Thursday, 26 December 2024

 आज 'मन मौन' झाले आहे,

 पण तरीही काही लिहिणार आहे.... ✍️ ते असे की, या देशाचा लौकिक वाढवण्यासाठी सर्व जाती धर्मियांचे योगदान आहे फक्त कोण्या एका धर्मीयांचे नाही...

आजपासून ३३ वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात  अर्थक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.१९९१ साली देशाच्या आर्थिक धोरणांबद्दल क्रांती घडवण्यात तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आणि जागतिक दर्जाचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचा खूप मोठा वाटा आहे.

 आज काही लोकांचा विश्वास बसणार नाही परंतु १९९१ पर्यंत आपल्या देशात केवळ एक टीव्ही वाहिनी होती देशांतर देशांतर्गत विमान सेवा देणारी एकच मुख्य कंपनी होती.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू,तसेच इंदिरा गांधी राजीव गांधी यासारख्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे पायाभरणी मुळातच झाली होती परंतु १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूका आपल्या देशात झाल्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीची कवाडं खऱ्या अर्थाने खुली झाली. 

इ.स.२०००या  वर्षानंतर जन्माला जन्माला आलेल्या मुलांना मिलेनियर्स असेही  संबोधलं जातं परंतु आज सर्वच तरुण मिलेनियरसह सर्व भारतीयांनी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीमुळे गेल्या ३० वर्षात देशाने झपाट्याने प्रगती केली.आज आपण पाहत असलेल्या शाश्वत विकासात अत्यंत साधी राहणी असणाऱ्या, कुठलाही बडेजावपणा किंवा दिखाऊपणा न करणाऱ्या,मितभाषी, खऱ्या अर्थानं जंटलमन अशी ओळख असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राबवलेल्या ध्येयधोरणाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.

तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण, खासगीकरण, आणि जागतिकीकरण (LPG - Liberalization, Privatization, Globalization) धोरण लागू करण्यात आले.

महत्त्वाचे बदल आणि प्रगती.

• आर्थिक उदारीकरण (Liberalization):

 परकीय गुंतवणुकीवर असलेले निर्बंध कमी केले.

नियमन हटवले: उद्योगांवरील परवाना राज (License Raj) समाप्त केला.

कररचना सुधारली: आयात-निर्यात कर कमी केले.

भांडवली बाजार खुले केले: परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीस परवानगी दिली.

• खासगीकरण (Privatization):

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करण्यात आले.

खासगी कंपन्यांना अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली.

• जागतिकीकरण (Globalization):

भारताचे जागतिक बाजारपेठेशी जुळवून घेणे सुरू झाले.

परकीय कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली.

परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले.

प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे

• औद्योगिक विकास:

उत्पादनक्षमता वाढली.

नवीन तंत्रज्ञानाचा भारतात प्रवेश झाला.

• आयटी क्षेत्राचा उदय:

माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर अग्रगण्य बनला.

बेंगळुरूसारखी शहरे आयटी हब बनली.

• परकीय गुंतवणूक (FDI):

परदेशातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली.

नवीन रोजगार निर्माण झाले.

• ग्रामीण विकास:

कृषी क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले.

ग्रामीण भागातील लोकसंख्येला रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या.

• आर्थिक स्थिरता:

भारताचा GDP वेगाने वाढला.

१९९१ नंतर भारताने जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्य मिळवले.

डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका

• आर्थिक संकटाचा सामना:

१९९१ च्या आर्थिक संकटात डॉ. सिंग यांनी भारताचा परकीय चलनसाठा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मदत घेतली.

• धोरणात्मक बदल:

त्यांनी औद्योगिक धोरण, परकीय व्यापार धोरण, आणि कररचना सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.

'License Raj' हटवून व्यवसाय करण्यास सुलभता आणली.

 • जागतिकीकरणाचे शिल्पकार:

जागतिक अर्थव्यवस्थेशी भारताला जोडण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला.

परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी नियम सुलभ केले.

•  दूरदृष्टी आणि धाडस:

त्यांनी आर्थिक सुधारणा लागू करताना राजकीय दबाव झुगारला आणि देशहिताला प्राधान्य दिले.

केंब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित अशा सेंट जोन्स महाविद्यालयात डॉ.मनमोहन सिंग यांची प्रतिमा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आशिया खंडातील डॉक्टर मनमोहन सिंग हे एकमेव आहेत ज्यांची प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे.

देशातील हजारो स्टार्टअपसह लाखो व्यवसायिकांच्या शाश्वत विकासाची आश्वासक पाळंमुळं रोवणाऱ्या आपल्या भारताच्या माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🌸🙏🌸👇



Tuesday, 24 December 2024

 आज २५ डिसेंबर...!

१९२७ साली याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता, अन्याय आणि शोषणावर आधारित मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले.

यावेळी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते,  “ सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत, ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील, हे हक्क कायम राहावेत हाच राज्यव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे.”*

 या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दिनानिमित्त बाबासाहेबांना क्रांतिकारी सलाम ...!



Monday, 23 December 2024

 साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी.

दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे पूज्य साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी साने गुरुजींना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भटू पाटील सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. साने गुरुजींच्या जीवनकार्याबद्दल सखोल माहिती शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाट सर आणि श्री. विश्वास पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी साने गुरुजींच्या त्यागमय जीवनाचा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

श्री. प्रेमलाल पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात साने गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंगांमधून विद्यार्थ्यांनी कसा बोध घ्यावा, हे समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी शिक्षिका कु. दिव्या बेलदार यांनी आभार प्रदर्शन केले.

अहवाल लेखन:

श्री. शैलेश शिरसाट

(शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी)

Wednesday, 18 December 2024

 

नेहमीप्रमाणेच आटपाट नगर होते त्या नगरात अर्थात एक राजा होता.राजा असल्यामुळे सैन्य, सेनापती, स्तुतीपाठक असा सगळा लवाजामा होता.

गावाकडच्या किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी सैनिकांनी दोराने उतरावे किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी असे मत सैनिकांचा कार्यालयीन प्रमुख असणारा सेनापतीला सांगितले, तेव्हा सेनापती म्हणाला की, "किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली जाण्यासाठी उड्या मारा कारण तुम्ही शूर सरदार आहात" त्यावर एका अभ्यासू चिकित्सक सैनिकाने सेनापती या कार्यालयीन प्रमुखाला सांगितले की, त्यामुळे हातापायाला दुखापत होऊ शकते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो. त्यावर हुशार सेनापती स्मित हास्य करीत म्हणाला की,"सैनिकांनो,नकारात्मकता सोडा सकारात्मक विचार करा.तुम्ही असा नकारात्मक विचार का करतात की वरून उडी मारल्यानंतर  काही दुखापत होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो  त्याऐवजी असा विचार करा की वरून उडी मारल्यावर मला काहीही होणार नाही,मी सही सलामत उडी मारून सुखरूप राहू शकतो. 

त्यावर आपल्या कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या सेनापतीची स्तुती करत दुसरा सैनिक म्हणाला,"बरोबर आहे सेनापती साहेब, आपण खूपच बुद्धिमान आहात, शूर आहात आपणच हे प्रात्यक्षिक या कमी समज असणाऱ्या सैनिकांना करून दाखवावे".असे ऐकताच ५६ इंची छाती झालेल्या सेनापतीने अत्यंत सकारात्मक वृत्तीने खाली उडी मारली आणि....

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्याची स्वर्गातील उर्वशीचे नृत्य पाहण्याच्या सकारात्मक इच्छेसाठीचे एक पाऊल नव्हे तर अख्खी उडीच सार्थक झाली.

- शैलेशकमल.


Thursday, 5 December 2024

 क्षेत्रभेटीचा अहवाल

दिनांक: ६ डिसेंबर २०२४

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी. ता.धरणगाव जि.जळगाव.

आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथील विद्यार्थ्यांसाठी गहू, भेंडी, कापूस, तसेच पपईच्या बागांमध्ये शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. 

या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या खालील ओव्या सहजच आठवल्या. 

शेता आले सुगी | सांभाळावे चारी कोण |

पीका आले परी | केले पाहिजे जतन ||

क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांनी भेंडी व पपईच्या उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती घेतली. विशेष म्हणजे शेरी गावातील भेंडी हे महत्त्वाचं आणि निर्यात होणार उत्पादन आहे.

भेंडी हे मुख्यतः खरीप हंगामातील पिक असून तिचे लागवड उष्ण व दमट हवामानात केली जाते. भेंडीच्या चांगल्या उत्पादनासाठी हलकी, मध्यम स्वरूपाची व भरड माती उपयुक्त असते. भेंडीची लागवड बी पेरणीद्वारे केली जाते आणि नियमित पाणी व खत व्यवस्थापनाने चांगले उत्पादन मिळते.

पपई हे वर्षभर येणारे फळ असून ते उष्णकटिबंधीय हवामानासाठी उपयुक्त आहे. पपईची लागवड मुख्यतः हलक्याशा निचऱ्याच्या जमिनीत केली जाते. या झाडांसाठी योग्य प्रमाणात पाणी व खतांची आवश्यकता असते. याशिवाय, पपईच्या झाडावर किडी व रोग नियंत्रणासाठी वेळोवेळी देखभाल करावी लागते. पपईला भरपूर पोषणमूल्य असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. अशी विद्यार्थ्यांना याप्रसंगी माहिती देण्यात आली. 

कार्यक्रमाचा उद्देश.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना शेतीची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. भेंडी व पपईच्या उत्पादन तंत्रज्ञानासोबतच शेतीतील वेगवेगळ्या प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्यांना मिळाली.विद्यार्थ्यांनी शेतीत कार्यरत शेतकऱ्यांचे, मजुरांचे अनुभव जाणून घेतले.

मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी या क्षेत्रभेटीच्या आयोजनाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीविषयी जागरूक राहण्याचा संदेश दिला. क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक श्रीमती वंदना पाटील, हे भटू पाटील श्री विश्वास पाटील, प्रशिक्षणार्थी शिक्षक कु.दिव्या बेलदार, श्री.शैलेश शिरसाठ आणि शालेय पोषण आहार मदतनीस आनंदा कोळी, कल्पनाताई कोळी यांनी सहकार्य केले.

- श्री.शैलेश शिरसाठ.