Tuesday 29 August 2023

Because everything excess is a poison.

 एक श्रीमंत व्यापारी होता त्याच्याकडे ऐश आरामाची सर्व साधन होती . पैसा, दाग दागिने ,गाडी, बंगला,  फॅक्टरी सगळं सगळं कशाची कमी नव्हती .

त्याचा  अत्यंत विश्वासू असा  कार ड्रायव्हर होता. प्रामाणिक ड्रायव्हरला गाडी चालवण्या खेरीज इतर भरपूर काम मालक सांगत होते जसे की बँकेत जाऊन भरणा करून येणे,बाजार करने इत्यादी.तेवढेच काय पण फॅक्टरी मधील काही कारकुनी   काम देखील त्याला करावी लागत होती.मालकाच्या घरात त्याच्या नवीन प्लांटची काम चालू असल्यामुळे गेल्या आठवड्याभरात मालकाच्या ड्रायव्हरची पुरेशी झोपही झाली नव्हती. त्याला फक्त ड्रायव्हिंगचे काम असते तर कदाचित झाली असती झोप परंतु इतर कामांमुळे त्याच आरोग्यच बिघडलं होतं. मालकांशी जुने संबंध असल्यामुळे, मालकाची आणि मालकाच्या परिवाराची काळजी असल्यामुळे तो काही बोलत नव्हता अशातच एक दिवस मालकांनी त्या ड्रायव्हरला मालकांचा एकुलता एक मुलगा,सुनबाई आणि सहा महिन्याच्या त्यांच्या लाडक्या नातूला घेऊन येण्यासाठी एअरपोर्टवर जाण्यास सांगितले ड्रायव्हरने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या ऐवजी कोणालातरी पाठवा. शेवटी मालकाच्या प्रेमापोटी आणि आग्रहामुळे ड्रायव्हर मालकांच्या एकुलत्या एक मुलाला आणि त्याच्या परिवाराला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचला तो ड्रायव्हर खूप थकला होता एअरपोर्टवरून साहेबांच्या बंगल्याकडे येणाऱ्या वाटेत त्याची डुलकी लागली आणि एका भीषण अपघातात ड्रायव्हरसह मालकाने आपला मुलगा सून आणि आपला नातू देखील गमावला. आणखी एका नवीन उद्योगाच्या उभारणीचं काम सुरू असताना सार विस्कटलं....

एकदा ड्रायव्हर मालकाला म्हणाला होता, "साहेब दुसऱ्या ड्रायव्हरची अपॉइंटमेंट करून टाका मी तुमच्या फॅक्टरीमध्ये कारकूनाची नोकरी करायला तयार आहे". परंतु मालकांनी "तू हुशार आहे, अधिक प्रामाणिकपणे काम करू शकतो आणि तू तुझे काम करून इतर कामही करू शकतोस,तू उत्कृष्ट चालक देखील आहेस" अशी बिरूदे लावली.मुळात ड्रायव्हर असलेल्या आपल्या कर्मचाऱ्याला सारखी इतरही कामे लावली जी मुळात त्याची नव्हतीच. कुठल्याही व्यक्तिला त्याला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त काम दिल्यास नेमून दिलेल्या कामात तर त्याची गुणवत्ता ढासळते पण इतर कामही तो शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडल्यामुळे व्यवस्थित करू शकत नाही.

कुठल्याही व्यक्तीला त्याच्या नेमून दिलेल्या कामाशिवाय इतर अतिरिक्त कामांचा भडिमार केल्यास काय होऊ शकतं हे आपल्यासारख्या वाचकांना कळाल असल्यामुळे या गोष्टीचं तात्पर्य मी तुम्हाला वेगळ ते काय सांगणार.....

- शैलेश 

(सदर गोष्ट ही काल्पनिक आहे याचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही तसा तो असल्यास तो केवळ योगायोग समजावा.)




Tuesday 15 August 2023

शिक्षण व्यवस्थेतील सुधारणावादाचा चेंडू कोणत्या कोर्टात...?

