डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेतृत्व करणारे महामानव आहेत,कारण त्यांनी वर्णव्यवस्थेतील सर्व जातींचा सर्व धर्मातील स्त्रियांचा तसेच ओबीसींचा सर्वप्रथम विचार केला मग स्वतःच्या जातीचा.असे असल्यावरही आज बहुजनांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी आहेत का ? याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आता बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत तसबीरी घरात लावण्याची गरज काय? असा न पटणारा युक्तिवाद ही मंडळी करू शकतात कारण अशी माणसं जाती जातीत महापुरुषांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विभागणीच करतात आणि स्वतःच्या जातीशी संबंधित असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा मात्र आवर्जून घरात स्थापित करतात.आजही आपण कुणाच्याही घरात जाऊन तिथे असणार्या प्रतिमांवरून त्यांची जात ओळखू शकतो. याला काही ठिकाणी अपवादही असेल परंतु तेही अपवादानेच हे खेदाने नमूद करावसं वाटतं.आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास ओबीसींसह सर्व समाज घटकांचे, सर्व महिलांचे ,एकंदरीतच मानवतेचे मसीहा म्हणजे विश्वरत्न,आधुनिक जगाचे खरे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.
खरं पाहता ओबीसींना *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जाती आधी ओबीसींसाठीचे आरक्षण दिले, तेही कायद्याने.....*
कळत नकळत काही समाज घटक स्वतःला मागासवर्गीय बांधवांपेक्षा वेगळे आणि उच्च समजण्याची चूक करतात.
देशातील सर्वच महामानवांना, समाज सुधारकांना जातीपातीत न विभागता जातीअंताचे मार्गदर्शक म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे,कारण हा लढा जातीपातींचा नसून मानवीय मूल्यांचा लढा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं.
महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे आणि त्यांच्या सामाजिक विचारांवर कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना कायद्याने सक्षमीकरणाच्या वाटा खुल्या करून दिलेल्या आहेत म्हणून भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने बाबासाहेब दैवत आहे,ते तर त्यांच्या गळ्यातील ताईतच पाहिजे...✍️