OMG-2 चित्रपटातील सुधारणावादाला धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धा मानणाऱ्या सनातन्यांकडून विरोध होऊ नये म्हणून हेतू पुरस्करपणे शिव दूत चित्रपटात आहे. चित्रपट पाहताना हे आवर्जून जाणवलं की OMG 1 मधून नाराज झालेल्या सनातनी तसेच धार्मिक कर्मकांड करणाऱ्यांना खुश ठेवून सुधारणावाद मांडला गेला.
OMG च्या पहिल्या भागात धार्मिक कर्मकांडावर मार्मिकपणे टीका केली गेली होती, अर्थात परमेश्वराची खरी भक्ती न ओळखणारे काही संधी साधू लोक कशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरवून भाबड्या भक्तांची फसवणूक करतात हे दाखवले होते.या वेळेला धार्मिक कर्मकांडावर टीका न करता, रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या व्यवस्थेलाही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक सुधारणावाद मांडताना खऱ्या निस्सीम धार्मिकतेचाच उपयोग केला गेला आहे हे विशेष.
या चित्रपटात स्त्री स्वातंत्र्याचे,स्त्री शिक्षणाचे तसेच सुधारणावादाचे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरां ऐवजी शिवदूताच्या माध्यमातून भूमिका मांडली गेली तर कांतीभाई (पंकज त्रिपाठी) यांनी केलेले भूमिका ही रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या ऐवजी दाखवली गेली असे मला व्यक्तिशः जाणवले. लैंगिक शिक्षणासाठी 1934 साली रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या 'समाज स्वास्थ' मासिकाच्या माध्यमातून पहिला खटला लढवणारे समाज सुधारक लैंगिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रघुनाथ धोंडो कर्वे होते.
भारतात सर्वप्रथम सेक्स एज्युकेशन आणि संतती नियमांनावरील एक खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला त्यावेळेला सनातन्यांनी, काही धार्मिक व्यवस्थांनी, लोकांनी बाबासाहेबांना आणि समाज सुधारक र.धो. कर्वे यांना विरोध केला.बाबासाहेब खटला हरले जरूर परंतु समाज स्वास्थ्यासाठी,समाजाच्या शिक्षणासाठी सुधारणावादी बाबी किती आवश्यक आहे हे जगाला समजावून सांगितले.बाबासाहेब वेळेच्या कितीतरी आधी विचार करत होते.आधुनिक भारताची रचना होत असताना बाबासाहेबांचे योगदान सर्वार्थाने खूप मोठे असल्याचं वेळोवेळी जाणवते.
समाज सुधारक र.धो. कर्वेसह बाबासाहेबांना हा देखील विश्वास होता की एक दिवस लैंगिक शिक्षणाची गरज सर्वांना जाणवेल.आज नॅनो टेक्नॉलॉजीच्या, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक जगात लैंगिक शिक्षणाच्या गरजेवर समाजाचे डोळे उघडणारा चित्रपट जरूर बनला आहे पण कुठेही समाज सुधारक र.धो. कर्वे यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मात्र नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यवस्थेने सुधारणा वादाला विरोध केला तीच व्यवस्था चित्रपटात शिव दूताच्या दैवी प्रबोधनानंतर सुधारणावादाचा पुरस्कार करताना दिसून आली.
चित्रपटात परंपरावादी गृहस्थ मुलाचा बचाव करत असताना हा सेक्स एज्युकेशन च्या बाजूने भूमिका मांडणारा तर उच्चशिक्षित महिला वकील आपल्या शैक्षणिक संस्थांचा बचाव करताना सेक्स एज्युकेशनच्या विरोधात बाजू मांडणारी दाखवली आहे, उच्चशिक्षित (जर ती व्यक्ति सुशिक्षित असेल तर) व्यक्ती ही सुधारणावादाकडे झुकत माप देणारी असते तर परंपरावादी व्यक्ती ही पुरोगामी विचारांच समर्थन करणारी असते असे आपल्याला सर्वसाधारणपणे दिसत असल्यामुळे काहींना ते विरोधाभासी वाटेलही हा ज्याच्या त्याच्या विचार करण्याचा भाग असू शकतो. बाबासाहेबांची प्रतिमा चित्रपटात दाखवली असली तरी बाबासाहेबांचा उल्लेख आवर्जून टाळला (अर्थात सुधारणावादाच क्रेडिट बाबासाहेबांना आहेच), याखेरीज सेक्स एज्युकेशन देणाऱ्या लेण्यांचा ओझरता उल्लेख केला गेला. आणि समाज सुधारक रघुनाथ धोंडोकर्वे (सुधारक धोंड केशव कर्वे यांचे चिरंजीव) यांचा कुठलाही संदर्भ आणि नामोल्लेखही नाही,इतर अनेक संदर्भ जोडण्याचा मात्र smartly प्रयत्न केला आहे. धर्माची खरी ओळख पटवून देण्याचा चांगला प्रयत्न केल्याबद्दल चित्रपट निर्मितीतील सर्वांच कौतुक.चित्रपट सर्वानी आवर्जून पहावा असा आहे.
भारतीय शिक्षणातील लॉर्ड मेकॅलच्या धोरणांवर (नव्हे हस्तक्षेपावर) टीका करून दैदीप्यमान भारतीय संस्कृतीचा संदर्भ चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपट कुटुंब व्यवस्थेसह संपूर्ण समाजाकडूनही पुरोगामीत्वाची अपेक्षा करतो जी अगदी रास्त आहे. सेक्स एज्युकेशन च्या आवश्यकतेवर आणि ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या सेक्स एज्युकेशन बाबत चित्रपट आहे पण त्यांना बघण्यासाठी सध्या allow नाही. आपल्या भारतीयांच्या निस्सिम भक्तीच प्रतीक असणारे शिव दूत दाखवल्या गेल्यामुळे सुधारणावादाला याचा चांगला उपयोग होईल अशी आशा व्यक्त करूयात.
जय महाकाल ✍️