Saturday 12 November 2022

ग्रामदेवतेच्या कोला उत्सवातील लोककलेच्या माध्यमातून आदिवासींच्या जंगल-जमिनीवर निसर्गदत्त अधिकाराचा दैवी आगाज म्हणजे 'कांतारा' चित्रपट.

नैसर्गिक साधन संपत्ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी नाही अगदी राजा आणि जमीनदार बनलेला त्याचा वंशज असला तरी. 'भुता कोला' या प्राचीन मूलनिवासी सांस्कृतिक प्रतीकाच्या माध्यमातून मानवाच निसर्गाशी असलेल नातं सांगणारा चित्रपट म्हणजे 'कांतारा' अर्थात रहस्यमयी जंगल. निसर्गाचाच एक घटक असणारा मानव आणि निसर्ग यांच्यातील निस्सीम प्रामाणिक नातं हे शाश्वत असून ज्यावेळी माणूस निसर्गाशी अप्रमणिक स्वार्थी होतो त्या वेळेला तो विनाशाकडे जातो हे सांगणारा चित्रपट. चित्रपटातील ग्रामदेवता ही शेकडो वर्षापासून गावाचे रक्षण करत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे कोला उत्सवातील लोककलेच्या माध्यमातून गावातील लोक या ग्रामदेवतेची सेवा करतात. ग्रामदेवतेची सेवा करणारा सेवक विशिष्ट वेशभूषा धारण करून नृत्य सादर करतो यादरम्यान काही काळ त्याच्यात देवाचा वास असतो. गावावर व गावाच्या भोवताली जंगलावर वनविभाग आणि जमीनदार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दावा करताना दिसतात. चित्रपटातील कथानक गावकऱ्यांचे रक्षण करणारी ग्रामदेवता मूलनिवासी आदिवासी, जंगल-जमीन,वनविभाग आणि जमीनदार यांच्या भोवती फिरते. चित्रपट हे देखील स्पष्ट करतो की मूलनिवासी असणारे आदिवासी आणि जंगल हे नैसर्गिकरित्या परस्पर पूरक आहेत नैसर्गिक साधनसामग्रीचाा एका मर्यादेत किंबहुना जगण्यापुरता उपभोग घेणारे आदिवासी यांचा जंगलातील जमिनीवर नैसर्गिक अधिकार आहे. मूलनिवासी आणि मुलनिवासींपेक्षा स्वतःला वेगळे समजणारे चाणाक्ष परंतु कुबुद्धी असणारी विशिष्ट साम्राज्यवादी प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष देखील या निमित्ताने समोर येतो. चित्रपटात सातत्याने मास मच्छी खाणारा आणि सतत दारू पिणारा नायक आणि त्याचे मित्र पचवणं सामान्यतः प्रेक्षकांना थोड जड जाऊ शकत परंतु कोणताही प्रकारे हिंसक न होता अन्याय अत्याचार किंवा बळजबरी ते करत नाहीत. मद्यप्राशन खाणपिणं आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा उपभोग घेणे हे खूप नैसर्गिक आणि सर्वसाधारण असल्याचं नायकाचा गट दाखवतो.(हे पहात असताना प्राणी जीवनसृष्टीतील अन्न आणि संभोग या प्रथमतः मूलभूत आणि महत्त्वाच्या गरजा असाव्यात का असा प्रश्न पडतो.)राजाचा वंशज असणारा जमीनदार मात्र संपूर्ण जंगलाची जमीन स्वतःच्या नावावर करण्याच्या स्वार्थी हेतूने नायक आणि त्याच्या गटाच त्याच्या लेखी असलेलं उपद्रमूल्य लक्षात घेता त्यांचा खाण्यापिण्याची काळजी घेतो आणि त्यांना ते पुरवतो. आदिवासींच्या असलेल्या परंपरा,जीवन पद्धती आणि जंगलावरील त्यांचा अधिकार असला तरी जमीनदाराला तो निसर्गदत्त न वाटता उपद्रवच वाटतो. जंगलातील सर्वसामान्य लोकांची त्याच्यावरची निष्ठा कायम राहावी म्हणून सतत काही ना काही भेट वस्तू देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सर्वसामान्य साध्या भोळ्या आदिवासींना जमीनदाराचा कावेबाजपणाा उशिरा लक्षात येतो. संपूर्ण चित्रपटाच गमक चित्रपटाच्या शेवटात आहे शेवट अप्रतिम असून सर्व मानवाने (सामाजिक,राजकीय,प्रशासकीय यंत्रणेनेसह) एकत्र येऊन निसर्गाशी असलेले नाळ अधिक घट्ट बांधावी आणि मोठ्या गुण्यागोविंदाने राहावं असा संदेश स्वतः परमेश्वर ( निसर्ग ) सांगताना दिसतो
. स्वतःच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात नायकाची मध्यवर्ती भूमिका साकारणारा वृषभ शेट्टी हा खऱ्या अर्थाने या अप्रतिम कलाकृतीचा नायकच आहे. प्राचीन मूलनिवासी संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा अप्रतिम मांडल्याबद्दल वृषभ शेट्टी आणि टीमच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ✍️ (या संपूर्ण ब्लॉग लिखाणा दरम्यान मी मूळ निवासी आदिवासी हा उल्लेख वारंवार केलेला आहे. कारण काही प्रेक्षकांना चित्रपटातून दाखवलेली रूढी परंपरा त्यांच्या रूढी परंपरांशी मेळ नसणारी वाटू शकेल.) shaileshshirsath.blogspot.com

Sunday 6 November 2022

सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे विकृतीकरणास परवानगी नव्हे..

समाजावर पुस्तकांऐवजी टीव्ही, सिनेमा आणि वेब सिरीजचा प्रभाव अधिक निर्माण होत असतांंना खरी ऐतिहासिक मांडणी असणारे अभ्यासपूर्ण चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे, म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण होणार नाही. विशेषतः महापुरुषांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करताना सिनेमॅटिक लिबर्टी विकृतीकडे जाणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मनोरंजनाच साधन असणारे चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या अर्थकारणातून न बघता समाजकारणातूनही बघणं महत्त्वाचं आहे.खऱ्या इतिहासाच्या मांडणीसाठी तसेच पुस्तकांचं वाचन कमी करणा-या आणि 'अटेंशन स्पॅन कमी होत असणाऱ्या पिढ्यांसाठी' पावलं उचलावी लागतील. खऱ्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या विचारवंतांच्या,लेखकांच्या लेखनावर आधारित चित्रपट निर्मिती होणे गरजेच आहे.त्यासाठी विश्वसार्यता असणाऱ्या तात्कालीन संदर्भ ग्रंथांचा उपयोग झाला पाहिजे. ✍️