Saturday 11 November 2023

विविध समाज माध्यमातून,प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा वाढवणाऱ्या,त्यांचा प्रचार,प्रसार करणाऱ्या बाबी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा अंधश्रद्धा वाढवणाऱ्या घटकांचे उदत्तीकरण होणं वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अर्थात शिक्षणासाठी अत्यंत घातक आहे त्यावर पावले उचलली गेली पाहिजे. परंपरांच्या नावावर हे होत असले तरी परंपरांचीही चिकित्सा व्हायलाच पाहिजे. चुकीच्या परंपरांचे उच्चाटन झाले पाहिजे, त्यासाठी त्याचा विरोध करणे आवश्यक आहे. चुकीच्या परंपरांना आणि अंधश्रद्धांना विरोध करणे हे सुशिक्षित आधुनिक समाजाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जरी शिकवला गेला तरी विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. विद्यार्थ्यांसह समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावे लागणार आहे ,त्यासाठी राज्यघटनेनुसार कायद्याच मोठ पाठबळ आपल्याला आहे हे विसरता कामा नये.आपली भारतीय राज्यघटना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत अपेक्षा करते (There is one duty that is unique to India under Article 51A (h) that encourages the citizen to “develop scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform".) *'वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधकबुद्धी,सुधारणावाद मानवतावाद याचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.* वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी शिक्षकांची आणि सर्वच व्यवस्थांची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य असलं तरी सामुदायिक मानवतावाद आणि विवेकवादास ते बाधक होता कामा नये... म्हणून प्रत्येक व्यक्तीने आणि सर्वच माध्यमांनी जबाबदारीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे भान ठेवले पाहिजे आणि अवैज्ञानिक,अंधश्रद्धा वाढवणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार आणि उदात्तीकरण न करता विरोध केला पाहिजे.