Wednesday, 23 April 2025

 मुख्याध्यापकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन घेऊन 'आम्ही निपुण होणारच' या उपक्रमाबद्दल कौतुक केले.





Wednesday, 16 April 2025

 मला भेटलेला क्लार्क (कारकून) आणि शासन निर्णय.

आजच (१६ एप्रिल २०२५) निर्गमित झालेला शाळा स्तरावर विविध समित्यांचा एकत्रित करण्याबाबतचा शासन निर्णय वाचण्यात आला आणि पूर्वी प्रवासादरम्यानचा एक किस्सा आठवला...

शाळा स्तरावर एवढ्या समित्या ठेवण्याऐवजी समित्यांचे एकत्रीकरण व्हायला पाहिजे असं मी प्रवासातील चर्चेदरम्यान मी एका व्यक्तीशी बोलत होतो त्यावेळेला त्या व्यक्ती शेजारी बसलेली व्यक्ती म्हणाली की, "नाही सर शिक्षकांना कामच काय असतं आणि या समित्या बरोबरच आहे आता ज्यांना काम करायच नाही ते असं काहीतरी बहाना शोधणार की एवढ्या समित्या नको म्हणून...

मी म्हटलं,"अहो खरंच एवढ्या समित्यांच्या एकत्रीकरणावर विचार व्हायला हवा."

ती विरोध करणारी व्यक्ती म्हणाली "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला वरिष्ठांपेक्षा जास्त कळतं.माझ्या हातात असतं तर यापेक्षाही अधिक स्ट्रिक्ट  केलं असता मी तुम्हाला" मी म्हटलं," अहो तसं नाही, तुम्हाला जर माझा मुद्दाच समजून घ्यायचा नाही तर मग मी काही करू शकत नाही, मी त्या व्यक्तीला विचारलं आपण काय करतात तो विरोध करणारा माणूस म्हणाला ,मी एका कंपनीत कारकून आहे."

माझ्या मताशी समोर बसलेला इतर दोन्ही व्यक्ती व्यक्ती सहमत होते योगायोगाने त्यापैकी एक व्यक्ती देखील माझ्यासारखीच शिक्षक होती आणि दुसरी क्लार्क. 

मी सहजच मी माझ्या  डायरीत लिहिलेल वाक्य पाहिलं ....'Education is nothing but a common sense.''

मी असं म्हटल्याबरोबर तिथे बसलेले एक उच्चशिक्षित ट्रस्टी व्यक्ती माझ्याशी बोलू लागले आणि मग संपूर्ण प्रवास मी त्या खऱ्या अर्थाने सुशिक्षित असणाऱ्या माणसाशी गप्पा करत प्रवास करू लागलं आणि मग मी त्या कारकून असणाऱ्या गृहस्थाकडे पाहिले देखील नाही...

 तो विरोध करणारा कारकून माणूस पुन्हा भेटला तर त्याला आजचा शासन निर्णय नक्की दाखवायला आवडेल आणि तो पुन्हा नाही भेटला तर अधिक आवडेल.



Sunday, 13 April 2025

महिला सक्षमीकरणाचे प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 विश्वरत्न,भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेरी, धरणगाव जि.जळगाव येथे उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील हे होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटू पाटील यांनी केले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका वंदनाताई पाटील तसेच शिक्षक शैलेश शिरसाठ, विश्वासराव पाटील, भटू पाटील, श्रीमती छायाताई घुगे यांनी विचार मांडले. 

शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना निर्मिती संदर्भातील योगदानाची सविस्तर माहिती दिली, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांबाबत माहिती सांगितली.



Saturday, 12 April 2025

 बोधकथा 

बोधकथा (टीप- बोध घेतल्यास बोधकथा अन्यथा अहिराणी बोलीभाषेनुसार... बोध कथा? 🤔)


नेहमीप्रमाणेच एक आटपाट नगर होते. ते नगर अनेक वर्षापासून सुरक्षित होते कारण त्या राज्याची परंपरा होती तिथे चारही दिशांना चार वेगवेगळे सेनापती अनेक वर्षापासून नियुक्त होत असत. राज्याच्या राजाला राज्यकारभारावर देखरेख ठेवणे इतर राज्यात अभ्यास दौऱ्यावर जाणे वगैरे काम परंपरेने होते. परंतु राजाने उत्तर दिशेतील सेनापतीला राजाने स्वतः करावयाच्या कामासाठी नियुक्त केले. उत्तर दिशेतील सेनापती आता राज्याच्या उत्तर दिशेची सीमेचे संरक्षण करण्याऐवजी राजाने करावयाचे सर्व कामे करू लागला तो अत्यंत चोखपणे काम करणारा प्रामाणिक कारकून बनला. 

