Saturday 30 July 2022

संडेज स्पेशल, जरा संभाळून...

मी पहिल्यांदाच निंबादेवी धरणावर गेलो त्यावेळेला माझी सगळ्यात पहिली रिएक्शन ही होती this is not the place to visit with family, and not even single.
निर्जन स्थळ भयावह असतात असं नाही तर हुल्लडबाजी करणारे विशेषत नशेत हुल्लडबाजी करणारी बेधुंदी असल्यावर अशा ठिकाण किती सुरक्षित आहे असा विचार आला. संपूर्ण परिसरात बऱ्याच ठिकाणी निसरडा भागही आहे. म्हणून सर्वच अर्थाने आपला पाय घसरणार नाही याचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे.
हल्ली हा परिसर बऱ्यापैकी माहीत झाला असला तरी तो सुरक्षित झाला असे मात्र वाटत नाही विशेषता मला जळगावत बाहेरगावातून आलेले हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची विशेष काळजी वाटते कारण ते स्थानिक नाहीत त्यामुळे त्यांना खूप सारी माहिती स्थानिक परिसराची नाही. रविवारी कुठेतरी पर्यटन करावे यात गैर काहीच नाही उलट अशी पर्यटन झाली पाहिजे कारण दैनंदिन जीवनातील ताण तणाव यामुळे दूर होतो आणि जीवनातील आनंद घेता येतो.
निसर्गाचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे कारण निसर्ग देताना भरभरून देतो मग ती हिरवळ असो किंवा निर्मळ पाण्याचा धबधबा परंतु आपली आणि आपल्या सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींची काळजी देखील तेवढाच महत्त्वाचा भाग आहे परिवारासोबत आलेल्या व्यक्तींनीही तशी काळजी आणि भान ठेवणं महत्त्वाचं आहेच विशेषतः हुल्लडबाजी करणाऱ्या बेधुंद व्यक्तींपासून..so enjoy but do take care of your love ones...

Friday 22 July 2022

परीक्षेतील गुणानुक्रमांची स्पर्धा आणि रियलिटी शोज्

मी हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत अभिलिप्सा पांडा आणि जितू शर्मा यांनी गायलेल्या हर हर शंभू या लोकप्रिय गीताच्या कमी वेळात 11 लाखाच्यावर व्ह्यूव्ज् झालेले आहेत. हर हर शंभू गीत लोकप्रिय असून उत्कृष्ट पद्धतीने गायलं आहे. आता या नवोदित गायकांना कुठल्या विद्यापीठाचं गायक म्हणूनच सर्टिफिकेट आहे किंवा नाही हे माहीत नाही परंतु ते लोकप्रिय झालेत. विशेष म्हणजे कुठल्याही रियालिटी शोचे ते विनर नाहीत रियालिटी शो ची कुठलिही परीक्षा त्यांनी दिली नसेलही. समजा एखाद्या रियालिटी शोमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपुर, किशोर कुमार, आशा भोसले, अमित कुमार,उषा उत्थुप , अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक, साधना सरगम , चित्रा,कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम, अरिजित सिंह, आतिफ असलम, श्रेया घोषाल यासारख्या आणखी पन्नास गायक-गायिकांनी सहभाग घेतला आणि त्यातून फक्त एकाच विजेत्याला निवडायच असेल तर निवड करणं तर अधिक जिकरीचे होईलच आणि एकाचीच निवड झाल्यानंतर बाकी सर्व स्पर्धेतून बाद होतील,हे कितपत योग्य वाटतं? परीक्षेतील पास-नापास,गुणानुक्रमांक देखील याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतंय. हा पहिला तो दुसरा तो शेवटचा असा गुणानुक्रमांक आपण ठरवतो परंतु खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना आपण दिलेली परीक्षा आणि तिचे निकष योग्य न्याय देऊ शकतात का ? कुठल्याही प्रकारच्या गायन स्पर्धेत विजेते नसलेले असंख्य गायक कलाकार आज संगीत क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्य करत आहेत आणि प्रचंड लोकप्रिय देखील होत आहेत.त्यांनी तर या गायन स्पर्धेत भाग नघेऊन ती स्पर्धाच नाकारली. आणि स्पर्धेने बाद करून नाकारलेल्या नेहा कक्कर सारख्या गायकांनी स्वतःला सिद्ध देखील केल आहे. एवढच नाही तर ज्या शो ने तिला बाद केलं त्या शो ची ती परीक्षक देखील झाली. या क्षेत्रातील कलाकारांनी स्वतः आपली कलाकृती थेट श्रोत्यांंकडे सादर केली आणि यशस्वीही झाले. गायक कलाकारांनी स्वतःचे दाखवलेले कौशल्य थेट जनमानसापर्यंत व्यक्तिगत अल्बम्सच्या माध्यमातून पोहोचवले,यात कुठल्याही व्यवस्थेचा फालतू पर्यवेक्षनिय हस्तक्षेप किंवा दलाली नाही, म्हणजे डायरेक्ट फॅक्टरी टू कस्टमर असंच... तुम्हाला तुमच्या अंगी असलेल्या गुणांना जोपासून आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर प्रगती करता येते हे ठासून सांगण्याची गरज देखील व्यवस्थेने करावी अर्थात आयुष्याच्या विविध टप्प्यांवर हे त्यांच्या लक्षात येईलही, दुर्दैवानं ज्यांच्या हे लक्षात येणार नाही ते मात्र या गर्तेत पुरते अडकतील. - शैलेश शिरसाठ.

