Wednesday, 20 August 2025

बोधकथा (टीप- बोध घेतल्यास बोधकथा अन्यथा अहिराणी बोलीनुसार... बोध कथा? )

 नेहमीप्रमाणेच आटपाट नगर होते त्या नगरात अर्थात एक राजा होता.राजा असल्यामुळे सैन्य, सेनापती, स्तुतीपाठक असा सगळा लवाजामा होता.

गावाकडच्या किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी सैनिकांनी दोराने उतरावे किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी अशी चर्चा सैनिकांमध्ये सुरू होती.

  सेनापती सैनिकांना म्हणाला की, किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली जाण्यासाठी उड्या मारा कारण तुम्ही शूर सरदार आहात त्यावर एका अभ्यासू चिकित्सक सैनिकाने सेनापती या कार्यालयीन प्रमुखाला सांगितले की, त्यामुळे हाता पायाला दुखापत होऊ शकते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो. त्यावर हुशार सेनापती स्मित हास्य करीत म्हणाला की,"सैनिकांनो नकारात्मकता सोडा सकारात्मक विचार करा.तुम्ही असा नकारात्मक विचार का करतात की वरून उडी मारल्यानंतर काही दुखापत होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो त्याऐवजी असा विचार करा की वरून उडी मारल्यावर मला काहीही होणार नाही,मी सही सलामत उडी मारून सुखरूप राहू शकतो. 

त्यावर आपल्या कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या सेनापतीची स्तुती करत दुसरा सैनिक म्हणाला,"बरोबर आहे सेनापती साहेब, आपण खूपच बुद्धिमान आहात, शूर आहात आपणच हे प्रात्यक्षिक ह्या कमी समज असणाऱ्या सैनिकांना करून दाखवावे असे ऐकताच 56+1 म्हणजेच 57 इंची छाती झालेल्या सेनापतीने अत्यंत सकारात्मक वृत्तीने खाली उडी मारली आणि....

सेनापतीची स्वर्गातील उर्वशीचे नृत्य पाहण्याच्या सकारात्मक इच्छेसाठीचे एक पाऊल नव्हे तर अख्खी उडीच सार्थक झाली.

No comments:

Post a Comment