मंत्रिमंडळाला आणि इतर दिशांसाठी नियुक्त  सेनापतींना मात्र या गोष्टीने अधिक काळजी वाटू लागली कारण राज्याची उत्तर बाजू आता कमकुवत पडणार होती. हीच बाब राज्यातील नागरिकांना सतावु लागली आपल्या मुलांचे भविष्य आता राज्यात सुरक्षित नाही असं म्हणून ते इतर राज्यात स्थलांतरणाचा विचार करू लागली. 

त्याचप्रमाणे शत्रू राष्ट्राला देखील ही गोष्ट कळू लागली होती की राज्याची उत्तर बाजू कमकुवत झाल्यामुळे उत्तरेकडून हल्ला करता येऊ शकतो. 

लेखक म्हणून या कथेचा शेवट मला करता येऊ शकतो, परंतु ती जबाबदारी मी जाणीवपूर्वक वाचकांवर आणि बोधकथा ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोडली आहे.✍️

शैलेश शिरसाठ,जळगाव.

Wednesday, 9 April 2025

 प्रति,

मा.मुख्याध्यापक 

जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेरी,

 ता धरणगाव जि जळगाव. 

महाशय,

 २५ जानेवारी २०२५ पासून राबवत असलेल्या 'रुजुवात' या उपक्रमांतर्गत गावात केलेल्या पालक भेटी तसेच सर्वेनुसार इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी आपणापुढे सादर करत आहे.

सदर माहितीपत्रका सोबतच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे 

१) जन्म प्रमाणपत्र in 

२) विद्यार्थ्यांचे आधारकार्ड 

३) पालकांचे आधार कार्ड

४) बँक खात्यात संदर्भातील कागदपत्र सोबत जोडत आहे.

शैलेश शिरसाठ उपशिक्षक, जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेरी ता.धरणगाव जि. जळगाव.








Monday, 7 April 2025

 'चिमणी.....!!!'

©doctorforbeggars

एक होती चिमणी, नाजुक ... छान ! हिचे आईवडिल लहानपणीच वारले. बहिण भाऊ कुणीच नाही...,

कालांतराने एका चिमण्या बरोबर तीचं लग्न लागलं. दोघांनी मिळुन काडी काडी जमवुन एक घरटं बांधलं.... काटकसरीनं का होईना चिमणा -  चिमणीचा सुखानं संसार चालु होता.

चिमणा रोज दाणा पाणी मिळवण्यासाठी दिवसभर फिरुन कष्ट करायचा.... चिमणी मागं घरटं सांभाळायची....!ठिक ठाक चाललं होतं...

चिमणा चिमणीला तसं पाहिलं तर कुणीच नव्हतं... ना नात्यातलं ना गोत्यातलं ... चिमण्याला चिमणीचा.... अन् चिमणीला चिमण्याचाच काय तो आधार...  !

दोघांनाही खुप वाटायचं... आपल्या घरात पण एक छोटं पिल्लु असावं... दोघांव्यतिरीक्त कुणी आणखी तिसरं असावं... त्याच्या इवल्याशा चोचीत घास भरवावेत... चिवचिवाट करुन पिल्लानं घरटं डोक्यावर घ्यावं... आणि आपण ते डोळे भरुन पहावं...

पण... पण... का कोण जाणे, त्यांची हि ईच्छा कधीच पुर्ण झाली नाही...या एकाच गोष्टीची खंत दोघांनाही आयुष्यभर छळत राहिली... जाळत राहिली... विशेषतः चिमणीला जास्त ...!

दिवस सरत होते... चिमणी मनातुन कुढत होती, आयुष्यात कुणीच सख्खं उरलं नव्हतं... किमान स्वतःचं पिल्लु तरी असावं एव्हढीच माफक अपेक्षा... पण ती ही पुर्ण होत नव्हती... चिमणा खुप समजावुन सांगायचा चिमणीला... पण उपयोग नसायचा...दिवस पुढे पुढे पळत होते, या दोघांनाही मागं टाकुन...एव्हढ्या मोठ्या रानात आजुबाजुला इतर घरटी पण  होती... पण सगळ्या गर्दित हे दोघे मात्र एकटेच...

