Sunday, 10 July 2022

अत्यंत महत्वाचं पण नेमकं काय ?

शिकणे है नैसर्गिक आणि शिकवणे हे कृत्रिम आहे असं मी व्यक्तिशः मानतो आणि जाणतो. जगातील सगळ्यात सोपं काम म्हणजे परीक्षा घेणे तेही दुसऱ्याची. मूल्यमापन व त्यावर आधारित अतिरिक्त पर्यवेक्षणीय संकलनामुळे अध्ययन अध्यापनांचा आनंदच आपण हिरावून घेत आहोत शिवाय अत्यंत महत्त्वाचा वेळ त्यामुळे वाया जात आहे. राज्यातले शिक्षक प्रचंड तणावाखाली आहेत. मोठ्या प्रमाणावरच्या अशैक्षणिक कामांमुळे तसेच वरवर शैक्षणिक वाटणाऱ्या परंतु आतून वेळ आणि श्रम खाणाऱ्या अशैक्षणिक असणाऱ्या कामात शिक्षक सतत गुंतुन असतो. काय कराव? हे उमजत नाही. ह्या सबंध प्रक्रियेत मुलांच सुयोग्य शिकण कमी झालय.
कोविड-१९ मुळे मोठ्या प्रमाणावर मुलांच शिकण्याच नुकसान झालय हे सर्वजण मान्य करीत असतांना प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर मुलांना सर्वाधिक गरज होती ती शिक्षकांच्या सहवासाची. पण शाळा सुरु झाल्यापासुन तर आजतायागत किती कॉलिटी आणि क्वांटिटी वेळ मुलांना शिकवण्यासाठी मिळाला? ही चिंतनीय बाब आहे. दोन वर्षाच शिकण्याच नुकसान एक दोन महिन्यात कधीही आणि कुणीही भरु शकत नाही. पण हे सत्य स्वीकारायला तयार नाही.
सतत रोज नवी माहिती मागविली जात आहे . त्यात गेल्या काही वर्षांत माहितीसाठी ' तत्काळ ' या शब्दाने चांगलाच जोर धरला आहे . प्रत्येक माहिती तत्काळ हवी असते . त्यामुळे विद्यार्थी सोडून शिक्षकांना माहितीच्या विळख्यात स्वतःला गुंतवून ठेवावे लागते . शिक्षकांची माहितीला ना नाहीच , पण एकच माहिती किती वेळा द्यायची , हा खरा प्रश्न आहे . राज्यात शिक्षक व शाळांची माहिती शासनाने विकसित केलेल्या विविध संकेतस्थळावर नोंदविली आहे . त्यावर मोठय़ा प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे . तिचा उपयोग होणे अपेक्षित होते . आरंभी संकेतस्थळावर माहिती भरताना पुन्हा माहिती द्यावी लागणार नाही असे सांगण्यात आले होते.
माहिती तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर कामात सुलभता आणि काम कमी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही . रोज अनेक प्रकारची माहिती शिक्षकांना द्यावी लागते . ती माहिती प्रशासनासाठी महत्त्वाच्या असतीलही , मात्र त्या इतरत्र उपलब्ध असतील तर त्या पर्यायाचा विचार करायला हवा . नसतील तर कायमस्वरूपी पुनः पुन्हा लागणारी माहिती संकेतस्थळावरतीच नव्याने नोंदवायला हवी . खरं तर शाळांकडून लागणाऱ्या वारंवार माहितीचा अभ्यास करायला हवा . शासनाने यासंदर्भाने एक अभ्यास गट नेमून शिक्षकांच्या या मागणीचा गंभीरपणे विचार करायला हवा. पण यात शिक्षकांचा बराच वेळ तसेच श्रम वाया जात आहे.ह्या सर्व बाबींना कंटाळुन फक्त आम्हाला शिकवु द्या ! चा नारा घेत राज्यात शिक्षक आता रस्त्यावर का उतरताहेत? ह्याचाा समाजाच्या प्रत्येक घटकाने विचार करायला हवा. या उलट शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव याबाबतीत तुलनेने कमी असून देखील अधिकाधिक प्रमाणात प्रत्यक्ष वर्ग अध्यापन होत असल्याने खाजगी शैक्षणिक संस्थांनी स्पर्धेचे मोठे आव्हान सरकारी शाळांसमोर उभे केले आहे. एक मात्र नक्की अशैक्षणिक कामांची चर्चा केल्याशिवाय गुणवत्तापुर्ण शिक्षणाची चर्चा होवुच शकत नाही हे दाहक वास्तव सर्वांनी स्वीकारायला हव. केवळ हो ला हो म्हणत आपल्याच पिढीच नुकसान करायला आपणच जबाबदार असु. एका वेळेला अनेक भूमिका आपल्याला निभवाव्या लागतात. त्या अनुषंगाने हे गीत आठवले आपणही गाण्याचा आनंद घ्या.🙂

1 comment:

  1. मी सहमत आहे.अत्यंत आवश्यक विचार आहेत.शिक्षकांच्या संघटनांनी या संदर्भात प्रभावी कृती करण्याची गरज आहे,सर.

    ReplyDelete