Thursday, 25 December 2025

वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

 वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट,

ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साहिबजादे जोरावर सिंह व साहिबजादे फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग व बलिदानाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना वीर बाल दिवस या विषयावरील ध्वनी-चित्रफित (व्हिडिओ) दाखवण्यात आली. या चित्रफितीतून साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व तसेच या वीर बालकांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा स्पर्धा तसेच इतर सर्जनशील व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमास शाळेतील उपशिक्षक शैलेश शिरसाठ, मुख्याध्यापक श्री. भटू पाटील तसेच केंद्रप्रमुख श्री. प्रभात तडवी हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, धैर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.




Sunday, 7 December 2025

किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

 किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

किनगाव ता.यावल चे मुळ रहीवाशी आणि संभाजी ब्रिगेडचे यावल तालुका अध्यक्ष श्री.विजय पाटील यांची दिशा ही सुकन्या  होय .

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमान! खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये दिशा पाटील च्या उत्कृष्ट खेळाने मिळवून दिले विद्यापीठाला सुवर्णपदक

       भरतपूर राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर आयोजित खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये अंतिम सामन्यातील

63 किलोग्रॅम वजनी गटात 'बॉक्सिंग' या क्रीडा प्रकारात दिशा विजय पाटील हिने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदकाची शानदार कमाई केली आहे.अंतिम सामन्यात हरियाणाच्या बॉक्सरवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत दिशाने तिचे कौशल्य, जिद्द, आणि उत्कृष्ट खेळाची चमक दाखवली.दिशाच्या या भव्य विजयामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खानदेश (जळगांव जिल्हाचे ) यावल तालुक्यातील किनगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाले असून विद्यापीठाचा मान-अभिमान अधिक उंचावला आहे.




Tuesday, 25 November 2025

जि.प.प्राथमिक शाळा फुलपाट येथे संविधान सप्ताह उत्साहात सुरू

 आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 मंगळवार  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट येथे संविधान जागर सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबद्दल, विशेषतः संविधानाच्या उद्देशिकेतील (Preamble) महत्वाच्या मूल्यांविषयी माहिती देणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री.भटू पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची वैशिष्ट्ये, त्यातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांविषयी सोप्या आणि समजण्यासारख्या शब्दांत मार्गदर्शन केले. संविधान हे देशाचे मार्गदर्शक तत्त्व असून प्रत्येक नागरिकाने त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.यानंतर उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांना वाचन करून दाखवली आणि प्रत्येक ओळीचा अर्थ उलगडत विद्यार्थ्यांना समजावून दिला. विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाही मूल्यांची बीजे रोवण्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे, छोटे प्रश्न आणि संवाद यांचा वापर केला. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता, देशभावना आणि लोकशाही मूल्यांची जाण निर्माण झाली. 




Friday, 14 November 2025

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती.

जनजाती गौरव पंधरवाडा — भगवान बिरसा मुंडा जयंती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट — ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे 'जनजाती गौरव पंधरवाडा' अंतर्गत भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रम राबवून जनजाती गौरव पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला.

 आज १५ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याची, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाची तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यानंतर शाळेत उपस्थित असलेल्या आदिवासी महिला व आदिवासी बांधवांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री भटू नामदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पेहरावात उपस्थित राहून आपली संस्कृती अभिमानाने सादर केली. मुलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा व उत्साह लाभला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.

अशा प्रकारे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जनजाती गौरव' दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता.धरणगाव, जि. जळगाव येथे बाल दिवस उत्साहात साजरा.

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता.धरणगाव, जि. जळगाव येथे बाल दिवस उत्साहात साजरा.

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यानिमित्त मुख्याध्यापक श्री भटू नामदेव पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले तसेच त्यांच्या कार्यांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच 15 नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या बिरसा मुंडा जयंतीच्या पार्श्वभूमीवर  बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने  शाळेत चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आदिवासी वीर योद्धा बिरसा मुंडा यांचे कार्य, त्यांचे योगदान आणि त्यांनी दाखवलेला संघर्ष याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ यांनी केले.





Wednesday, 15 October 2025

वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट.ता.धरणगाव जि.जळगाव येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा.

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस शाळेत वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू नामदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. कलाम यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यासारखे मोठे स्वप्न पाहून त्यांची पूर्तता करण्यासाठी वाचनाची सवय ही पहिली पायरी आहे.”

शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “वाचन ही केवळ सवय नाही तर व्यक्तिमत्त्व घडविण्याची गुरुकिल्ली आहे. रोज काहीतरी नवीन वाचल्याने विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो.”

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पुस्तकांबद्दल अनुभव मांडले, कवितांचे वाचन केले आणि ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला.


वाचन प्रेरणा दिवस- ऑनलाईन प्रश्नावली.👇

https://quizzory.in/id/5f87c67465356d7bee6f9d2e

Sunday, 12 October 2025

'वनराई बंधारा' उपक्रम ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसहभागातून संपन्न.

'वनराई बंधारा' हा ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसहभागातून केवळ जलसंवर्धनाचा नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा आणि पर्यावरण जपण्याचा उत्कृष्ट शासकीय उपक्रम आहे. सदर उपक्रम फुलपाट, टहाकळी येथे संपन्न झाला

 शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व:

  • जाणिव निर्माण करणे:

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जलसंवर्धनाची जाणीव पोहोचते.“प्रत्येक थेंब मोलाचा” हा संदेश ते आपल्या घरी आणि समाजात पोहोचवू शकतात.

  •  प्रत्यक्ष सहभाग:                                            विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बंधारे बांधकाम पाहू शकतात, स्वयंसेवक म्हणून मदत करू शकतात, झाडे लावू शकतात.
  • शैक्षणिक उपक्रमांशी संलग्नता:

विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण शिक्षण विषयांत “जलचक्र”, “भूजल संवर्धन” यांसारख्या संकल्पनांचे प्रत्यक्ष उदाहरण वनराई बंधाऱ्यांतून समजते.

  •  सामाजिक जबाबदारीची जाणीव:

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये “गाव माझं, जबाबदारी माझी” ही भावना दृढ होते.

  •  जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे:

विद्यार्थी प्रदर्शन, निबंध, पोस्टर स्पर्धा, रॅली किंवा घोषवाक्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व इतरांना पटवून देऊ शकतात.

  • राष्ट्रीय योगदान:

पाणी वाचवणे म्हणजे शेती, अन्नसुरक्षा आणि पर्यावरण वाचवणे — हे राष्ट्रनिर्मितीत थेट योगदान आहे. विद्यार्थी भविष्यात सजग नागरिक बनतात.

  • पर्यावरण संवर्धनाशी नाते:

बंधाऱ्यांमुळे पाण्याबरोबरच हरितपट्टा टिकतो. विद्यार्थी झाडलावणी आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारतात.

🌱 

वनराई बंधारा हा "लोकसहभागातून जलसंपन्न भारताकडे" जाण्याचा मार्ग आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास, सामाजिक बांधिलकीस आणि पर्यावरणप्रेमी नागरिक होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.