उमेदीचं वय निघुन गेलं... जाताना भेट म्हणुन म्हातारपण देवुन गेलं... एकटेच जगा असा निःशब्द शाप देवुन गेलं... !

चिमणा आता थकला होता म्हातारपणामुळं, आणि चिमणीही... !

चिमण्याला आताशा काही काम होत नव्हतं... पंख थकले होते... पायात त्राण नव्हतं... मिळेल त्यात भागवत, एकमेकांना सावरत, एकमेकांना आवरत दोघंही जगण्याची लढाई लढत होते... न हरता...!

एके दिवशी चिमणा अन्न शोधायला बाहेर निघाला घरट्यातुन... जातांना चिमणीला त्या दिवशी आवर्जुन म्हणाला... काळजी घे स्वतःची... म्हातारी चिमणी मनातुन चरकली... म्हणाली, आज असं काय बोलताय ? चिमणा तीचा हात हातात घेवुन म्हणाला, आयुष्यात कधीच काही देवु शकलो नाही तुला... सुखसमृद्धी तर नाहिच नाही... पण एक पिल्लु ही तुझ्या पदरात टाकु शकलो नाही मी..... माफ कर मला... करशील ना...?

चिमण्याला हुंदका आवरेना... घराबाहेर पडवेना... चिमणी हळुच जवळ आली, तीने वृद्ध चिमण्याचा हात हातात घेतला, म्हणाली... पदर रिकामा कुठंय माझा...? तुमच्या प्रेमानंच पदर माझा काठोकाठ भरलाय हे काय कमी आहे ?

आयुष्यभर साथ दिलीत, पडले तर हात दिलात... मी संपुर्ण सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे.यानंतर घरट्यातुन कितीतरी वेळ चिमणा चिमणीचे हुंदके ऐकु येत होते... बोलत कुणीच नव्हतं, पण हजार शब्दांना जे जमणार नाही ते एका हुंदक्यात साठलं होतं.

एकमेकांच्या अश्रुत दोघांचेही म्हातारे पंख भिजुन गेले...!खुप वेळानं, चिमणी हातातुन हात सोडवत, पदर हातात घेवुन म्हणाली, आता फक्त अजुन एकच दान या पदरात टाका.... मला कधीच एकटीला टाकुन कुठं जावु नका... शेवटपर्यंत.... मरेपर्यंत सौभाग्यवती म्हणुनच मला राहु द्या... द्याल ना हे दान मला ? बोला ना, गप्प का... ?

चिमण्यानं निष्प्राण डोळ्यांनी चिमणीकडे पाहिलं, तीच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर चिमण्याकडं नव्हतं....आपला सुरकुतलेला थरथरता हात त्यानं चिमणीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला... सुखी रहा.... !!!

चिमणी सुखावली, म्हणाली, तुम्ही सोबत असाल, यातच माझं सुख आहे, तुम्ही सोबत रहाल ना कायम?

चिमणीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला चिमणा होताच कुठं... ? चिमणा केव्हाच भुर्र उडुन गेला... परत कधीही न येण्यासाठी...

चिमणी टाहो फोडुन चिमण्याला प्रश्न विचारत राहीली.... हातात हात घेवुन तो परत येईल या आशेनं मुक हुंदके देत राहीली.... पण चिमणा त्यादिवशी चिमणीला एकटीला सोडुन गेला तो गेलाच... परत आलाच नाही...!

आता चिमणी ख-या अर्थानं एकटी पडली...

रानातले "डोमकावळे" आता जागे झाले... या कावळ्यांनी एकट्या पडलेल्या म्हाता-या चिमणीला टोचा मारायला सुरुवात केली... त्यांना तीचं काडीकाडीनं बनवलेलं घरटं हवं होतं.चिमणी या डोमकावळ्यांशी आधी  लढली... मग रडली आणि नंतर कोलमडली...!

निगरगट्ट "काळ्या" कावळ्यांनी तीला घरातुन हुसकुन लावलं....चिमणीचा एकुलता एक आधार... तीचं घरटं, ते ही गेलं....आता चिमणी आली रस्त्यावर...

कुणाच्याही अंगणात पडलेले दाणे चोचीत घ्यायचे... त्या दिवसाचं पोट भरायचं ... जागा मिळंल तीथं अंग टाकायचं...

