Tuesday, 16 April 2024

दोन अति लघुकथा..
देश पारतंत्र्यात असताना तो स्वातंत्र होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशभक्त सेनानी असणाऱ्या,हृदयाची जटिल शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या 90 वर्षाच्या वडिलांना टॅक्सी मधून घेऊन जाणारा मुलगा टॅक्सीवाल्याला विनंती करत होता की हळू आवाजात गाणी वाजवा परंतु टॅक्सीतील इतर प्रवाशांसह टॅक्सी ड्रायव्हर यांची दोन विरुद्ध तीन अशी मेजॉरिटी असल्यामुळे शेवटी जोरात गाणी वाजवण्याचा निर्णय कायम झाला आणि कर्णकर्कश संगीताच्या बिट्स चालू राहिल्यात आणि लोकशाहीवादी असणाऱ्या आजोबांच्या बिट्स कायमच्या बंद झाल्या.....
मताधिक्याने झालेल्या निर्णयाच तात्पर्य वाचकांनी ठरवावं की,मानवतावादी विचार महत्त्वाचा की उन्मत्त बहुसंख्यीय भावनाहीन मताधिक्य...
आटपाट नगर होते प्रचंड संख्येने उपस्थित भाविकांची मिरवणूक निघाली होती लोक मोठ्या व्यक्तीभावाने त्यात नाचत होते परंतु मिरवणुकीत सुमधुर गाण्यांच्या ऐवजी कर्णकर्कश घोषणांसह मिरवणूक सुरू होती. अबाल वृद्धांसह विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत होता पण बोलायला कोणी तयार नव्हत. मिरवणुकीतील एका सहृदयी (?)व्यक्तीच्या हे लक्षात आले परंतु बहुसंख्य लोकांची इच्छा मिरवणूक मोठ्या आवाजातच निघाली पाहिजे अशी असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला परंतु असे असले तरी मिरवणुकीतून मात्र बाहेर न पडता मिरवणुकीचाच एक भाग होऊन ती व्यक्तीही नाचू लागली.
आता मिरवणुकीतला तो खरा प्रश्नांकित सह्रदयी मीच असं मिरवणुकीतील प्रत्येकाला वाटत असेल तर नवलच.....
(सदर कथा या काल्पनिक असून त्याचा कोणत्याही घटनेशी तसेच कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही तो तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

Sunday, 7 April 2024

विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून,भाकड अवैज्ञानिक प्रवचनांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो.
विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे म्हणजे ते ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटनेकडे का? कोठे ? कसे ? अशा जिज्ञासा वृत्तीने बघतील आणि विवेकाने जाणून घेतील.
ग्रहण समज गैरसमज विद्यार्थ्यांना का? कोठे ? कसे ? अशा पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक जिज्ञासेला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून, विवेकाने स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, मग प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमात ग्रहणाचा पाठ असो किंवा नसो.
विविध वैज्ञानिक प्रयोग आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून ग्रहणांसह सर्वाच घटनांविषयी विद्यार्थ्यांत कार्यकारणभाव समजून घेणे वाढेल आणि गैरसमज दूर होतील.

Wednesday, 3 April 2024

एका एकत्र कुटुंबात आजीने खूप रुचकर स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता परिवारात 10 शाळकरी मुलं होती त्यापैकी फक्त तीन मुलांनीच व्यवस्थित जेवण केले.
आजीने सर्व मुलांना आग्रहाने वाढले परंतु उरलेल्या सात मुलांना भूक नव्हती ,खायची इच्छाच होत नव्हती.आजी त्यांना प्रेमाने भरवायला देखील तयार होती आणि आजोबा मात्र आजी वर चिडले आणि आजीने बनवलेला स्वयंपाक आणि घेतलेली मेहनत याचा कुठलाही विचार न करता आजीलाच उलट दोष देऊ लागले.
आजी म्हणाली तुम्ही स्वादिष्ट रुचकर आणि सकस आहार मेहनतीने आणि प्रेमाने बनवू शकतात, खाणाऱ्यांसाठी ताट तयार करून देऊ शकतो.खूप काळजी आणि प्रेम म्हणून तोंडात घासही भरून देऊ शकतो परंतु तो आनंदाने ग्रहण करून,चावून पचवण्याचं काम मात्र मुलांना कराव लागेल अर्थात हे सगळं तेव्हा ज्या वेळेला मुलांमध्ये भूक असेल भूकच नसल्यास ते कसे खाणार.
आजोबांचं जेवण झालं होतं तरीही आजीने बनवलेले एक दोन पदार्थ आजोबांनी मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्यांना शाळेत विद्यादानाचं काम केलेल्या आजीचं म्हणणं पटलं मग आजी म्हणाली कदाचित माझं काही चुकत असेल म्हणून उद्यापासून तुम्ही स्वयंपाक करा आजोबा घाबरल्या आणि ओशाळलेल्या चेहऱ्याने खिडकीतून बाहेर आकाशात चंद्र शोधू लागले... हे माहीत असताना की आज अमावस्या आहे..
शिक्षणाचाही तसंच आहे ज्ञानांर्जनाच आणि शिकण्याची भूकच नसल्यास शिकणार काय...? आपण पुरेशी माहिती न घेता डोक्यात कुठलातरी आकस ठेवून आजी वर ओरडणारे आजोबा तर होत नाही ना ?