Image courtesy- Esakal
कायद्याच्या ज्या तरतुदीमुळे भोंदू बाबाला अटक करण्यात येऊन त्याला शिक्षा होणार आहे तो कायदा आणण्यासाठी व्यवसायाने डॉक्टर असणारे जेष्ठ समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर लढा दिला खरंतर त्यांचे आभार मानायलाच हवे.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून समाजात विवेक विचार, आणि विज्ञान रुजविण्याचा प्रयत्न केला . त्यांनी माणसाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रेरणादायक आहे.
अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी सातत्याने अठरा वर्ष दाभोळकरांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केले अखेर जादूटोणा विरोधी कायदा डॉ. दाभोळकरांच्या खुनानंतर मंजूर झाला. भोंदू बाबा,स्वतःचे भविष्य माहित नसणारे भोंदू ज्योतिषी हे लोकांच्या लोभ,प्रलोभन, आणि भीती सारख्या भावनिक गरजेतून बौद्धिक आणि वैचारिक गुलाम बनवत आहे. यात स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पण खरे तर फक्त साक्षर असणारे मोठ्या संख्येने आहेत.
आपल्याकडे प्रबोधनकारी संत परंपरा असताना आपल्याला संत म्हणून घेणारे भोंदू बुवा बाबा हवेतच कशाला? महाराष्ट्राची संत परंपरा ही भक्ती, समता आणि मानवतावादाचा पाया रचणारा एक संपन्न सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी संप्रदायाने विठ्ठलभक्तीद्वारे जातीभेद मोडून समाजाला अभंगातून ज्ञानाचा व प्रेमाचा संदेश दिला.भगवान श्रीचक्रधरस्वामीं, संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज,संत एकनाथ महाराज,संत चोखामेळा महाराज,संत गोरोबा महाराज, संत जनाबाई माऊली यांसारख्या समतेचा पाया रचणाऱ्या संतांनी लोकसंस्कृतीला समृद्ध केले.
..✍️

No comments:
Post a Comment