भोगलेल्या यातनाच इतक्या भयंकर की शरीर निगरगट्ट झालेलं,... उन वारा पाउस कशा कशानंही त्रास व्हायचा नाही.... मन तर त्याहुन बधीर... सुख आणि दुःख दोन्ही सारखंच.... !

दुस-याच्या अंगणात दाणे वेचतांना कुणी हुसकुन लावायचं, कुणी शिव्याशाप द्यायचं.... कुणी दगड मारायचं तर कुणी टोमणे.... दगडापेक्षा हे टोमणेच लागायचे जास्त.... पण करणार काय, भुकेला " "लाज" नसते...!

चिमणी आभाळाकडं बघायची... चिमण्याच्या आठवणीनं धो धो रडायची... पण तीचे डोळे पुसायला वेळ होताच कुणाकडं... ?

आणि म्हणुन देवाकडं रोज रोज मरणाचं दान मागत बसायची....

जग चालविणारा जो कुणी असेल, तो या अशा शापीत चिमण्यांना जन्माला का घालतो ?

माणसानं आस्तिक असावं की नास्तिक ? मला वाटतं, माणसानं या ही पेक्षा वास्तविक असावं.....!

तर, ही चिमणी एक दिवस माझे मित्र

"श्री. भापकर, नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष खडकी यांना दिसली....

पंख तुटलेल्या असहाय चिमणीला पाहुन, पहाडासारख्या या कणखर माणसाला पाझर फुटला,...

त्यांनी मला फोन केला, डाॕक्टर पंख तुटलेल्या या माऊलीला पंख द्यायचे आहेत.... बघा कायतरी....... एव्हढं बोलुन फोन कट्.... पुढचं बहुतेक बोलुच शकले नसावेत ते....!

मी या जर्जर चिमणीला भेटलो.... शुन्य नजर, भकास चेहरा आणि मेलेलं मन.... ती काही बोलेचना...

तीच्या वेदनांवर माझ्याकडं कुठलंही औषध नव्हतं,..डाॕक्टर असण्याची लाज वाटली मला ....!

कशीबशी जेमतेम माहीती कळल्यानंतर, मला तीची दुखरी नस जाणवली आणि मी ती बरोब्बर पकडली....

हातात हात घेवुन मी तो जादुचा शब्द वापरला..... "आई...."!तीचा चेहरा झरझर बदलला.... ती अविश्वासानं पाहु लागली.... त्यात कौतुक होतं, प्रेम होतं, माया होती....*

आई, या एकाच शब्दानं जादु केली....  इतकं फास्ट काम करणारं जगातलं दुसरं औषध मला माहिती नाही...

मी तीचा हात हातात घेतला आणि म्हटलं, आई, आजपासुन तु माझी आई, इथुन पुढची तुझी सर्व जबाबदारी माझी.... मला पोरगा म्हणुन स्विकारशील .... ?

आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी झुरली, ती गोष्ट अचानक पुढं आल्यावर ती भांबावली.... तीचा विश्वास बसेना.... शब्द सुचेना..... त्...त्...प्...प्.... करायला लागली.... मला तीची ही अवस्था बघवेना.... मी सरळ तीला माझ्या  छातीशी धरलं....!

यानंतर जे घडलं... ते इथं शब्दांत मांडण्यास मी असमर्थ आहे.... पण पहायला साक्षीदार म्हणुन कोसळणारा पाउस होता आणि सोबत आमचे हुंदकेही ....

सहज आभाळाकडं लक्ष गेलं .... एक पक्षी आमच्या डोक्यावरुन घिरट्या मारत होता.... हा त्या आजीचा चिमणा तर नसावा...? माय लेकरांची भेट पाहणारा.... मुल हवंय म्हणत तडफडुन गेलेला..... अतृप्त आत्मा तर नसावा...?

माहित नाही....

या वृद्ध चिमणीला आता स्वतंत्र आणि स्वतःचा आसरा देणार आहे....एका वृद्धाश्रमात या माऊलीची सोय शुक्रवार दि. 29 जुन 2018 पासुन करणार आहोत....इथुन पुढं कुणाच्याही अंगणात आता ही माऊली जाणार नाही भिक मागत... सन्मानानं जगंल....या माऊलीस अत्यंत सन्मानानं  कार मधुन या वृद्धाश्रमात घेवुन जात आहे....!शुक्रवारी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन मी निघालो.... मागुन हाक आली, बेटा, तु इतकं करतोयस माझ्यासाठी ....मी तुला काय देवु ?मी म्हटलं तु आई माझी.... पोरगा म्हणुन स्विकार केलास माझा... याहुन मोठं मला काहीच नाही..... !

