Sunday, 5 June 2022

महिला आणि ओबीसी सक्षमीकरणाचे आधुनिक भारतातील प्रणेते डॉक्टर बाबासाहेब

 प्रिय नातवंडांनो महिला सक्षमीकरण आणि एकंदरीतच मानवतावादाच सक्षमीकरण म्हणजेच विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

 विशेषतः माझ्या नातींना मला हे सांगायचे आहे की तुम्हाला तुमच्या भावाप्रमाणेच मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. कदाचित याचं तुम्हाला फार विशेष वाटणार नाही परंतु अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 123 वर्षं लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हा हक्क मिळायला 100 वर्षं वाट पाहावी लागली.स्वित्झर्लंडच्या काही भागात महिलांना मत देण्याचा अधिकार आपल्या नंतर खूप उशिरा 1974 साली मिळाला.सौदी अरेबियात महिलांना मतदानाचा अधिकार तेथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत 2015 ला मिळाला. याउलट भारतीय महिलांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यादिवशीच मतदानाचा अधिकार मिळाला.हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारासाठी आग्रही असणाऱ्या बाबासाहेबांनी समस्त महिलांच्या अधिकारासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता 

1950 मध्ये आपल्या भारताला स्वत:ची राज्यघटना मिळाली धार्मिक आणि जातीय भेदभाव तसेच स्त्री-पुरुष असा भेदभाव नाकारून आणि लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांना मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या तात्कालीन नेतृत्वांच्या प्रयत्नातून मिळाला.

स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित, वर्णव्यवस्थेवर आधारित किंवा जातीय आणि आणि धार्मिक भेदभाव न ठेवता सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार बहाल करून लोकशाहीचा विचार 1951 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच झाला होता याची तुला मुद्दाम आठवण करून देत आहे.

अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे.

 प्रिय नातवांनो वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद तार्किक विचार समतेचा अर्थ समजून घेणारी ग्रंथ आणि पुस्तके यांचे वाचन करा. समतावादी विचारवंतांचे साहित्य अवश्य वाचा. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारणाऱ्या काल्पनिक चमत्काराला नमस्कार करणाऱ्या कपोल कल्पित,भंपक काल्पनिक भाकडकथांचे वाचन करणार असाल तर मग आपलं प्रबोधन होणे कठीण आहे कारण असं चिकित्सेला, वैज्ञानिक दृष्टीकोनाला नाकारणारे साहित्य वाचन आपल्याला बौद्धिक गुलामगिरीकडे नेत असते.

नातवांनो ज्या लोकांना वाचायला, अभ्यास करायला खरा इतिहास समजून घ्यायला वेळच नाही अशा आपल्या बांधवांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि विशेषतः फुले,शाहू,आंबेडकर,राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या कर्त्या सुधारणावादी महामानवांचे विचार पोहोचवूया.

दुर्दैवाने भारतात असंख्य लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळालेच नाही तसे पाहिले तर जगात जिथे जिथे भेदभाव आहे, समतेचा अभाव आहे अशा ठिकाणी तिथल्या मानवी मूल्यांच्या लढ्यासाठी, न्याय हक्कासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेतृत्व करणारे महामानव आहेत,कारण त्यांनी वर्णव्यवस्थेतील सर्व जातींचा सर्व धर्मातील स्त्रियांचा तसेच ओबीसींचा सर्वप्रथम विचार केला मग स्वतःच्या जातीचा.असे असल्यावरही आज बहुजनांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी आहेत का ? याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आता बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत तसबीरी घरात लावण्याची गरज काय? असा न पटणारा युक्तिवाद ही मंडळी करू शकतात कारण अशी माणसं जाती जातीत महापुरुषांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विभागणीच करतात आणि स्वतःच्या जातीशी संबंधित असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा मात्र आवर्जून घरात स्थापित करतात.आजही आपण कुणाच्याही घरात जाऊन तिथे असणार्‍या प्रतिमांवरून त्यांची जात ओळखू शकतो. याला काही ठिकाणी अपवादही असेल परंतु तेही अपवादानेच हे खेदाने नमूद करावसं वाटतं.

आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास ओबीसींसह सर्व समाज घटकांचे, सर्व महिलांचे ,एकंदरीतच मानवतेचे मसीहा म्हणजे विश्वरत्न,आधुनिक जगाचे खरे नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. खरं पाहता ओबीसींना बाबासाहेबांनी  स्वतःच्या जाती आधी ओबीसींसाठीचे आरक्षण दिले. कळत नकळत काही समाज घटक स्वतःला मागासवर्गीय बांधवांपेक्षा वेगळे आणि उच्च समजण्याची चूक करतात.

देशातील सर्वच महामानवांना, समाज सुधारकांना जातीपातीत न विभागता जातीअंताचे मार्गदर्शक म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे,कारण हा लढा जातीपातींचा नसून मानवीय मूल्यांचा लढा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं.

महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे आणि त्यांच्या सामाजिक विचारांवर कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना कायद्याने सक्षमीकरणाच्या वाटा खुल्या करून दिलेल्या आहेत म्हणून भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने बाबासाहेब दैवत आहे,ते तर त्यांच्या गळ्यातील ज्ञानातंत्राचा  ताईतच पाहिजे...✍️ 







No comments:

Post a Comment