अहिंसा परमो धर्म मानणाऱ्या बापूंच्या आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे मानवतावादी मर्म समजावून सांगणाऱ्या पूज्य साने गुरुजींच्या देशात हल्ली दोन चित्रपट कमालीचे लोकप्रिय झालेत विशेषत तरुणाईत.हे त्या चित्रपटातील सर्व टीमचे यश नक्कीच असेल परंतु चित्रपट पाहिल्यावर आणि सामाजिक जीवनात पडणाऱ्या प्रभावाकडे पाहिल्यास चित्रपटांच्या माध्यमातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतय का ? असा प्रश्न पडतो. कारण चित्रपटातील मुख्य पात्र हे चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध हिरो (नायक) आहेत, तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत, त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत त्यांच्या कपड्यांची, एकंदरीत लाईफ स्टाईलची कॉपी करतांना तरुणाई दिसते.या सुप्रसिद्ध नायक कलाकारांच्या यापूर्वीच्या चित्रपटातील भूमिका सकारात्मक आदर्शवादी नायकांच्या आहेत... या चित्रपटांमध्ये मात्र ते सहजपणे कायदा हातात घेतात आणि विविध प्रकारचे गुन्हे करतांना दाखवले आहे.विशेष चिंतेची बाब म्हणजे हे सगळं होत असताना चित्रपटगृहात नायकाच्या चुकीच्या भूमिकेचा निषेध करण्याऐवजी टाळ्या आणि शिट्ट्यांची सलामी त्यांना दिली जात आहे.
चित्रपटाची कास्टिंग करत असताना गेल्या अनेक वर्षापासून परंपरेने विलनच्या, खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका म्हणजेच आताच्या नायिकांनी भूमिका म्हणजे तेच रोल केले असते तरीदेखील हे चित्रपट गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे राहिले असते का ? कदाचित आर्थिक-सामाजिक परिस्थितीमुळे चित्रपटातील नायक असे घडले असतील हे दाखवण्याचा हा प्रयत्न असला तरी देखील तरुणाई हे कशाप्रकारे घेत आहे हे देखील महत्त्वाच आहे.चित्रपटातील नायकांच्या भूमिका या खलनायकांच्या वाटतात का ? चित्रपट कसं जगू नये हा धोका दाखवणारा आहे असं पळखाऊ समर्थन होऊ शकतं, अर्थात किती तरुण असा विचार करणार,सावध होणार की आपल्या आवडत्या नायकांच्या भूमिका फॉलो करणार? चित्रपटातील नायकाला रॉबिन हूड सारखा गरिबांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष मदत करताना दाखवलेलं नाही याचा आश्चर्य वाटल.गरिबांना मदत करणं दाखवलं असलं तरी कायदा हातात घेऊन बेकायदेशीर बाबींचे समर्थन करता येऊ शकत की नाही याचाही विचार ज्याने त्याने आपापल्या परीने करावा. याचा दुसरा भाग येणार असल्याबाबत चर्चा आहे कदाचित दुसऱ्या भागात नायक गरिबांना मदत करीत आहे असेही दाखवलं जाईल काही सांगता येत नाही.
आपल्या आवडत्या नायका प्रमाणे त्यांनी दाढी जरूर वाढवावी परंतु वाढवलेली स्टायलिश दाढी ही रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणाऱ्या जनतेच्या राजांप्रती प्रेम आणि प्रेरणा आहे किंवा चित्रपटांचा स्वॅग आणि केवळ दिखाऊ फॅशन हे सिद्ध करण्याची संधी देखील या निमित्ताने गमावू नये.....✍️
शैलेश शिरसाठ.