Friday 1 June 2018

प्री-वेडिंग लहानपणापासूनच्या आठवणीतील फोटोंची, जिव्हाळ्याच्या नात्यांची गुंफण की, न घडलेल्या प्रणय प्रसंगांच सिनेमॅटिक प्रदर्शन

आजोबांचे नातवांना पत्र.
माझ्या प्रिय नातवांनो तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद. तुमच्या विवाहप्रसंगापर्यंत मी तुमच्यासोबत असेलच परंतु नसलो तरी तुमच्यासाठी हे पत्र. तुम्ही पत्र वाचा, मी सांगतोय तसंच तुम्ही करा असं नाही परंतु आजोबाच नातवांसाठी काही सांगणं आहे ते तुमच्यापुढे मांडतोय किमान त्याचा विचार करा...
मला तुमचा आणि तुम्हालाही माझा अभिमान वाटावा यासाठी हा पत्र प्रपंच ...
आयुष्य हे क्षणभंगुर असतं त्यामुळे आनंदाने जगण्यासाठी नक्कीच पैसा खर्च करा कारण पैसा तुमच्यासाठी आहे तुम्ही पैशासाठी नाही. तुम्ही फक्त साक्षर नाही सुशिक्षितही राहाल म्हणून लग्न सोहळ्यासाठी पैसा कसा खर्च करावा याच नियोजन आणि निर्णय तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यावे.
लग्न सोहोळ्या बाबतीत विशेष मत मांडायचा मुद्दा म्हणजे 'प्री-वेडिंग शूट.' प्री-वेडिंग लहानपणापासूनच्या आठवणीतील फोटोंची, जिव्हाळ्याच्या नात्यांची गुंफण की न घडलेल्या प्रणय प्रसंगांची सिनेमॅटिक प्रदर्शन याचा तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने विचार करा.
स्वतः पैसे खर्च करून प्री-वेडिंग शूटिंग मध्ये घडलेल्या न घडलेल्या रोमँटिक प्रसंगांचे जगासमोर मांडण्याची सिनेमॅटिक लिबर्टी आपण फोटोशूट देतांना जरा सांभाळा..फोटोशूट कसा होईल याचा निर्णय विवाह संस्कारातून जाताना मुला-मुलींनी नक्कीच घ्यावा पण त्यासोबत आपल्याला घडवणारे आई-वडिल, लाड पुरवणारे आजी आजोबा, सख्खे चुलत असा हिशोब न मांडता सतत काळजी घेणारी उत्सवप्रिय भावंडे परिवारातील सदस्य,आयुष्याच्या सुखदुःखात साथ देणारी जिवलग मित्रमंडळी यांच्या सोबतच्या आठवणींसाठी किमान एक क्लिक तरी ठेवा.
लग्नाच्या तयारीसाठी आरशासमोर उभे रहा पण जुनी दुर्मिळ फोटो यांचा संग्रह ठेवा कारण आरसा गेलेला काळ दाखवत नाही जो जुने फोटो आणि आठवणी सांगतात...
तुमच कोणावर प्रेम असेल आणि त्यांच्याशी तुम्ही विवाह करताना तुम्ही विवाहपूर्वी पासून एकमेकांमध्ये किती इन्व्हॉल आहात हा अत्यंत खाजगी असणारा भाग सार्वजनिक करावसं वाटलं तर करा पण जरा भान ठेवा. तुमचं लव्ह समाजासमोर अरेंज मॅरेज द्वारे करताना तुम्ही विवाहापूर्वीच एकमेकांना ओळखता आणि प्रेमात आहात यासाठी प्री-वेडिंग मध्ये आवश्यक वाटल्यास त्याचा केवळ उल्लेख करा फालतू खाजगी फोटो आणि व्हिडिओचे बीभत्स प्रदर्शन नकोच.परंतु तुम्ही म्हणजे नवरदेव नवरी एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असाल तर प्री-वेडिंग मध्ये तुमचे अनेक वर्षापासून संबंध असल्याच खोट प्रदर्शन मांडू नका कारण ते जेवढे हास्यास्पद आहे तेवढच संतापजनक आणि तुमची बौद्धिक दिवाळखोरी काढणारेही आहे.
पुन्हा सांगतो गेल्या अनेक वर्षापासून विवाहाने संस्कारित होण्यापूर्वीच तुमचे संबंध असल्याचा बनाव आणून भाकडकथा रचू नका आणि लग्न समारंभात अक्षदा टाकण्यासाठी आणि जेवणासाठी तात्काळत असलेल्या लोकांना दाखवू नका. उगाच फिल्मीपना करू नका चित्रपटांचा तुमच्यावर प्रभाव आहे हे दाखवण्यासाठी पैशाची उधळण सांभाळून करा.
तुमच्या मानसिक आणि सोशल मीडियावरील विश्वाच्या समाधानासाठी तुमच्याकडे असणाऱ्या वैभवाच शक्ती प्रदर्शन समारंभातील खर्चातून जरूर करा पण त्यासोबत प्रेमाची जिव्हाळ्याची नाती आणि माणसं जपायलाही शिका..
तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधुनिक युगात आपण आहोत तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मीही टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही अवेलेबल आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.