OMG-2 चित्रपटातील सुधारणावादाला धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या सनातन्यांकडून विरोध होऊ नये म्हणून हेतू पुरस्करपणे शिव दूत चित्रपटात आहे. चित्रपट पाहताना हे आवर्जून जाणवलं की OMG 1 मधून नाराज झालेल्या सनातनी तसेच धार्मिक कर्मकांड करणाऱ्यांना खुश ठेवून सुधारणावाद मांडला गेला.

 OMG च्या पहिल्या भागात धार्मिक कर्मकांडावर मार्मिकपणे टीका केली गेली होती, अर्थात परमेश्वराची खरी भक्ती न ओळखणारे काही संधी साधू लोक कशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरवून भाबड्या भक्तांची फसवणूक करतात हे दाखवले होते.या वेळेला धार्मिक कर्मकांडावर टीका न करता, रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या व्यवस्थेलाही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक सुधारणावाद मांडताना खऱ्या निस्सीम धार्मिकतेचाच उपयोग केला गेला आहे हे विशेष.

 या चित्रपटात स्त्री स्वातंत्र्याचे,स्त्री शिक्षणाचे तसेच सुधारणावादाचे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरां ऐवजी शिवदूताच्या माध्यमातून भूमिका मांडली गेली तर कांतीभाई (पंकज त्रिपाठी) यांनी केलेले भूमिका ही रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या ऐवजी दाखवली गेली असे मला व्यक्तिशः जाणवले. लैंगिक शिक्षणासाठी 1934 साली रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या 'समाज स्वास्थ' मासिकाच्या माध्यमातून पहिला खटला लढवणारे समाज सुधारक लैंगिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रघुनाथ धोंडो कर्वे होते.

 भारतात सर्वप्रथम सेक्स एज्युकेशन आणि संतती नियमांनावरील एक खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला त्यावेळेला सनातन्यांनी, काही धार्मिक व्यवस्थांनी, लोकांनी बाबासाहेबांना आणि समाज सुधारक र.धो. कर्वे यांना विरोध केला.बाबासाहेब खटला हरले जरूर परंतु समाज स्वास्थ्यासाठी,समाजाच्या शिक्षणासाठी सुधारणावादी बाबी किती आवश्यक आहे हे जगाला समजावून सांगितले.बाबासाहेब वेळेच्या कितीतरी आधी विचार करत होते.आधुनिक भारताची रचना होत असताना बाबासाहेबांचे योगदान सर्वार्थाने खूप मोठे असल्याचं वेळोवेळी जाणवते.

समाज सुधारक र.धो. कर्वेसह  बाबासाहेबांना हा देखील विश्वास होता की एक दिवस लैंगिक शिक्षणाची गरज सर्वांना जाणवेल.आज नॅनो टेक्नॉलॉजीच्या, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक जगात लैंगिक शिक्षणाच्या गरजेवर समाजाचे डोळे उघडणारा चित्रपट जरूर बनला आहे पण कुठेही समाज सुधारक र.धो. कर्वे यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मात्र नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यवस्थेने सुधारणा वादाला विरोध केला तीच व्यवस्था चित्रपटात शिव दूताच्या दैवी प्रबोधनानंतर सुधारणावादाचा पुरस्कार करताना दिसून आली.

