Friday, 26 August 2022

यांना जरा आवरा आणि धर्म सावरा

आपल्या महान दैदीप्यमान धर्माची चुकीची ओळख करून देणारे भोंदू बाबा, महाराज, बापू यांच्या वर्तनामुळे आणि त्यांच्या अंधश्रद्धांनीयुक्त अशा विधानांमुळे, वर्णव्यवस्थेतील जातीभेदामुळे, भंपक कर्मकांडांच्या अतिरेकीपणामुळे आपल्या धर्माची हानी होत आहे. उदाहरणार्थ एखाद्या धर्मपंडित म्हणवणाऱ्या महाराजांनी असे सांगितले की एखादी विशिष्ट पूजा केल्यावर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतील तुमच्यावरील संकट निवारण होईल. यामुळे अनेक साधे भोळे लोक अशा धर्माच्या विचारमंचावरून आलेल्या भूलथापांना बळी पडतात त्याच वेळेला आपल्याच धर्मातील विवेकी विचाराचे सुशिक्षित लोक अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाहीत.
'एक लोटा जल सब समस्याओं का हल' असं म्हणून धर्माचं बाजारीकरण करू पाहणाऱ्या लोकांमुळे धर्माची चुकीची ओळख लोकांपुढे मांडली जात आहे. आयुष्यातील संकटांना मोठ्या हिमतीने सामोरे जायचं असतं हे शिकवणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे हे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले.
'एक लोटा जल सब समस्याओं का हल' असं म्हणून जिजाऊंनी आणि शिवबांनी फक्त पिंडीवर पाणी टाकत राहिले असते आणि सर्व कार्यभार परमेश्वरावरच सोडून दिला असता तर दैदीप्यमान इतिहास घडवला नसता.
आपला हिंदू धर्म हा कार्य (कर्म) सिद्धांत सांगणारा धर्म आहे, तो 'असेल हरी तर देईल खटलावरी' हे तत्व मानतो का? विज्ञान युगात वावरणाऱ्या नवीन पिढीला ज्या वेळेला चुकीची ओळख काही कर्मठ,जातीयवादी, स्वतःला धर्माचे प्रवचनकार म्हणून घेणारे भोंदू महाराज सांगतात त्यावेळेला धर्माचीच हानी होते म्हणून नवीन पिढी आपल्या धर्माला चुकीच मानत आहे कारण ओळखच चुकीची करून दिली जात आहे.
वर्ण व्यवस्था मांडणारे, जातीव्यवस्था मांडणारे धर्माच्या पंडितांना आवरायला पाहिजे. जर आपण देवळात, मंदिरात विशिष्ट जातीच्या लोकांसाठी वेगळी पूजा आणि जन्माने श्रेष्ठ समजला जाणाऱ्या लोकांसाठी वेगळी पूजापाठ असा भेदभाव करणार असाल तर मग असा धर्म मला नको असं नवीन पिढी म्हणू शकते म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना परमेश्वर सारखाच आहे हे नवीन पिढीला पटवून द्यावे लागेल अन्यथा त्यांचा आपल्याच धर्मावर विश्वास राहणार नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान विचारवंत आपल्या धर्मात जन्माला येऊन देखील आपण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला आणि भेदभावपूर्ण वागणूक दिली त्यामुळे त्यांनी आपला धर्मच सोडला यापुढे असे होऊ नये याची काळजी घेण्यासाठी हिंदू धर्मातील सर्व जाती जाती-पंथांना प्रेम जिव्हाळा आणि आपुलकीने जपावं लागेल. आपण ज्या बाबासाहेबांना आणि त्यांच्यासह असंख्य जातीतील हजारो लोकांना नाकारले त्या सर्वांना आपल्या धर्मात येण्याबद्दल जगातील सर्वच धर्मांनी सांगितले होते हे हे विसरून चालणार नाही.जरी उशीर झाला असला तरी आपल्या हातून वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून जातीभेद केला गेला यासाठी धर्माच्या रक्षकांनी उशिरा का होईना बाबासाहेबांचे अनेक कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातींची माफी मागितली पाहिजे, आणि धर्माच्या नावावर कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना वेळीच आवरायला पाहिजे नाहीतर आधुनिक युगातील सुशिक्षित तरुण-तरुणींना आपलाच धर्म नकोसा वाटेल.



No comments:

Post a Comment