प्रिय नातवांनो
तुम्ही कुठेतरी साहेब झालात,अधिकारी झालाय आता तुम्हाला रुबाबात मिरवता येईल म्हणून नव्हे तर आता तुम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. माझ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलाही अहंभाव न ठेवता हे लक्षात असू द्या की,आपली निवड 'लोकसेवेतून' झाली आहे. म्हणून तुम्ही बॉस जरूर आहात परंतु अधिकाधिक लोकांसाठी सेवा देणारे बॉस.पदाच्या अहंभावनेतून रुबाब लादणारे बॉस नव्हेच. लोक तुम्हाला तुम्ही आदर्श आहात म्हणून आदर भावनेतून (Reverence) घाबरत नसतील आणि तुम्ही तुमच्या पदाच्या माध्यमातून त्यांना त्रास देऊ शकतात या भीतीपोटी घाबरत असतील तर हे योग्य होणार नाही कारण अशा मुळे देश स्वातंत्र्य झाल्यावरही जुलमी राजवटीचा भास होत राहील... खरं म्हटलं म्हणजे साहेब हा शब्द ब्रिटिश काळात गोऱ्या साहेबांसाठी आपण मोठ्या प्रमाणात वापरत होतो.
इंग्रजांच्या काळात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी एका रुबाबात मिरवत होता आणि तो रुबाब ब्रिटिश साम्राज्यशाहीच नेतृत्व करणार होता असे सर्वसाधारण चित्र भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे होते . भारतीयांना तुच्छ समजणाऱ्या प्रवृत्तीचे तेतृत्व करणाऱ्या गोऱ्या साहेबाचे दुर्गुण आपल्यात नको. भारत देश गुलाम असल्यामुळे मेहरबान साहेबास अत्यंत लीन दिन होऊन पत्र लिहिली जात होती (मेहेरबान साहेबांच्या सेवेत अशा आशयाने )मुजरे केले जात होते परंतु माझ्या प्रिय नातवांनो तुम्ही ज्या देशात अधिकारी झाला आहात तो देश आता स्वातंत्र्य झाला आहे आणि तुम्ही साम्राज्यशाही व्यवस्थेचे क्रूर अधिकारी नाहीत. स्वतःच्याच देशात स्वतःच्याच बांधवांच्या सेवेसाठी, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पदावर आहात ,तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदासाठी तुम्ही लोकसेवा आयोगातून अधिकारी झालेला आहात यातील सर्वात महत्त्वाचा शब्द 'लोकसेवा' हा आहे म्हणून तुम्ही लोकांचे सेवक आहात. शक्य झाल्यास तुमच्या कार्यालयाबाहेर तुमचा हात जोडलेला फोटो लावा आणि त्या खाली लिहा May I help you..
In your service - xyz. मित्रानो तुम्ही पास झाल्याबरोबर तुमच्या मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या पदाचा गर्व अहंकार येऊ देऊ नका. लोकांनी तुम्हाला सलाम करण्यापेक्षा तुमच्याकडे येणाऱ्या माणसांना तुम्ही लोकसेवक म्हणून स्वतः सलाम करा. कारण पूर्वी पारतंत्र्यात लोक लिनदिन हीन होऊन या पदांना सलाम करत होते गुलामासारखे राबत होते ती परिस्थिती आता नाही कारण आता भारत हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला आहे.ब्रिटिशांची किंवा कुठल्याही राजवटीची गुलामगिरी आता नसल्यामुळे तुम्ही राजवटीचे क्रूर अधिकारी न होता नम्रतापूर्वक स्मित हास्य करून लोकांच्या समस्या सोडवा कारण तुम्हाला देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही परीक्षा पास झाला म्हणून नव्हे तर तुम्हाला अधिकाधिक लोकांची सेवा कमी वेळात, सुविधाजनक परिस्थितीत करता यावी यासाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा. तुमच्या ठाई रुबाब असावा पण तो रयतेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखा जे सर्वसामान्य रयतेचा, कष्ट करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मानवतावादी दृष्टिकोनातून सदैव विचार करत असत.
तुमची लायकी तुमच्या ज्ञानावर आणि तुम्ही जगात असलेल्या मानवतावादी विचारांवर असते ती तुमच्या पदांवर नसते हे लक्षात ठेवा. पद ही संधी आहे तिचं न्याय मार्गाने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने सोनं करा.
No comments:
Post a Comment