Sunday 10 July 2022

अत्यंत महत्वाचं पण नेमकं काय ?

शिकणे है नैसर्गिक आणि शिकवणे हे कृत्रिम आहे असं मी व्यक्तिशः मानतो आणि जाणतो. जगातील सगळ्यात सोपं काम म्हणजे परीक्षा घेणे तेही दुसऱ्याची. मूल्यमापन व त्यावर आधारित अतिरिक्त पर्यवेक्षणीय संकलनामुळे अध्ययन अध्यापनांचा आनंदच आपण हिरावून घेत आहोत शिवाय अत्यंत महत्त्वाचा वेळ त्यामुळे वाया जात आहे. राज्यातले शिक्षक प्रचंड तणावाखाली आहेत. मोठ्या प्रमाणावरच्या अशैक्षणिक कामांमुळे तसेच वरवर शैक्षणिक वाटणाऱ्या परंतु आतून वेळ आणि श्रम खाणाऱ्या अशैक्षणिक असणाऱ्या कामात शिक्षक सतत गुंतुन असतो. काय कराव? हे उमजत नाही. ह्या सबंध प्रक्रियेत मुलांच सुयोग्य शिकण कमी झालय.
कोविड-१९ मुळे मोठ्या प्रमाणावर मुलांच शिकण्याच नुकसान झालय हे सर्वजण मान्य करीत असतांना प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर मुलांना सर्वाधिक गरज होती ती शिक्षकांच्या सहवासाची. पण शाळा सुरु झाल्यापासुन तर आजतायागत किती कॉलिटी आणि क्वांटिटी वेळ मुलांना शिकवण्यासाठी मिळाला? ही चिंतनीय बाब आहे. दोन वर्षाच शिकण्याच नुकसान एक दोन महिन्यात कधीही आणि कुणीही भरु शकत नाही. पण हे सत्य स्वीकारायला तयार नाही.
सतत रोज नवी माहिती मागविली जात आहे . त्यात गेल्या काही वर्षांत माहितीसाठी ' तत्काळ ' या शब्दाने चांगलाच जोर धरला आहे . प्रत्येक माहिती तत्काळ हवी असते . त्यामुळे विद्यार्थी सोडून शिक्षकांना माहितीच्या विळख्यात स्वतःला गुंतवून ठेवावे लागते . शिक्षकांची माहितीला ना नाहीच , पण एकच माहिती किती वेळा द्यायची , हा खरा प्रश्न आहे . राज्यात शिक्षक व शाळांची माहिती शासनाने विकसित केलेल्या विविध संकेतस्थळावर नोंदविली आहे . त्यावर मोठय़ा प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे . तिचा उपयोग होणे अपेक्षित होते . आरंभी संकेतस्थळावर माहिती भरताना पुन्हा माहिती द्यावी लागणार नाही असे सांगण्यात आले होते.
माहिती तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर कामात सुलभता आणि काम कमी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही . रोज अनेक प्रकारची माहिती शिक्षकांना द्यावी लागते . ती माहिती प्रशासनासाठी महत्त्वाच्या असतीलही , मात्र त्या इतरत्र उपलब्ध असतील तर त्या पर्यायाचा विचार करायला हवा . नसतील तर कायमस्वरूपी पुनः पुन्हा लागणारी माहिती संकेतस्थळावरतीच नव्याने नोंदवायला हवी . खरं तर शाळांकडून लागणाऱ्या वारंवार माहितीचा अभ्यास करायला हवा . शासनाने यासंदर्भाने एक अभ्यास गट नेमून शिक्षकांच्या या मागणीचा गंभीरपणे विचार करायला हवा. पण यात शिक्षकांचा बराच वेळ तसेच श्रम वाया जात आहे.ह्या सर्व बाबींना कंटाळुन फक्त आम्हाला शिकवु द्या ! चा नारा घेत राज्यात शिक्षक आता रस्त्यावर का उतरताहेत? ह्याचाा समाजाच्या प्रत्येक घटकाने विचार करायला हवा. या उलट शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव याबाबतीत तुलनेने कमी असून देखील अधिकाधिक प्रमाणात प्रत्यक्ष वर्ग अध्यापन होत असल्याने खाजगी शैक्षणिक संस्थांनी स्पर्धेचे मोठे आव्हान सरकारी शाळांसमोर उभे केले आहे. एक मात्र नक्की अशैक्षणिक कामांची चर्चा केल्याशिवाय गुणवत्तापुर्ण शिक्षणाची चर्चा होवुच शकत नाही हे दाहक वास्तव सर्वांनी स्वीकारायला हव. केवळ हो ला हो म्हणत आपल्याच पिढीच नुकसान करायला आपणच जबाबदार असु. एका वेळेला अनेक भूमिका आपल्याला निभवाव्या लागतात. त्या अनुषंगाने हे गीत आठवले आपणही गाण्याचा आनंद घ्या.🙂