चित्रपटात परंपरावादी गृहस्थ मुलाचा बचाव करत असताना हा सेक्स एज्युकेशन च्या बाजूने भूमिका मांडणारा तर उच्चशिक्षित महिला वकील आपल्या शैक्षणिक संस्थांचा बचाव करताना सेक्स एज्युकेशनच्या विरोधात बाजू मांडणारी दाखवली आहे, उच्चशिक्षित (जर ती व्यक्ति सुशिक्षित असेल तर)  व्यक्ती ही सुधारणावादाकडे झुकत माप देणारी असते तर परंपरावादी व्यक्ती ही पुरोगामी विचारांच समर्थन करणारी असते असे आपल्याला सर्वसाधारणपणे दिसत असल्यामुळे काहींना ते विरोधाभासी वाटेलही हा ज्याच्या त्याच्या विचार करण्याचा भाग असू शकतो. बाबासाहेबांची प्रतिमा चित्रपटात दाखवली असली तरी बाबासाहेबांचा उल्लेख आवर्जून टाळला (अर्थात सुधारणावादाच क्रेडिट बाबासाहेबांना आहेच), याखेरीज सेक्स एज्युकेशन देणाऱ्या लेण्यांचा ओझरता उल्लेख केला गेला. आणि समाज सुधारक रघुनाथ धोंडोकर्वे (सुधारक धोंड केशव कर्वे यांचे चिरंजीव) यांचा कुठलाही संदर्भ आणि नामोल्लेखही नाही,इतर अनेक संदर्भ जोडण्याचा मात्र smartly प्रयत्न केला आहे. धर्माची खरी ओळख पटवून देण्याचा चांगला प्रयत्न केल्याबद्दल चित्रपट निर्मितीतील सर्वांच कौतुक.चित्रपट सर्वानी आवर्जून पहावा असा आहे. 

भारतीय शिक्षणातील लॉर्ड मेकॅलच्या धोरणांवर (नव्हे हस्तक्षेपावर) टीका करून दैदीप्यमान भारतीय संस्कृतीचा संदर्भ चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपट कुटुंब व्यवस्थेसह संपूर्ण समाजाकडूनही पुरोगामीत्वाची अपेक्षा करतो जी अगदी रास्त आहे. सेक्स एज्युकेशन च्या आवश्यकतेवर आणि ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या सेक्स एज्युकेशन बाबत चित्रपट आहे पण त्यांना बघण्यासाठी सध्या allow नाही. आपल्या भारतीयांच्या निस्सिम भक्तीच प्रतीक असणारे शिव दूत दाखवल्या गेल्यामुळे सुधारणावादाला याचा चांगला उपयोग होईल अशी आशा व्यक्त करूयात. 

जय महाकाल ✍️

Monday 14 August 2023

हल्ली ढगांच आणि पावसाचे गणित कागदावरच्या गुणवत्ते सारख आहे, म्हणजे क्षमता (पोटेन्शिअल) प्रचंड आहे पण हवे तसे ढग बरसतच नाहीत असंच काहीसं माणसातील काही माणसांचही झालय.. या ठिकाणी ढगांची क्षमता म्हणजे ढगांमध्ये पाणी आहे पण सातत्याने एवढे पळापळ करत आहेत,एवढे वाहत आहेत की त्यांना बरसायलापण वेळ नाहीये. म्हणून जमीन तशीच तहानलेली,अर्धवट.., अगदी कागदावरच्या कृती आराखड्यासारखी....

Sunday 13 August 2023

आज खूप भरून आलय म्हणून लिहीन म्हणतो.. पण आकाशातल्या ढगांच्या गर्दीवर, निसर्ग आणि प्रेमावरची कविता करू की मनात भरून आलेल्या सामाजिक, राजकीय अस्वस्थतेच्या ढगांबद्दल...

