हिरवांकुर शालेय बाल रोपवाटिकेची रुजुवात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये केली.

त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन प्रशासक कामिनी भट मॅम, सोबत मनीषा शिरसाट,रुद्राणी देवरे सचिन पाटील सर योगश माळी शाळेतील विद्यार्थी आणि शैलेश शिरसाठ सर


शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान सोबतच पर्यावरण जागृती मोठ्या प्रमाणात समावेश असणे ही काळाची गरज आहे. सध्या जरी चार भिंतीतल्या आणि भिंती बाहेरच्या समाज शिक्षणात याचा खुप मोठ्या प्रमाणात समावेश नसला तरी पर्यावरण संस्काराची भविष्यात अधिक गरज भासेल त्या अनुषंगाने सदर उपक्रम स्वयंप्रेरणेने केला जात आहे. या खेरीज विद्यार्थ्यांशी सातत्याने याबाबत बोलले जात आहे त्यात वृक्षारोपणा खेरीज असलेली वृक्ष वाचवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या विचारांचे रोपण देखील महत्त्वाचे आहे. प्लास्टिक आणि कचरा जाळणे थांबले पाहिजे. कचरा आणि प्लास्टिक जाळून त्याची विल्हेवाट केली जाते असं जर कोणी म्हणत असेल तर केवढे मोठे अंधविचार आहेत. अखंड विश्वाला तार्किक विचार करण्याची, विवेकी विचारांची अर्थातच वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे त्यासाठी प्रश्न पडले पाहिजेत आणि कार्यकारणभावाने उत्तरांचा शोध घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.✍️ शैलेश.

Sunday 1 May 2022

  लघुकथा 

आटपाट नगर होते त्या राज्यात एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव राजा विक्रम.राजाचा एक सेवक होता विनू.विनू हा  राजाशी अतिशय प्रामाणिक होता राजाची उत्तम प्रकारे सेवा करणारा राजाचा आवडता सेवक होता.राजाचे हात पाय चेपून देणे,डोक्याची अतिशय उत्कृष्ट अशी मॉलिश करणे, राजाने सांगितलेले जड अवजड काम तो आनंदाने करायचा आणि असं करून राजाला खुश ठेवायचा. विनूला बुद्धीची कामं येत नसली तरी कष्टाचे काम मात्र तो राजासाठी करायचा आणि सतत राजाची स्तुती करायचा.

यादरम्यान शेजारच्या राज्यातील राजाने खूप मोठ्या प्रमाणात सैन्यबळ उभे करण्यास सुरुवात केली त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे देखील खरेदी केली. ही बाब राजा विक्रमच्या चाणाक्ष हुशार आणि प्रामाणिक प्रधानाच्या लक्षात आली.

 एके दिवशी राजा दिवसभराची शिकारी करून दमून आल्यावर आपल्या सेवका सोबत आराम महालात बसला होता. प्रधानाने राजा विक्रमला भेटण्याची परवानगी मागितली.राजा विक्रमने प्रधानाला आपल्या महालात बोलावुन घेतले. प्रधानाने राजाला शेजारच्या राज्यातील सैनिकी हालचालींबद्दल सूचना दिली आणि आपल्या राज्यात देखील शेजारच्या राज्यापेक्षा अधिक चांगला सैनिकी लवाजमा असावा अशी इच्छा व्यक्त केली हे ऐकता बरोबर राजाचा सेवक विनू प्रधानाला म्हणाला "म्हणजे आपल्या राज्याचे  सैन्य शेजारच्या राज्यापेक्षा कमी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? आपले राजा आणि आपल्या सैन्य कोणा पेक्षाही कमी नाही त्यामुळे तुम्ही आपल्या सैन्याच्या चुका दाखवून नकारात्मकता पसरवू नका आपल्याला कोणापासूनही काहीही धोका नाही कारण आपले राजे खूप शूर,पराक्रमी आणि सुंदर आहेत. विनू चे उत्तर ऐकून राजा खूश झाला माझा सेवक माझी किती स्तुती करत आहे आणि तो खरं बोलत आहे म्हणून राजाने प्रधानाला त्याचं पद सोडण्यास सांगितले आणि त्याच्या रिक्त झालेल्या पदावर त्याचा सेवक विनू ची नियुक्ती राज्याचा नवीन प्रधान म्हणून केली. सेवक विनू राजाची रोज स्तुती करे आणि त्याची खूप सेवा करत असे राजा विनूवर अधिकाधिक खुश झाला आणि प्रधानाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसातच शेजारच्या राज्याने पूर्ण ताकदीनिशी राजा विक्रमाच्या राज्यावर हल्ला केला आणि राजा विक्रमचा दारुण पराभव झाला.

लेखक- शैलेश शिरसाठ