Wednesday, 20 August 2025

 किरण माने यांच्या नावाने आलेल्या मेसेजचा संदर्भ देत आपल्या बोली भाषेत..‌

हायकी भो आनं बहीनाजी!

चार्वाक, प्राचीन भारतातला पहिला समाजसुधारक... त्याच्या बायकोच्या लक्षात येत नव्हतं की नवरा नेमकं का करतोय हे काम? "आपला नवरा उगीचंच लोकांना 'बुद्धी वापरा, अंधविश्वास ठेवू नका' असं सांगत फिरतोय. चमत्कार म्हणून कायतरी असतं की.. जुनीजाणती माणसं काय येडी हायेत का?" असं तिचं म्हणनं होतं. एका मध्यरात्री चार्वाकानं आपल्या बायकोला गावच्या वेशीजवळ नेलं. तिथनं धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातल्या चौकापर्यंत आला. नंतर दोघंबी घरी गेले...

...दुसर्‍या दिवशी सकाळी तो पुन्हा बायकोला घेऊन चौकात आला. धुळीतल्या खुणा बघून गांवातली लोकं एकमेकांत चर्चा करायला लागलेवते. एका बुजुर्गानं सांगीतलं."हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत." सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. 'रात्रीच्या वेळी लांडगा येतोय', अशी अफवा पंचक्रोशीतल्या घराघरात पसरली.

...हे सगळं चार्वाक आणि त्याची बायको यांच्यासमोर घडलं. चार्वाकानं बायकोला विचारलं, "या धुळीत हे काय आहे ?" ती म्हणाली, 'हे तुमच्या हाताचे ठसे आहेत !” तो म्हणाला, “कायतरीच काय? गांवच काय अख्खी पंचक्रोशी म्हणतीय, हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.. ते काय वेडे आहेत का?" यावर ती म्हणली, “पंचक्रोशीतल्याच काय, सगळ्या जगातल्या लोकांनी येऊन मला तसं सांगितलं, तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे." 

चार्वाक म्हणाला, "मग इतकी वर्षं मी तरी लोकांना दुसरं काय करायला सांगतोय ?"

...विवेकी विचार म्हणजे काय? याचं याच्यापेक्षा चांगलं उदाहरण सापडणार नही लवखर. विवेकी माणूस ऐकलेली गोष्ट नीट पडताळून पाहून,परीक्षा करून मग खरं-खोटं, योग्य-अयोग्य ठरवतो. मुर्ख माणूस दुसरा सांगेल ते ऐकून आंधळा विश्वास ठेवतो. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हंजे, आज आपण सगळे सुशिक्षित आहोत. कोणतीबी गोष्ट असूद्या... व्हाॅटस् ॲॅपवरचा फाॅर्वर्डेड मेसेज असूद्या, नही त मंग न्यूज चॅनलवरली बातमी राहूद्या... त्या गोष्टीची नीट, चारीबाजूनी, मेंदू वापरून चिकीत्सा केल्याशिवाय आंधळेपणानं विश्वास कसा ठेवू शकतो आपण? 'आपली बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य' , 'आपला विवेक वापरायचा अधिकार' या निसर्गानं आपल्याले देल गय-या म्हणजे गय-या मोलाच्या देणग्या म्हण्याले पाहिजे, त्याचा नेम्मन वापर करा, हे सांगेल हे पाच हजार वर्षा पहिलेच्या चार्वाकांन...अडीच हजार वर्षा पहिलेच्या बुद्ध, बसवण्णा, चक्रधरस्वामींन... तीनशे वर्षा पहिलेच्या तुकोबारायानं.. आनि आजच्या दाभोलकरांलोंग सगळ्यांन ! चार्वाकाले लोकांनी जाईसन मारी टाकलं... चक्रधरस्वामी आणि तुकोबाराया अचानक बेपत्ता व्हीगेले...कुणी म्हणे तुकोबा गरूडावरून वैकुंठाले गेले..कुणी म्हणे चक्रधर स्वामी उत्तरेकढे निंघी गेले.. आणि दाभोलकरांले त ......असो.

आजच्या दिवशी फक्त अभिवादन क-यापेक्षा त्याहीचा 'विचार' पुढच्या पिढीत रूजवू, मुरवू, भक्कम करी टाकू... चार्वाकासारखं कमीत कमी आपल्या घरात तरी ते आपण करू शकतो. एवढं जरी आपणन करलं, तरी या महापुरूषांचं आपल्यासाठी जगणं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी मरणंबी सार्थकी लागी जाईन भो आनं बहीनाजी!

No comments:

Post a Comment