Monday, 22 January 2024

'ओळखलत का भक्तांनो मला'?
ओळखलत का भक्तांनो मला?
तुम्ही मला चार भिंतीत मातीच्या एका विशिष्ट आकारात पाहत आहात पण
मी तर पृथ्वी,जल,अग्नी,वायू,आकाश
या पंचतत्वातील कणाकणात होतो,आहे आणि सदैव राहणार,
त्या कणाकणात बघा मला...
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

 कर्णकर्कश गोंगाटात नव्हे तर
 शांत,संयमी ध्यानधारणेत अनुभवा मला
 आणि खरंच सांगा ओळखलंत का भक्तांनो मला ?
जात,धर्म,लिंग असा भेद न करता
मानवता स्थापन करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे
त्या प्रत्येक प्रयत्नात बघा मला....
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
माझ्या लेकींची धिंड पाहणाऱ्या संवेदनाहीन झुंडींचा भाग होणाऱ्यांनो,
तुम्ही मला कधी पाहणार ?
मी तर लेकींसाठी लढणाऱ्या प्रत्येक बापात आहे,
त्या लेकींच्या निष्पाप नजरेतून बघा मला.. आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

धर्मांधतेने माखलेल्या तिरस्काराच्या भिंतीवरील
रूधिरांच्या धारा पाहून आसुरी आनंद घेणाऱ्या प्रवृत्तींनो,
आसुरी,अविवेकी धर्मांधतेच्या संहारात बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
जाती धर्म आणि स्त्री पुरुष असा भेद न करता.
समतेच्या घटनेची आणि घटनेच्या समतावादी मांडणीत मी आहे,
मांडणी करणार्‍या त्या हातांमध्ये बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

एक राजा म्हणून 'माझे प्राण आणि माझी प्रतिष्ठा' माझी जनताच आहे.
'माझ्या नावाने होणाऱ्या तुमच्या सोहळ्यात
' माझे प्राण आणि प्रतिष्ठा असणारी 'माझी शबरी आई' दिसली नाही मला ..
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
चुकीला चुकीच योग्य ला योग्य असं परखड
पद्य,गद्यातील वाणी आणि लेखणीत बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
✍️ 'शैलेशकमल'

Saturday, 20 January 2024

माझ्या प्रिय बांधवांनो पत्रास कारण की,'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हम वतन है,हिंदुस्ता हमारा..

✍️ प्रिय बांधवांनो आज आपल्याला त्या कुटुंबवत्सल श्रीराम प्रभूंची जास्त गरज आहे,जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. जाती,धर्म,पंथ याच्या नावावर जो भेदभाव न करता शबरीची उष्टी बोरंही खातो. आई-वडिलांची आज्ञा पाळतो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम संस्कारांचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही *आपण त्यांना एखाद्या विशिष्ट मर्यादित कसे बांधू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम अथांग आहेत २२ तारखेलाच नाही तर राम नवमीला देखील प्रभूरामांचा उत्सव झालाच पाहिजे.🚩 आपण सारी परमेश्वराची लेकरं, आपण काय कोणाला आणणार, परमेश्वरानेच आपल्याला आणल आहे,*आपल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मर्यादेत राहून पुरुषोत्तम होण्यासाठी....✍️ shaileshshirsath.blogspot.com

Special Thanks $ courtesy NEWS 18 Gujarathi

Wednesday, 17 January 2024

होय माझे भावंडे सुशिक्षित असण्याचा माझा अंदाज खोटा ठरला

हल्ली मानसिक आणि भावनिक गरजेच्या माध्यमातून लोक काही यंत्रणेच्या भूलथापांना बळी पडले आहेत पडत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे,त्यामुळे लोक खऱ्या अर्थाने फक्त साक्षर नाही तर हळूहळू सुशिक्षित होत आहेत हा माझा अंदाज साफ खोटा ठरला ठरत आहे सगळीकडे वेगळ्याच प्रकारचे धुंदी देशभर आहे या धुंदीत कोणीतरी आपल्याला गंडवत आहे,आपल्या भावनांचा उपयोग स्वतःच्या यंत्रणेच्या स्वार्थासाठी करत आहे एवढं भान देखील माझ्या काही भावंडांना नाही माझी भावंडे हे भूलथापांना बळी पडणार नाही असे मला वाटत होते परंतु माझा अंदाज साफ खोटा ठरला.होय चुकलोच मी. ...

