Friday, 24 January 2025

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा.

दिनांक: २४ जानेवारी २०२५

स्थळ: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी

प्रस्तावना:

राष्ट्रीय मतदाता दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीत मतदानाच्या महत्त्वावर जनजागृती केली गेली. या कार्यक्रमात मतदाना विषयी प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच मतदानाचे महत्त्व आणि जनजागृतीवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय मतदाता दिवस हा २५ जानेवारी असला तरी काही कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे शासकीय परिपत्रकानुसार आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी सदर कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात:

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील शिक्षक श्री शैलेश शिरसाठ सर यांनी राष्ट्रीय मतदाता दिवसाचे महत्त्व सांगून केली. त्यांनी सर्व उपस्थित शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार आणि त्याची जबाबदारी यासंदर्भात माहिती सांगितली.

प्रतिज्ञा:


शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली आणि मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा संकल्प केला. "न्याय्य, पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात मतदान करणे, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे" या विचाराने सर्वांनी प्रतिज्ञा केली.


जनजागृती संदर्भातील चर्चा:

मुख्याध्यापक श्री प्रेमलाल पाटील यांनी आणि शिक्षकांनी मतदार जागृती विषयावर चर्चा केली. त्यांनी विविध मुद्दयांवर विचार मांडले:

मतदान हे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असून, ते त्याच्या कर्तव्याचा भाग आहे.

प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा आवाज हक्काने वापरावा.

लोकशाहीमध्ये मतदान ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण सरकार निवडतो.

सर्व वर्गातील नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजून त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.

कार्यक्रमाच्या शेवटी मतदाता जागृतीसाठी घोषणा तयार करण्यात आल्या. या घोषणांचा उद्देश अधिकाधिक नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करणे होता. काही घोषणांचे उदाहरण:

"मतदान करा, लोकशाहीला बळकटी देऊया!"

"आपल्या मतदानाने देशाची दिशा ठरवा!"

"आपले मतदान, आपला हक्क!"

निष्कर्ष:

हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण ठरला. यामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव लक्षात आणला गेला. भविष्यात अधिक लोक मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, यासाठी शिक्षण, जनजागृती आणि प्रबोधनाचे कार्य सतत चालू ठेवले पाहिजे.



Wednesday, 22 January 2025

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

आज, २३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी ता. धरणगाव जि.जळगाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल डिगंबर पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी सुस्पष्ट माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश शिरसाठ सर यांनी केले. शाळेतील शिक्षक विश्वास पाटील तसेच भटू पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि त्यांच्या समर्पणाचा उल्लेख केला, तसेच त्यांचे योगदान महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणात किती मोठे होते हे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील यांनी अध्यक्ष भाषणातून भारतीय स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याची खूप सारी उदाहरणे देऊन मांडणी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी सुस्पष्ट माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी शिक्षिका श्रीमती दिव्या बेलदार यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याची ओळख मिळाली, ज्यामुळे त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या अधिक समजून घेण्यास मदत झाली.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी ता.धरणगाव जि.जळगाव येथे सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी.

आज, २३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी येथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान नेते सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल दिगंबर पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश शिरसाठ यांनी केले. शाळेतील शिक्षक विश्वास पाटील यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली. शाळेतील शिक्षक भटू पाटील यांनी देखील सुभाष बाबू यांनी देशासाठी परदेशात केलेल्या प्रयत्नांविषयीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील सर यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या संघर्षपूर्ण जीवनाचा आणि देशासाठी केलेल्या बलिदानाचा उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी शिक्षिका दिव्या बेलदार यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद दिले.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याची ओळख मिळाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली.

Sunday, 12 January 2025

 भारतासह जगाला मोठ्या प्रमाणात मानसोपचार तज्ञांची गरज असेल असे चित्र दिसत आहे. 

शाळा कॉलेजमधल्या उर फुटेस्तोवर धावायला लावणाऱ्या स्पर्धांच्या परीक्षेनंतर गलेलठ्ठ पगार असला तरी वर्क प्रेशर देखील खूप धावायला लावत आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षात कामाचे तास देखील वाढत आहे जे आठ तासांपेक्षा अधिक आहेत. हा प्रश्न फक्त कामगारांपुरता मर्यादित नसून ह्या वर्क प्रेशर चा त्रास सर्व थरातील लोकांना येणाऱ्या काळात होऊ शकतो त्यात उच्चार विद्या विभूषितही असू शकतील.

जागतिकीकरणानंतर कामगार कायदे किती प्रमाणात प्रत्यक्ष वापरले जातात याचा वेगळा अभ्यास करता येऊ शकतो, कारण भांडवलशाहीत वाढत जाणारी प्रचंड नफाखोरी कामाचा अतिरिक्त ताण वाढवणारी नक्कीच आहे.त्यातही कार्पोरेट सेक्टर मधील त्याचे प्रमाण अधिक आहे.

कार्पोरेट जगतातील ताणतणावाला जबाबदार कोण ? असा देखील प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे. 

कॉर्पोरेट ताणतणाव हा  नियोक्ता( Employer) व  कर्मचारी (Employee) दोघांच्या वर्तनावर अवलंबून असतो. नफ्यापेक्षा माणसांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे.

१. अवास्तव कामाचा भार (Excessive Workload)

रोजचे तास ८–९ ऐवजी १०–१२ तास काम.

२. लक्ष्य आणि परफॉर्मन्सचा दबाव (Performance Pressure)

नोकरी टिकवण्यासाठी किंवा बढतीसाठी अवास्तव लक्ष्य गाठण्याची गरज.

मोजणी फक्त आकडे आणि नफा यावर होणे.

उदाहरण: सेल्स टीमला महिन्याच्या शेवटी १५% जास्त विक्री करायची आहे, नाहीतर बोनस कापला जातो.

कमी वेळेत मोठे लक्ष्य पूर्ण करण्याचा दबाव.

उदाहरण: एका IT कंपनीत प्रोजेक्ट डेडलाईन ३ आठवड्यांनी कमी केल्यामुळे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत राहतात, ज्यामुळे मानसिक थकवा वाढतो.

३. काम-जीवन संतुलनाचा अभाव (Work-Life Imbalance)

ऑफिसचे काम घरीही सुरू राहणे (Emails, Calls).

कौटुंबिक व सामाजिक आयुष्याकडे दुर्लक्ष.

उदाहरण: वीकेंडला सुट्टी न घेता सतत प्रोजेक्ट अपडेट्स देणे.


Saturday, 11 January 2025

 राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात साजरी.

जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल डिगंबर पाटील हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर, उपस्थितांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वास पाटील यांनी प्रभावीपणे केले.

कार्यक्रमात शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वंदना पाटील तसेच श्री. भटू पाटील, आणि श्री. शैलेश शिरसाठ यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणादायी जीवनकार्याबाबत आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि राष्ट्रीय भावनेची चेतना निर्माण झाली.

विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी राजमाता जिजाऊ  आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या भाषणांमधून समाजसेवा, शिक्षण, आणि युवाशक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश उमटला.

मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या कर्तृत्वाची शिकवण आणि विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी शिक्षिका दिव्या बेलदार यांनी आभार प्रदर्शन केले. अशा प्रकारे, जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शाळेत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.