Tuesday 20 June 2023

जबाबदार नागरिकांनी (समाज शिक्षकांनी) प्राधान्य कशास द्यावे ?


प्रिय अर्चनाताई, 
साष्टांग नमस्कार.
जबाबदार नागरिकांनी (समाज शिक्षकांनी) प्राधान्य कशास द्यावे ? या संदर्भातील विचार ब्लॉगमध्ये मांडत असताना तुला हे पत्र लिहीत आहे. लेखाच्या शीर्षकात जबाबदार नागरिक अशी सुरुवात असली तरी जबाबदार नागरिकांऐवजी जबाबदारीचे भान ठेवून नागरिकांनी हे अधिक संयुक्तिक असेल असे वाटते. विज्ञाननिष्ठ,विवेकवादी लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावे या इच्छेन  सदर लेखाची सुरुवात आहे. 
ताई, सध्या विविध परीक्षांच्या तयारीसाठी सेवेत असणारे कर्मचारी देखील अभ्यास करताना दिसत आहेत आज देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती बघता सुशिक्षित,सुजाण भारतीय नागरिकांनी खरंच अभ्यास करण्याची गरज आहे परंतु कुठल्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी प्राधान्य द्यावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे (आणि राष्ट्रीय ही). आपल्या व्यक्तिगत व्यावसायिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे मुळीच चुकीचे नाही. परंतु प्राधान्य कुठल्या प्रकारच्या अभ्यासाला द्याव याचा किमान अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे म्हणून मी वैयक्तिकरित्या प्राधान्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन (तार्किक, विवेकवादी, मानवतावादी) विचारांच्या अभ्यासाला दिला आहे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण समाजात विविध धार्मिक आणि जातीय बाबींमुळे तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अफवांवर आपण विश्वास ठेवायला नको कारण अनेकदा सत्तेच्या लढायांना धर्माच्या लढाया दाखवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या. थोडक्यात देशात शांततामय,बंधूभावाचे, सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समाज माध्यमांचीही मोठी जबाबदारी आहेच. अर्थात या ठिकाणी समाज माध्यम म्हणजे ती तांत्रिक उपकरणे नव्हे , तर अशी तांत्रिक उपकरणे हाताळणारी 'हातं' या अर्थाने आहे. जबाबदार नागरिक आणि समाज शिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य द्यावे असे आपण ऐकतो, त्याची गरज सध्या सर्वाधिक आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये एका विशिष्ट धर्माचे बहुसंख्य लोक असल्यावर आणि त्या देशांची निर्मिती धर्माच्या नावावर असल्यावरही तेथे शांतता नाही, प्रगती नाही याउलट भारतासारख्या बहुभाषिक, असंख्य जाती, धर्म,पंथ असणाऱ्या,जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या लोकशाही राष्ट्रात अधिक चांगलं सामाजिक वातावरण आहे.जगात आपली ओळख Unity in Diversity अर्थात 'अनेकता में एकता '( हैं हिंद की विशेषता) अशी आहे ती तशीच अबाधित ठेवू या.बागेत एकाच प्रकारची फुलं असावीत हा अट्टाहास कशासाठी ? सर्व फुले झाडांनी समृद्ध वन जोपासली पाहिजे नाहीतर विष वृक्ष वाढू शकतात. आता हे आपण ठरवायचं की आपण आपल्या शेजारच्या धर्मांध राष्ट्रासारखं एकाच प्रकारचे फुल असाव, कुंडीतलं बॉन्साय (bonsai) सारखं वाढ खुंटलेल एकच प्रकारचं रोपट हव की सुंदर बहरलेली बाग...✍️
 सध्या समाज प्रबोधना संदर्भातील काही जुने ग्रंथ तसेच पत्र व्यवहारांचा अभ्यास करत होतो तेव्हा सहज वाटलं की आपणही पत्र लिहावं आणि हे पत्र अधिक काळापर्यंत राहावं यासाठी या ब्लॉग वरूनच पोस्ट करत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकमेकांची चौकशी करण्यासाठी हल्ली मोबाईल आहेत पण सांभाळून ठेवावेत अशी पत्र नाहीत अशी काही पत्र असावीत यासाठीही हा पत्र प्रपंच..
इकडे सर्व व्यवस्थित आहे बाकी तुम्ही सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. 
तुझा धाकटा भाऊ ✍️ 
शैलेश.
  प्रबोधनासाठी 'साक्षी जोशी' यांचा वीडियो जरूर बघ.🙏


 

Tuesday 6 June 2023

जातीअंताच्या लढ्याबाबत मनातलं. माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून....✍️ शैलेश शिरसाठ.

जातीअंताचा लढा वाटतो तितका सोपा नाही कारण हा फक्त तीन टक्क्यांमधील काही लोकांचा विषय नसून उर्वरित 97% मध्ये देखील काहींमधे वर्ण द्वेष आणि वर्णव्यवस्थाची पायमुळं घट्ट रोवली आहेत, स्वतःला सुशिक्षित आणि बहुजन म्हणवणारे,स्वतःला उच्च जातीतले म्हणणारे काही लोक देखील वर्णव्यवस्थेने शूद्र समजल्या जाणाऱ्या आपल्याच बांधवांना मनापासून आपलं असं करत नाही कारण त्यांच्या मनात ते स्वतः एक ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य जातीतील असल्याची बिरूदे मिरवत असतात. सगळा समाज जरी असा नसला तरी महापुरुषांना जातीत वाटून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या वर्णव्यवस्था स्वीकारणाऱ्या ढोंगी लोकांची संख्या काही कमी नाही म्हणूनच जातीअंताचा लढा वाटतो तितका सोपा नाही.
जगाच्या इतिहासात माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानवतावादी लढा देणारे राजर्षी शाहू महाराज , क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवांना त्या वेळेच्या कर्मठ जातीयवादी व्यवस्थेने त्रास दिलाच होता परंतु आज आपण या सर्व महापुरुषांना जाती पंथात वाटून त्रासच देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेतृत्व करणारे महामानव आहेत,कारण त्यांनी वर्णव्यवस्थेतील सर्व जातींचा सर्व धर्मातील स्त्रियांचा तसेच ओबीसींचा सर्वप्रथम विचार केला मग स्वतःच्या जातीचा,असे असल्यावरही आज बहुजनांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी आहेत का ? याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आता बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत तसबीरी घरात लावण्याची गरज काय? असा न पटणारा युक्तिवाद ही मंडळी करू शकतात कारण अशी माणसं जाती जातीत महापुरुषांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विभागणीच करतात आणि स्वतःच्या जातीशी संबंधित असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा मात्र आवर्जून घरात स्थापित करतात.आजही आपण कुणाच्याही घरात जाऊन तिथे असणार्‍या प्रतिमांवरून त्यांची जात ओळखू शकतो. याला काही ठिकाणी अपवादही असेल परंतु तेही अपवादानेच हे खेदाने नमूद करावसं वाटतं.
जोपर्यंत स्वतःच्या जातीपेक्षाही विचारांची ओळख असणाऱ्या आणि छत्रपती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचे आमच्यासह काम करणारे बांधव, विवेकवादी लेखक,वाचक आणि समाज शिक्षक हे काम करत आहेत तोपर्यंत सामाजिक बदलाच्या शक्यताही जिवंत आहेत एवढ मात्र खरं. शेवटी जातीअंताचा लढा हा जातींचा नाही तर जातींपलीकडे मानवी मूल्यांचा लढा आहे अस मला व्यक्तिशः वाटत.
(जातीअंताच्या लढ्याबाबत मनातलं. माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️ शैलेश शिरसाठ.) shaileshshirsath.blogspot.com