Monday, 27 March 2023

संवाद छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती नरवीर तानाजी मालुसरे यांचा.

 गल्ली ते दिल्ली वेगवेगळ्या गटातटातील क्रिकेट लीगचे सामने सुरू होते. अशाच एका क्रिकेट लीगचा सामना सुरू होता 
 आणि काय आश्चर्य रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जिवलग मित्र सेनापती तानाजी मालुसरे यांच्यासह डिजिटल टेक्नॉलॉजीच्या या युगात महाराष्ट्रात आणि देशात नेमकं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी आले.

  ग्रामीण भागात आणि शेतीसाठी वीज कपात करून विज वाचवणाऱ्या महाराष्ट्रात प्रचंड खर्च करून विद्युत दिवांच्या आणि ज्या विजेवर शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चालतात त्याच विजेवर चालणाऱ्या डीजेच्या कर्णकर्षण आवाजात क्रिकेटचे सामने सुरू होते. 
महाराजांनी तानाजींना विचारले,"तानाजी हे कसले सामने आहेत. तानाजींनी उत्तर दिले महाराज हे मराठा प्रीमियर लीग सुरू आहे. हे क्रिकेटचे सामने आहेत."
 तुझा नातू पण असंच काहीतरी खेळतो ना? चल आज त्याचा खेळ बघुया" छत्रपती शिवराय तानाजींना म्हणाले.तानाजी शिवरायांचे बोलणे ऐकून थोडेसे व्यथीत होऊन म्हणाले, "पण महाराज हा खेळ फक्त मराठा खेळाडूंसाठीच आहे." 
 त्यावर शिवराय म्हणाले,अरे हो ते मला माहित आहे म्हणूनच तर मी म्हटलं की आज माझ्या सर्व जाती-धर्माचे मावळे खेळ भावनेने कसे खेळतात हे मला बघायचे आहे."

 अहो पण महाराज या क्रिकेट लीग मध्ये माझ्या वंशजांना, आपल्या हिरोजी इंदलकर , मदारी मेहतर, रुस्तम मे जमान, सिद्धी इब्राहिम,जीवा महाला, सरनौबत नुरखान बेग या आणि यासारख्या स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या कुठल्याही वंशजाला खेळण्याची परवानगी नाही यात फक्त जन्माने मराठा जातीत जन्मलेल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे."

 यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त करत शिवराय म्हणाले " हे काय बोलत आहात तुम्ही तानाजी.अहो हे तर क्रिकेटचे मराठा प्रीमियर लीग ना? मग यात मराठा नाहीत असे का?
 "माफ करा महाराज पण या मूलखावर प्रेम करणारे, आपल्या मराठीसह सर्वच बोलीभाषांवर प्रेम करणारे,सर्व जाती-धर्म यातील लोक म्हणजे मराठा ही आपली व्याख्याच या लोकांनी बदलली आहे "तानाजी म्हणाले. त्यावर शिवराय म्हणाले,
 तानाजी खेळात शारीरिक, मानसिक, तार्किक विकासासोबतच खेळ भावना महत्वाची की जात?
 असं असेल तर मग आपण काय मिळवलं ? आमची समाधी शोधून समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा या समतावादी विचारसरणीतून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक विचारचं आणि समाजाचं काय झालं ?
 जातीपाती आणि भेदभाव हवेतच कशाला?
 तानाजी आहो आपल्याला जाती अंताचा लढा आता लढावा लागणार आहे?
 यावर तानाजी म्हणाले,
"महाराज तुमच सर्व खरं आहे पण,
आपल्या देशात असे होणार नाही असे चित्र वेळोवेळी दिसले आहे आपल्या देशात लोकांना त्यांची जातच त्यांची एक महत्त्वाची ओळख वाटत आहे.विशेषतः स्वतःच्या जातीला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जाती,सर्व जाती एकत्र करण्याला कधिच प्राधान्य आणि मान्यता देणार नाही, कारण त्यामुळे त्यांचे जन्माने मिळालेले जातीचे श्रेष्ठत्व नाहीसं होईल. 
आज देशात जवळपास प्रत्येकजन आपापली जात कुरवाळत बसला आहे.आज देशात जवळपास सर्वच जातींचे गट-तट ,मंडळ,संघटना,सेल, आणि आता हे क्रिकेटचे लीग आहेत. सर्व जाती धर्मियांना एकत्र करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली होती परंतु बहुजन म्हणवणाऱ्या सर्वच जातींनी सुद्धा सत्यशोधक समाजामध्ये स्वतःला समाविष्ट करून घेतलं नाही महाराज"

 तानाजींच्या या बोलण्यावर शिवराय म्हणाले, 
 "यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, आपल्याला या सर्वच आयोजकांशी बोलावं लागेल तानाजी."

 एवढ्यात जोरात मोबाईलचा अलार्म वाजला आणि मी झोपेतून उठलो. मी आजूबाजूला पाहिलं. महाराजही दिसेनात आणि सेनापती तानाजीही.
 सकाळचे पाच वाजले होते. सकाळची स्वप्न खरं होतात असं ऐकलं होतं. मी खिडकीतून बाहेर आकाशात पाहिलं, अंधार होता पण थोड्या वेळात सूर्योदयही होईल याची खात्री होतीच....✍️
 - शैलेशकमल