ती म्हणाली, काय तरी घे...

म्हटलं, काय देशील आता ?

म्हणाली, तु माग....

म्हटलं, तुझे पंख दे....

अरे बेटा, तुटलेत हे पंख, तुझ्या कामाचे नाहीत ते...

म्हटलं, माझे नविन पंख तु घे, तुझे जुने पंख मला दे.... ज्या पंखांनी तुला इथवर आणलं, त्याची किंमत खुप आहे माझ्यासाठी.... या पंखांवरती मी जग जिंकेन.... !

तुटलेल्या पंखांनी जग कसा जिंकशील ? तीचा भाबडा प्रश्न...!

म्हटलं, आज तुझा मुलगा म्हणुन  नवीनच जन्म झालाय माझा.... तुच माझी आई आणि तुच माझं जग.... !

आता दुस-या कुठल्याही जगाला जिंकायची गरजच नाही मला....!

अरे बेटा , म्हणत ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली आणि मी त्या जुन्या तुटलेल्या पंखांवरुन हात फिरवत राहिलो.... कितीतरी वेळ.... !

पाऊस पुन्हा पुन्हा पडतच होता... कितीतरी वेळ...!!!✍️

मंगळवार दि. 26 जुन 2018

डाॕ. अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स

सोहम ट्रस्ट

9822267357

abhisoham17@gmail.com

www.sohamtrust.com



Saturday, 5 April 2025

भाषावार प्रांतरचना झालेल्या देशात समवर्ती सूचीतील शिक्षण केंद्रसूची होत आहे का ?

भाषावार प्रांतरचना झालेल्या देशात समवर्ती सूचीतील शिक्षण केंद्रसूची होत आहे का ?

महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मराठी आणि इंग्रजी भाषेसोबतच हिंदी भाषा देखील अनिवार्य करण्यात येणार आहे असे ऐकले.

अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे.प्रचंड विविधता असणाऱ्या आपल्या देशात भाषिक विविधता हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, अशा वेळेला कोणत्यातरी एखाद्या भाषेमध्ये संपूर्ण देश विलीन होऊन जावा असा अट्टाहास असू नये तसा तो असल्यास तो कशासाठी हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे?

  त्रिभाषा सूत्र हे केंद्र सरकारच्या आस्थापनांमधील कामकाजासंबंधीही महत्त्वाच आहे. त्रिभाषा (हिंदी,इंग्रजी आणि स्थानिक राज्यभाषा)सूत्राचा एकंदरीत आपला देश एकत्र यावा आणि कार्यालयीन कामकाज करतांना सोयीचे व्हावे हा उद्देश होता आणि आहे.

पूर्वीच दोन भाषा असताना आणखी एका भाषेची भर शालेय शिक्षणात आल्यावर त्याचा अतिरिक्त भार काही घटकांना वाटू शकतो. हिंदी भाषा म्हणून एक विषय औपचारिक दृष्ट्या आणला जाणार असला तरी  हिंदी चित्रपट तसेच मनोरंजनाच्या इतर माध्यमातून बहुतांश घटकांना आधीच हिंदी भाषा माहीत झालेली असते खूप मोठ्या प्रमाणात हिंदी चित्रपट, दूरदर्शनवरील विविध कार्यक्रम, वेब सिरीज इत्यादींच्या माध्यमातून आपल्या राज्यात हिंदी ऐकली जाते त्यामुळे बोललीही जाते,गरजेनुसार किंवा गरज नसतांनाही हिंदीचा वापर आपणास पहावयास मिळतो,यासाठी हिंदीचा प्रचार प्रसाराचं महत्त्वाचं श्रेय जातं ते आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे स्थापित झालेली, स्थिरावलेली आणि वाढत जाणारी हिंदी चित्रपट सृष्टीला अर्थात बॉलीवूडला. दक्षिणेतील राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्राने खूप प्रेमाने हिंदी फक्त स्विकारलीच नाही तर तिचा वापरही वाढवलेला दिसतो. तो इतका की प्रसंगी दोन मराठी माणसं मुंबईसारख्या मोठ्या शहरात एकमेकांना भेटल्यावर मराठी ऐवजी हिंदीतच बोलतांना आपण काही वेळा पाहतो, अनुभवतो. मराठी भाषेवर आईसारखं प्रेम करणाऱ्या लेकरांनी प्रसंगी आई पेक्षाही मावशीवरच जीव ओवाळून टाकला. हिंदीला प्रेम लावत असतानाच आपण सारेच आपल्या मराठी शाळा वाचवण्याचं आव्हानही पेलत आहोत.