Wednesday, 3 January 2024

प्रिय नातवांनो
तुम्ही कुठेतरी साहेब झालात,अधिकारी झालाय आता तुम्हाला रुबाबात मिरवता येईल म्हणून नव्हे तर आता तुम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. 
माझ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलाही अहंभाव न ठेवता  हे लक्षात असू द्या की,आपली निवड 'लोकसेवेतून' झाली आहे. म्हणून तुम्ही बॉस जरूर आहात परंतु अधिकाधिक लोकांसाठी सेवा देणारे बॉस.पदाच्या अहंभावनेतून रुबाब लादणारे बॉस नव्हेच. लोक तुम्हाला तुम्ही आदर्श आहात म्हणून आदर भावनेतून (Reverence) घाबरत नसतील आणि तुम्ही तुमच्या पदाच्या माध्यमातून त्यांना त्रास देऊ शकतात या भीतीपोटी घाबरत असतील तर हे योग्य होणार नाही कारण अशा मुळे देश स्वातंत्र्य झाल्यावरही जुलमी राजवटीचा भास होत राहील...  खरं म्हटलं म्हणजे साहेब हा शब्द ब्रिटिश काळात गोऱ्या साहेबांसाठी आपण मोठ्या प्रमाणात वापरत होतो. इंग्रजांच्या काळात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी एका रुबाबात मिरवत होता आणि तो रुबाब ब्रिटिश साम्राज्यशाहीच नेतृत्व करणार होता असे सर्वसाधारण चित्र भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे होते . भारतीयांना तुच्छ समजणाऱ्या प्रवृत्तीचे तेतृत्व करणाऱ्या गोऱ्या साहेबाचे दुर्गुण आपल्यात नको. भारत देश गुलाम असल्यामुळे मेहरबान साहेबास अत्यंत लीन दिन होऊन पत्र लिहिली जात होती (मेहेरबान  साहेबांच्या सेवेत अशा आशयाने )मुजरे केले जात होते परंतु माझ्या प्रिय नातवांनो तुम्ही ज्या देशात अधिकारी झाला आहात तो देश आता स्वातंत्र्य झाला आहे आणि तुम्ही साम्राज्यशाही व्यवस्थेचे क्रूर अधिकारी नाहीत. स्वतःच्याच देशात स्वतःच्याच बांधवांच्या सेवेसाठी, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पदावर आहात ,तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदासाठी तुम्ही लोकसेवा आयोगातून अधिकारी झालेला आहात यातील सर्वात महत्त्वाचा शब्द 'लोकसेवा' हा आहे म्हणून तुम्ही लोकांचे सेवक आहात. शक्य झाल्यास तुमच्या कार्यालयाबाहेर तुमचा हात जोडलेला फोटो लावा आणि त्या खाली लिहा May I help you.. In your service - xyz. मित्रानो तुम्ही पास झाल्याबरोबर तुमच्या मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या पदाचा गर्व अहंकार येऊ देऊ नका. लोकांनी तुम्हाला सलाम करण्यापेक्षा तुमच्याकडे येणाऱ्या माणसांना तुम्ही लोकसेवक म्हणून स्वतः सलाम करा. कारण पूर्वी पारतंत्र्यात लोक लिनदिन हीन होऊन या पदांना सलाम करत होते गुलामासारखे राबत होते ती परिस्थिती आता नाही कारण आता भारत हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला आहे.ब्रिटिशांची किंवा कुठल्याही राजवटीची गुलामगिरी आता नसल्यामुळे तुम्ही राजवटीचे क्रूर अधिकारी न होता नम्रतापूर्वक स्मित हास्य करून लोकांच्या समस्या सोडवा कारण तुम्हाला देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही परीक्षा पास झाला म्हणून नव्हे तर तुम्हाला अधिकाधिक लोकांची सेवा कमी वेळात, सुविधाजनक परिस्थितीत करता यावी यासाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा. तुमच्या ठाई रुबाब असावा पण तो रयतेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखा जे सर्वसामान्य रयतेचा, कष्ट करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मानवतावादी दृष्टिकोनातून सदैव विचार करत असत. तुमची लायकी तुमच्या ज्ञानावर आणि तुम्ही जगात असलेल्या मानवतावादी विचारांवर असते ती तुमच्या पदांवर नसते हे लक्षात ठेवा. पद ही संधी आहे तिचं न्याय मार्गाने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने सोनं करा. 
तुमचा‌ आजोबा.
"May I help you?" should be your attitude and duty as the most powerful servant of society for humanity.