हे माधवा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार...?
समाज माध्यमांवर आम्ही अत्याचाराच्या घटनांचा निषेध करणार..पण सांगा माधव तुम्हीच आमच्यातला कृष्ण केव्हा जागृत होणार ?
चित्रपटांमधील गाण्यातून,संवादातून होणाऱ्या भगिनींच्या अपमानाबद्दल आम्ही काहीच नाही बोलणार..
पण अत्याचाराच्या घटनांचा माना खाली घालून निषेध करणार..
माना आमच्याखाली, माना जशा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणवणाऱ्या तरुणाच्या आणि पितामहा म्हणवणाऱ्या ज्येष्ठांच्या,अशाने खरंच कसा न्याय होणार..?
हे माधवा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार...?
तिच्या कपड्यांवरून आम्ही 'तिलाच' दोषी ठरवणार...
अत्याचार करणाऱ्या 'त्याचं' धर्मराज युधिष्ठिरी कसं समर्थन करणार...?
हे माधवा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार...?
अपेक्षा आता तिला आमच्यातल्या सद् रक्षण कर्त्या आणि खलनिग्रह कर्त्या कृष्णाची....
द्रौपदीच्या आर्त हाकांना
सुदर्शनधारी साद कसा मिळणार ?
हे माधवा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार...?
जुगारातल्या मैफिलींचे जगणेच लाचार,
निषेध आमचे आता धृतराष्ट्रासारखे कसे आंधळे होणार..?
हे माधवा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार...?
किर्तन तुमच्या नावाचे अन्
जागरण तुमच्या जन्माचे वर्षानुवर्ष होणार,पण
हे कृष्णा तुम्हीच सांगा आमच्यातला 'कृष्ण' केव्हा जागृत होणार..?
- शैलेश शिरसाठ.