तीनही भाषा इयत्ता पहिलीपासूनच शालेय शिक्षणात शिकवल्या जातील त्यामुळे हिंदीतून शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील तरुणांप्रमाणेच उत्तर भारतातील तरुणांना महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये फायदा होऊ शकतो. ही बाब उत्तरेसाठी सुखावणारी आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

सीबीएससी पॅटर्न म्हणजे शाळांच नियंत्रण सीबीएससी बोर्डाकडे जाणार आहे की काय? सीबीएससी पॅटर्न राबवला जाणार आहे याचा अर्थ सीबीएससी साठी वापरली जाणारी पाठ्यपुस्तक आहेत काय? म्हणजे देशभरात एकाच काठिण्य पातळीची पाठ्यपुस्तके सर्व राज्याला लागू होतील का ? मग त्या संदर्भातील नियंत्रण एनसीईआरटी करेल की एससीईआरटी करेल? की वरीलपैकी काहीही न होता फक्त सीबीएससी पॅटर्न म्हणजे पहिली पासून हिंदी लागू करून राज्यासाठी त्रिभाषा सूत्रे लागू करणे एवढेच आहे..? अशा प्रकारचे प्रश्न आणि संभ्रमावस्था पालकांमध्ये आणि इतर घटकांमध्ये दिसून येत आहे.

उत्तरेला दक्षिण दिग्विजयासाठी महाराष्ट्र काबीज करणे आवश्यक वाटत आहे मग तो भाषिक,सांस्कृतिक आणि राजकीय मार्गाने होण्यासाठी सुपीक जमीन जवळजवळ तयार झाली आहे याची सुरुवात स्वतःच्या मातृभाषेसाठी स्वाभिमानाने आग्रही न राहणाऱ्या समाजापासून होत असते असे वाटल्यास काही गैर आहे का ? हा प्रश्न देखील पडतो.उत्तरेतून येणाऱ्या अनेक स्वाऱ्या थेट दक्षिणेपर्यंत न पोहोचू देता त्या थोपवून धरणाऱ्या आणि परतवून लावणाऱ्या शूर पराक्रमी महापुरुषांचा प्रदेश ही पराक्रमी ओळख स्वाभिमानाने बाळगण्यात काय हरकत आहे ?

जगात आपली ओळख Unity in Diversity अर्थात 'अनेकता में एकता '( हैं हिंद की विशेषता) अशी आहे.

ती तशीच अबाधित ठेवू या.बागेत एकाच प्रकारची फुलं असावीत हा अट्टाहास कशासाठी ? सर्व फुले झाडांनी समृद्ध वन जोपासली पाहिजे नाहीतर विष वृक्ष वाढू शकतात. त्यासाठी भारतातील प्रत्येक राज्यांच्या विविधतेची ,संस्कृतीची आणि भाषांची अस्मिता जपणं आपल्या साऱ्यांची एकत्रित जबाबदारी आहे. इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा अनिवार्य झाल्यास भाषा लादली जात आहे, भाषेच्या माध्यमातून अतिक्रमण होत आहे असे जर राज्यांना वाटू लागले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अर्थात असा नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी प्रांत, भाषा असा भेद न करता साऱ्यांनीच भारतीय म्हणून एकत्र येणं आवश्यक आहे.✍️

          - शैलेश शिरसाठ.

Picture courtesy- Wikipedia




Wednesday, 2 April 2025

 बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे 'बाल आनंद मेळावा' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून तयार केलेले  खाद्यपदार्थ विविध स्टॉलवर विक्रीसाठी ठेवले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि आनंद मिळवला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमलाल  पाटील यांच्या हस्ते या आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका वंदना पाटील, शैलेश शिरसाठ तसेच विश्वासराव पाटील हे उपस्थित होते.

मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता निर्माण होणे, सहकार्य भावना वाढीस लागणे, व्यवहार ज्ञान आणि आनंदाचा अनुभव देणे होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्टॉलवर भेटी दिल्या आणि विविध खाद्यपदार्थांची चव घेतली. या कार्यक्रमाने सर्व उपस्थितांना आनंद दिला आणि एक आनंददायी वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.