निसर्ग आणि प्रेमावर लिहिणाऱ्या लेखक कवींचा अभिमान नक्कीच आहे परंतु आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणं देखील या देशातील लेखक, कवी,विचारवंतांचे कर्तव्य नाही का ?   रीडिंग फॉर प्लेझर आवश्यक आहेच पण रायटिंग अँड  रीडिंग फॉर अवेअरनेस जास्त महत्त्वाच आहे हल्ली.
महिला कुस्तीगीरांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात खरंतर भारतातील सर्व महिला संघटनांसह
सर्व संघटनांनी स्वतः अभ्यास करून महिला खेळाडूंना न्याय देण्याची गरज आहे,
देशभरातून निष्पक्ष चौकशीची तसेच जर कोणी दोषी असेल तर कारवाई करण्याची मागणी घराघरातून व्हायला हवी होती
पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही.
म्हणून लेखनी
मित्रांनो आपण चुकीच्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे.
यासंदर्भाने आज मार्टिन ल्युथर किंग यांची सहजच आठवण झाली,ते म्हणतात...
Injustice anywhere is threat.to justice everywhere.
म्हणे माणसानं प्रगती केली.
जुळणारी मनं नेहमीच दूर केली.
म्हणे माणसानं प्रगती केली.
त्यांनी रावणाची टोळी तर,
रामाची झोळी केली,
समानतेची नुसतीच भाषा तर
गावाबाहेर वाडी केली.
म्हणे माणसानं प्रगती केली...
सुविधांच्या पातळीवर म्हणे आमचा विकास झालाय,
पण माणुसकीच्या स्तरावर खालची पातळी गाठली.
देवळातही त्यांनी भ्रष्ट्राचाराची स्पर्धा केली,
आपल्याच घरात चोरी करून विषमतेची दरी केली,
म्हणे माणसानं प्रगती केली.
द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या एकलव्यांच्या देशात,
खेळात राजकारण आणि राजकारणात द्वेषाची खेळी केली,
म्हणे माणसानं प्रगती केली...
महात्म्याच्या विचाराची पायमल्ली अन् महात्म्यांची केवळ स्मारकं केली,
लिंग समभावाचे धडे शिकूनही फक्त सितेचीच अग्निपरीक्षा घेतली,
म्हणे माणसानं प्रगती केली. - शैलेश शिरसाठ.
माझ्या
'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव.

बागेत एकाच प्रकारची फुलं असावीत हा अट्टाहास कशासाठी ? सर्व फुले झाडांनी समृद्ध वन जोपासली पाहिजे नाहीतर विष वृक्ष वाढू शकतात. आता हे आपण ठरवायचं की आपण आपल्या शेजारच्या धर्मांध राष्ट्रासारखं एकाच प्रकारचे फुल असाव, कुंडीतलं बॉन्साय (bonsai) सारखं वाढ खुंटलेल एकच प्रकारचं रोपट हव की विविध प्रकारच्या सुंदर फुलांनी बहरलेली बाग...


प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या.

पुष्पा-2 म्हणजे पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग पुढील काही महिन्यात येणार आहे पण एक भाकीत तुम्हा सगळ्यांनाआत्ताच सांगतो ते म्हणजे पुढच्या वर्षभरात कुठल्याही चित्रपटात एवढ्या टाळ्या आणि शिट्ट्या वाजणार नाही ते पुष्प चित्रपटातील दृश्यांना वाजणार आहेत. त्यातील सर्वाधिक टाळ्या आणि शिट्ट्या घेणारा प्रसंग तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. चित्रपटातील एका प्रसंगात पुष्पा हा जिवंत असून एका जंगलात आढळला आहे अशी ब्रेकिंग न्यूज एका टीव्ही चॅनल वर येते आणि ते चॅनेल त्याचे फुटेज प्रदर्शित करतात ते फुटेज पाहिल्यावर चित्रपटगृहात चित्रपटाच्या कथानकाशी एकरूप झालेले काही प्रेक्षक प्रचंड शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतील त्या 2024 च्या वर्षातील सर्वाधिक टाळ्या आणि शिट्ट्या असतील. आणि त्या वेळच्या तुम्हा प्रेक्षकांना आणि आताच्या वाचकांना माझ्या या लेखाची आठवण होईल एवढेच.... इन ऍडव्हान्स
सुप्रसिद्ध अर्थतज्ञ विश्वास उगटी सरांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली त्यात इलेक्ट्रॉल बॉण्डचाही विषय होता.. त्यावेळी सरांनी सांगितले होते की हा विषय राहुल गांधींनी 2017 18 मध्ये अनेक वेळा मांडला..

Wednesday 9 August 2023

अश्रूंच्या नकळत जखमांशी सलगी करणाऱ्या,भान गमावून बसलेल्या माध्यमांकडून अपेक्षा नाही, आता माध्यमांचा वापर करणाऱ्यांनीच भान ठेवायला हवं नाहीतर माध्यमे भूल देत राहतील आणि व्यवस्था हव्या तशा शस्त्रक्रिया करत राहतील...
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️
शैलेश शिरसाठ.