Thursday, 29 June 2023

भक्ती सागरात मानवाला जोडणारा सुधारणावादी संप्रदाय- वारकरी संप्रदाय.

दरवर्षी विठुरायाकडे पावसासाठी आपण साकडं  घालत असतो यंदा मात्र जाती-धर्मातील भेदाभेद आणि तिरस्कार नाहीसा होऊन  महाराष्ट्रसह जगात विश्वबंधुत्वासाठी आणि एकात्मतेसाठी साकडं घालावसं वाटतं...✍️
भक्ती सागरात मानवाला जोडणारा सुधारणावादी संप्रदाय- वारकरी संप्रदाय. भक्तिमार्गाने ईश्वर प्राप्ती ज्यात कोणत्याही दलालाची आवश्यकताच नाही ही जगत गुरु तुकोबारायांची शिकवण शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वांनाच भक्तिभावाने विठ्ठलाशी जोडते म्हणूनच भक्ती सागरात कुठलाही भेदाभेद न करता मानवाला जोडणारा सुधारणावादी विचार महत्वाचा आहे आणि असा विचार विश्वाला देणारा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. म्हणून मला व्यक्तिशः असं वाटतं आपला हा संप्रदाय खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे कारण तो कुठलीच भेदाभेद करत नाही. भाविक भक्तांचे विठ्ठला प्रति भोळा भक्ती भाव आहे आणि विठ्ठलाच्या हातात देखील भीती दाखवण्यासाठी कुठलेही शस्त्र नाही कारण कोणाबद्दल द्वेष,संहाराचा आणि हिंसेची भावनाच नाही हातातून आश्वासन,आमिष,प्रलोभन दाखवणारी प्रतीके देखील नाही.सर्वसामान्यांचा,कष्टकऱ्यांचा देव असल्यामुळे कुठल्या सिंहासनावर देखील नाही,उच्च-नीच असा भेद नसल्याने सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर,विटेवर ते आहे,कुठल्याच प्राणीमात्रावर आरुढ नाही, समतेचा आणि लिंगसमभावाचा संदेश देणारा देव आपल्या सोबत माता रुक्माईला देखील त्याच उंचीवर ठेवतात. या चांगल्या परंपरेचे अपहरण होऊ नये म्हणून  सुधारणावादी पुरोगामी विचाराच्या लोकांना विशेष सतर्क असल पाहिजे  कारण खऱ्या अर्थाचे सुशिक्षित लोक ज्या वेळेला आपल्या चांगल्या परंपरा दुर्लक्षित करतात त्यावेळेला त्यात भेदभाव करणाऱ्यांची घुसखोरी वाढते.

 जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपले अभंगात विश्वबंधुत्व स्पष्ट करताना सांगतात की,

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१ 

आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ।।२।।                                                        

कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।। 

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।४।।


दांभिक,कर्मठ विचाराचे, संविधान नाकारून जातीभेद मांडणारे आणि धर्मांधता वाढवणारे लोक ज्यावेळेला असतात अशा परिस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या भक्तीभावासह शांतता आणि बंधूभावासाठी असणाऱ्या मौलिक विचारांची सर्वाधिक आवश्यकता असते. 

 I जय हरी विठ्ठल l 

सर्व वाचकांना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा - ✍️ 

शैलेश शिरसाठ. 

 shaileshshirsath.blogspot.com

आपण सारीच परमेश्वराची लेकरं आहोत.  परमेश्वराने आपल्या अंगी दिलेले कलागुणांचा उपयोग ज्या वेळेला आपण जाती,धर्म आणि देशांच्या सीमा ओलांडून करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराची भक्ती करत असतो असं मी व्यक्तिशः मानतो. त्याचाच एक भाग म्हणून सुंदर भक्ति गीत. जे गायलं आहे आपल्याच  पृथ्वीवरची काश्मिरी भगिनी शमीमा अख्तर यांनी. 
भक्ती गीत गाणाऱ्या आपल्या  भगिनींच्या कपाळावर जरी कुंकू नसला तरी तिच्या ठाई असलेली कलेची आणि त्या माध्यमातून असलेली परमेश्वराची भक्ती आपण विवेकवादी विचाराचे असला तर नक्की आपल्याला जाणवेल म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण  'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना '

2 comments: