प्रिय वाचक आणि विद्यार्थी मित्रांनो,
दुर्गम भागात आपल्या आरोग्य सेवांच्या माध्यमातून जीव वाचवणाऱ्या 'सर्च', 'निर्माण' सारख्या संस्था आणि डॉ.बंग कुटुंबीयांसारखे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज १२ फेब्रुवारी उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन यांची जयंती. काल दैनिक लोकमत मध्ये पर्पजफुल या सदरात सर्च आणि निर्माण या युवा उपक्रमाचे प्रमुख आणि सहसंचालक अमृत बंग यांच्या सर्व्हायव्हल ऑफ द 'फिटेस्ट' नव्हे सर्व्हायव्हल ऑफ द 'काइंडेस्ट'! या लेखा निमित्ताने हा फक्त पत्र प्रपंच.✍️
अभय बंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी वर्धा येथे गांधीवादी कार्यकर्ते ठाकुरदास बंग आणि सुमन बंग यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये कार्यरत होते. अभय यांचे शिक्षण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नयी तालीम पद्धतीने झाले.
डॉ.अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग हे वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य करतात. त्यांच्या बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये त्यांचे मॉडेल वापरले जाते. त्यांचे लेख वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झाले आहेत.
१९८८ मध्ये स्थापन केलेल्या सर्च संस्थेमार्फत त्यांनी ५८ गावांतील ४८,००० लोकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. अशिक्षित महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्यदूत म्हणून कार्यरत केले.
अभय बंग यांनी रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा शास्त्रीय अभ्यास करून मजुरी ४ वरून १२ रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला, जो सरकारने मान्य केला. त्यांचे संशोधन "लोकांसोबत" करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी न्युमोनियाचे बालमृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सिद्ध केले.अभय बंग यांनी विकसित केलेल्या ब्रेथ काउंटर उपकरणामुळे ग्रामीण महिलांना नवजात बालकांच्या न्युमोनियाचे निदान करणे शक्य झाले. यावर त्यांचा शोधनिबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला.
गडचिरोलीतील कुपोषण आणि नवजात मृत्यूंवरील "कोवळी पानगळ" हा शोधप्रबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आपले धोरण बदलावे लागले.
अभय बंग यांच्यावर महात्मा गांधी, लोक आणि विज्ञान यांचा प्रभाव आहे. त्यांचे शिक्षक कार्ल टेलर यांनी "लोकांचे प्रश्न समजून त्यावर काम करा" हा विचार दिला. बंग दांपत्याची लोकांशी संवाद साधण्याची आणि साध्या उदाहरणांतून विषय समजावण्याची पद्धत प्रभावी आहे.
इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य प्राणी जन्म झाल्यानंतर स्वतःच्या शारीरिक क्षमता विकसित करून स्वतःचे पोषण करू शकेल अशा अवस्थेत यायला अधिक वेळ घेतो तो शारीरिक दृष्ट्या पूर्ण सक्षम होण्याच्या आधीच इतर प्राण्यांनी त्याची शिकार केल्यास मानवाच अस्तित्व शिल्लक राहू शकणार नाही आणि म्हणूनच मानवास एकमेकांच्या सहयोगानेच मनुष्य प्राण्याला तसेच एकंदरीतच पर्यावरणाला अधिक सुरक्षित करता येईल त्यासाठी दुसऱ्या प्रती प्रेम करण्याची भावना अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसऱ्याला मारून शिकार करण्यापेक्षा दुसऱ्याला जगवून एकंदरीतच आपला मानवीय वंश पृथ्वीवर सुरक्षित ठेवता येईल.
स्वतः fit, शक्तिशाली असतानाही किंबहुना fit, शक्तिशाली असल्याचा फायदा घेत दुसऱ्याला मारून विध्वंस न करता दुसऱ्याला जगवून'निर्माण' करता आले पाहिजे. दुर्गम भागात आपल्या आरोग्य सेवांच्या माध्यमातून जीव वाचवणाऱ्या सर्च, निर्माण सारख्या संस्था आणि डॉक्टर अभय बंग कुटुंबीयांसारखे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
शैलेश,जळगाव.
कुठला आदर्श घेणार वरवर नायक वाटणाऱ्या "जिसकी लाठी उसकी भैस " म्हणणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या पात्रांचं की, माणूस आणि जंगली हिंस्र प्राणी यातील फरक दाखवणाऱ्या करुणामयी मानवतावादाच.

No comments:
Post a Comment