आज खूप भरून आलय म्हणून लिहीन म्हणतो.. पण आकाशातल्या ढगांच्या गर्दीवर, निसर्ग आणि प्रेमावरची कविता करू की मनात भरून आलेल्या सामाजिक, राजकीय अस्वस्थतेच्या ढगांबद्दल...
निसर्ग आणि प्रेमावर लिहिणाऱ्या लेखक कवींचा अभिमान नक्कीच आहे परंतु आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींवर लिहिणं देखील या देशातील लेखक, कवी,विचारवंतांचे कर्तव्य नाही का ? रीडिंग फॉर प्लेझर आवश्यक आहेच पण रायटिंग अँड रीडिंग फॉर अवेअरनेस जास्त महत्त्वाच आहे हल्ली. महिला कुस्तीगीरांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात खरंतर भारतातील सर्व महिला संघटनांसह सर्व संघटनांनी स्वतः अभ्यास करून महिला खेळाडूंना न्याय देण्याची गरज आहे,देशभरातून निष्पक्ष चौकशीची तसेच जर कोणी दोषी असेल तर कारवाई करण्याची मागणी घराघरातून व्हायला हवी होती पण दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. म्हणून लेखनी मित्रांनो आपण चुकीच्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे. यासंदर्भाने आज मार्टिन ल्युथर किंग यांची सहजच आठवण झाली,ते म्हणतात... Injustice anywhere is threat.to justice everywhere. म्हणे माणसानं प्रगती केली. जुळणारी मनं नेहमीच दूर केली. म्हणे माणसानं प्रगती केली. त्यांनी रावणाची टोळी तर, रामाची झोळी केली, समानतेची नुसतीच भाषा तर गावाबाहेर वाडी केली. म्हणे माणसानं प्रगती केली... सुविधांच्या पातळीवर म्हणे आमचा विकास झालाय, पण माणुसकीच्या स्तरावर खालची पातळी गाठली. देवळातही त्यांनी भ्रष्ट्राचाराची स्पर्धा केली, आपल्याच घरात चोरी करून विषमतेची दरी केली, म्हणे माणसानं प्रगती केली. द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या एकलव्यांच्या देशात, खेळात राजकारण आणि राजकारणात द्वेषाची खेळी केली, म्हणे माणसानं प्रगती केली... महात्म्याच्या विचाराची पायमल्ली अन् महात्म्यांची केवळ स्मारकं केली, लिंग समभावाचे धडे शिकूनही फक्त सितेचीच अग्निपरीक्षा घेतली, म्हणे माणसानं प्रगती केली. - शैलेश शिरसाठ. माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव.
No comments:
Post a Comment