लघुकथा
आटपाट नगर होते त्या राज्यात एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव राजा विक्रम.राजाचा एक सेवक होता विनू.विनू हा राजाशी अतिशय प्रामाणिक होता राजाची उत्तम प्रकारे सेवा करणारा राजाचा आवडता सेवक होता.राजाचे हात पाय चेपून देणे,डोक्याची अतिशय उत्कृष्ट अशी मॉलिश करणे, राजाने सांगितलेले जड अवजड काम तो आनंदाने करायचा आणि असं करून राजाला खुश ठेवायचा. विनूला बुद्धीची कामं येत नसली तरी कष्टाचे काम मात्र तो राजासाठी करायचा आणि सतत राजाची स्तुती करायचा.
यादरम्यान शेजारच्या राज्यातील राजाने खूप मोठ्या प्रमाणात सैन्यबळ उभे करण्यास सुरुवात केली त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे देखील खरेदी केली. ही बाब राजा विक्रमच्या चाणाक्ष हुशार आणि प्रामाणिक प्रधानाच्या लक्षात आली.
एके दिवशी राजा दिवसभराची शिकारी करून दमून आल्यावर आपल्या सेवका सोबत आराम महालात बसला होता. प्रधानाने राजा विक्रमला भेटण्याची परवानगी मागितली.राजा विक्रमने प्रधानाला आपल्या महालात बोलावुन घेतले. प्रधानाने राजाला शेजारच्या राज्यातील सैनिकी हालचालींबद्दल सूचना दिली आणि आपल्या राज्यात देखील शेजारच्या राज्यापेक्षा अधिक चांगला सैनिकी लवाजमा असावा अशी इच्छा व्यक्त केली हे ऐकता बरोबर राजाचा सेवक विनू प्रधानाला म्हणाला "म्हणजे आपल्या राज्याचे सैन्य शेजारच्या राज्यापेक्षा कमी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? आपले राजा आणि आपल्या सैन्य कोणा पेक्षाही कमी नाही त्यामुळे तुम्ही आपल्या सैन्याच्या चुका दाखवून नकारात्मकता पसरवू नका आपल्याला कोणापासूनही काहीही धोका नाही कारण आपले राजे खूप शूर,पराक्रमी आणि सुंदर आहेत. विनू चे उत्तर ऐकून राजा खूश झाला माझा सेवक माझी किती स्तुती करत आहे आणि तो खरं बोलत आहे म्हणून राजाने प्रधानाला त्याचं पद सोडण्यास सांगितले आणि त्याच्या रिक्त झालेल्या पदावर त्याचा सेवक विनू ची नियुक्ती राज्याचा नवीन प्रधान म्हणून केली. सेवक विनू राजाची रोज स्तुती करे आणि त्याची खूप सेवा करत असे राजा विनूवर अधिकाधिक खुश झाला आणि प्रधानाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसातच शेजारच्या राज्याने पूर्ण ताकदीनिशी राजा विक्रमाच्या राज्यावर हल्ला केला आणि राजा विक्रमचा दारुण पराभव झाला.
लेखक- शैलेश शिरसाठ
No comments:
Post a Comment