Tuesday 19 December 2023

मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात

मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात. कारण मैदानी खेळ हे आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
नैसर्गिक संकटात,आपत्कालीन परिस्थितीत ओपन स्पेस मोकळ्या असल्यास उपयोगी ठरतात. याखेरीज ओपन स्पेस आणि मोफत खेळाच्या मैदानांचा उपयोग मुलांच्या शारीरिक,बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे अन्यथा ही मुलं चौका चौकातील कट्ट्यांवर टवाळक्या करताना दिसू शकतात किंवा मोबाईल मध्ये आर्थिक आमिष दाखवणारे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यास बाधक खेळ खेळू शकतात.
ओपन स्पेस चा उपयोग समाजातील प्रत्येक घटकासाठी एक बाग म्हणून आणि मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण म्हणून असले पाहिजे कारण खाजगी जागेत क्वचितच कोणी मुलांना मोफत खेळू देईल,काही ठिकाणी तासांवर पैसे देऊन खेळण्याची सोय आहे असे असले तरी मुलांच्या खेळण्याच्या हक्काच्या जागेवर जर इतर कुठलाही प्रकारच काही उभारल जात असेल तर मग त्यांनी कुठे जावे? कारण खिशात पैसे नसताना देखील मैदानावर घाम गाळता आला पाहिजे म्हणजे शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मैदानावरील सांघिक खेळामुळे संघभावनाही वाढीस लागेल.तुमच्या परिसरातील ओपन स्पेस फक्त मुलांना खेळण्यासाठी आणि गरज़ वाटल्यास शांतपणे अभ्यासासाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत का ?

Wednesday 6 December 2023

शिक्षकांनी न शिकवता मुल हे कुठून शिकले ?

आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी परिपाठात भयंकर अनुभव आला. विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या विनम्र अभिवादनानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना परिपाठात प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीला किरकोळ अपघात झाल्यास तुम्ही काय काय उपाययोजना कराल ?कशा पद्धतीने मदत कराल? सर्वसाधारणपणे अशा वेळेला प्रथमोपचार करू, अपघात झालेल्याला धीर देऊ,उपचारांसाठी दवाखान्यात नेऊ वगैरे वगैरे अशी उत्तरे येत असतात परंतु आज भयंकर उत्तर आलं. उत्तर असं होतं की, आम्ही अपघात झालेल्या व्यक्तीला एक लोटा जल अर्पण करायला सांगू म्हणजे तो लवकर बरा होईल आणि त्याच्या सर्व समस्या दूर होतील हे उत्तर ऐकून शिक्षक एकमेकांकडे बघू लागले आणि त्याच वेळेला वातावरण ढगाळ होत मी आकाशाकडे बघत होतो आकाशात नको असलेल्या ढगांच्या गर्दीतून लख्ख सूर्यप्रकाशासाठी ... विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जरी शिकवला जात असला तरी विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,विविध माध्यमावरील भाकड कथांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. कारण विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो.. विद्यार्थ्यांसह समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावे लागणार आहे ,त्यासाठी राज्यघटनेनुसार कायद्याच मोठ पाठबळ आपल्याला आहे हे विसरता कामा नये.आपली भारतीय राज्यघटना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत अपेक्षा करते (There is one duty that is unique to India under Article 51A (h) that encourages the citizen to “develop scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform".) *'वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधकबुद्धी,सुधारणावाद मानवतावाद याचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.* वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी शिक्षकांची आणि सर्वच व्यवस्थांची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य असलं तरी सामुदायिक मानवतावाद आणि विवेकवादास ते बाधक होता कामा नये... म्हणून प्रत्येक व्यक्तीने आणि सर्वच माध्यमांनी जबाबदारीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे भान ठेवले पाहिजे आणि अवैज्ञानिक,अंधश्रद्धा वाढवणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार आणि उदात्तीकरण न करता विरोध केला पाहिजे.