आपण अशा जगात राहतो की,ज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा समाज माध्यमांवर अर्थात सोशल मीडियावरही निषेध होतो आणि दुसरीकडे महिलांवर लिहिल्या गेलेल्या बिभत्स आणि अश्लील गाण्यांना आणि संवादांना सुपरहिट होतांना बघतो...
अशा गीतांमधून आपण आपल्या माता भगिनींचा अपमान करत नाही का ?
अशा वेळेला वाटते की जगात माता भगिनींसोबत आपलं असणार भावाचं,मुलाचं ,वडिलांचं,काकांचं, पुतण्यांचं, भाच्यांच किंवा इतर कुठलही नातं महत्वाचं आहेच जे आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा अधिक वेगळं आणि सुसंस्कृत करतं, की मग जगात फक्त दोनच जाती स्त्री आणि पुरुष बस एवढंच...
कारण स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू अशी अमानवीय व असंस्कृत मांडणी करणाऱ्या प्रवृत्ती देखील जगात आहेत.
महिला सक्षमीकरणाच्या गप्पा करत असताना महिलांच्या विनयाची, त्यांच्या सन्मानाची काळजी आपण खरच घेतो का ? हाही प्रश्न आहे, आणि आपण जर तशी काळजी घेत असू तर मग आपण अश्लील गाण्यांचा आणि संवादांचा, स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणाऱ्या प्रवृत्तींचा आणि कलाकृतीच्या नावाखाली मांडणी केलेल्या बाबींचा केव्हा निषेध करणार ?की फक्त निषेधच्या गप्पा करणार ?
स्त्रियांवर अत्याचार करणारा अपराधी आहेच परंतु आपण केव्हा बिभत्स,अश्लील गाणी, जाहिरातीं विरोधात बोलणार..? या माध्यमातून होणारा अपमान हा विनय भंग नाही का? आपल्या माता भगिनींची काळजी म्हणून त्यांना सातच्या आत घरात येण्याची सूचना आपण करतो आणि त्या सातच्या आत घरात नाही आल्या तर त्यांच्यावर दोषारोप करतो परंतु ज्यांच्यामुळे त्या संध्याकाळी सात नंतर सुरक्षित नाहीत त्यांना सातच्या आत घरात जाण्याची ताकीद केव्हा देणार..? सरकार त्यांचं काम योग्यरित्या करत असताना जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे.
थोडक्यात चांगुलपणाच्या आणि अत्याचार झालेल्या बद्दल आरोपयुक्त सहानुभूतीच्या गप्पा आता पुरे झाल्या. हा लेख वाचून झाल्यावर सर्च करा की चोली के पीछे क्या है आणि चुनरी के नीचे क्या है असे प्रश्न विचारणारे गाण्याच्या आतापर्यंत किती व्ह्यूज आणि लाईक्स झालेत ते.
आणि या गाण्यांना सुपरहिट कोणी केले ? विशेष म्हणजे स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणारेही अद्याप तरी ठोस भूमिका घेतांना दिसत नाहीत महिलांवर अत्याचार होण्यास पूरक बाबींचा,वातावरण निर्मितीचा बीमोड कसा करणार ? बिभत्स,अश्लील गाणी (आइटम सॉंग्स यात आइटम म्हणजे वस्तू कोणाला म्हटल आहे हे आपल्याला माहित असेलच) अशी बिभत्स,अश्लील गाणी सुपरहिट होत असतानाच जगाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या परमपूज्य साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म ' या प्रार्थना गीताचे व्ह्यूज आणि लाईक्स किती झाले तेही आवर्जून बघाच.
अशी बरीच गाणी आहेत...
No comments:
Post a Comment