Wednesday, 20 August 2025

 आटपाट नगर होते अर्थातच त्या नगरात एक राजा होता. 

एके दिवशी राजा दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यासाठी निघाला राजासोबत प्रधानाचे जाणंही आवश्यक असल्यामुळे दौऱ्यावर राजाने प्रधानाला देखील घेतले आणि राजा शेजारच्या राज्यात दौऱ्यासाठी गेला. जातांना राजाने त्याचा खाजगी सेवक असणाऱ्या म्हणजे राजाचे हातपाय दाबून देणाऱ्या महादू नावाच्या एका शिपाई सेवकाला राजाच्या गृहावर (घरावर) वर लक्ष ठेवायला सांगितले थोडक्यात त्याला राजाच्या स्वतःच्या Home चे guard बनवले  जेणेकरून राजा परत आल्यावर राजाला काही माहिती कळू शकेल. 

परंतु झालं भलतंच होम चा गार्ड असलेल्या शिपायाला आपण राज्याचे प्रमुख आहोत असं वाटू लागले आणि तो प्रत्येक सैनिक आणि राजदरबारातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने वागू लागला तो कधीही कोणाशी प्रेमाने बोलत नव्हता तर राज्याचा खूपच मोठा अधिकारी असल्याच्या अविर्भावात प्रत्येकाला दरडावून बोलत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे, अर्वाच्य भाषेतील अश्लाघ्य,उर्मट वागण्या बोलण्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे देखील मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले होते आणि त्याचा विपरीत परिणाम अर्थातच त्यांच्या कामावर आणि राज्याच्या विकासावर विपरीतपणे झाला होता.

 राजा आपला दौरा आटपून पुन्हा राज्यात हजर झाले. राजा जसे आले तसे राजाने त्याचा सेवक असणाऱ्या महादू सेवक शिपायाने प्रत्येकाची कंप्लेंट करायला सुरुवात केली की, राज्यात कोणीच काम करत नाही असं म्हणत त्याने राजाच्या दरबारातील विशेष सैनिकांना बोलावले आणि राजासमोरच तो त्या दोन्ही सैनिकांना बोलू लागला तो एवढ्यावरच न थांबता त्याने एक चाबूक काढला होता आणि त्याने सांगितलं की राजे हा चाबूक घ्या आणि यांचे सालपटे काढून टाका. नाहीतर मग मीच यांना सरळ करतो. राजा त्या होमगार्ड महादूला म्हणाला अरे "महादू किती बोलतो, केवढ्या तावातवाने बोलतो जरा शांत हो आणि तू तर मलाच आदेश द्यायला निघालास आणि मला न विचारता तू चाबूक देखील आणून ठेवला आहेस या दोन्ही शिपायांना मारण्यासाठी." यावर महादू पुन्हा महाराजांनाच म्हणाला "महाराज हे दोनच नाही आणखी बरेच आहे आणि हो या दासीला पण चांगल चापकांनी फोडून काढा."महाराज महादू सेवकास म्हणाले ,"अरे पण मी तुला महिला कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं नव्हतं तरी देखील तू ते काम केलस. अरे महादू तोंड धु, केवढा बोलतोस अक्षरशः फेस आला तुझ्या तोंडाला.

अरे तू मलाच आदेश देतोय यांना शिक्षा करण्याची. मला तर एक वेळ वाटायला लागलं की मी या राज्याचा राजा आहे की तू? खरं म्हणजे तू पोलीस शिपाई देखील नाहीस तू केवळ एक सेवक आहेस.तुझा गार्डचा आणि शिपायाचा ड्रेस सारखा असल्यामुळे तुला तसा भास होतो आणि त्या भासातून काहीही वागून जातोय."

राजाने असे ठणकावून सांगितल्यावर देखील महादू पुन्हा दोन दिवसांनी राजाकडे गेला. आणि त्या शिपायांच्या आणि दासीच्या शिक्षा विषयी राजाला आठवण करून देऊ लागला तेव्हा राजा म्हणाले,"अरे मी दोन दिवसापासून बघतोय ही सगळी मंडळी तर खूप छान काम करत आहेत,अरे महादू मी ज्यावेळेला राज्याचा नेतृत्व करतो त्यावेळेला त्यांच्यावर हुकूम गाजवण्यासाठी नाही तर त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना कामात मदत करण्यासाठी नेतृत्व करतो त्यांना जीव लावतो म्हणून ते देखील मला जीव लावतात आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते पण हा मानवी स्वभाव आहे थोड्या बहुत चुका आपण सारेच करतो रे, म्हणून काय प्रत्येक वेळेला चाबूक हातात घ्यायचा असं नसतं. अरे आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो पण शिवाजी महाराजांचा नेतृत्वाचा हा गुण आपण घ्यायला पाहिजे की आपण आपल्या सोबत काम करणारा स्वराज्याचा प्रत्येक शिलेदार आपल्या सोबत काम करणार आहे असं मानलं पाहिजे आपल्या हाताखाली काम करणार आहे असं मानलं तर मग आपण हुकुमशहा होतो आणि शिवरायांनी हेच टाळलं सहकाऱ्यांसोबत आपल्या ताटात जेऊ घातलं त्यांना जीव लावला,प्रेम लावलं त्यामुळे ती स्वराज्यासाठी मरायला देखील तयार झाली.

अरे महाद्या , मी तुला दोन दिवसासाठी गृह शिपाई काय बनवलं तू तर हुकुमशहा झाला नेतृत्व करण्याची तुझी मुळीक क्षमता नाही हे माझ्या उशिरा का होईना लक्षात आले."

आता राजा दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्या दुसऱ्या राज्यात त्याला काय अनुभव आला ते पुढच्या कथेत अवश्य वाचा.   ......................

No comments:

Post a Comment