माझ्या प्रिय नातवांनो तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद.
लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे त्या अनुषंगाने आजचे पत्र तुम्हासाठी लिहीत आहे.
मी या जगात नसताना तुम्ही पितृपक्षात आपल्या वाडवडील आणि पूर्वजांची आठवण ठेवून काही विधी करणार किंवा नाही करणार हे मला माहीत नाही कारण तुम्ही तुमच्या तार्किक बुद्धीने, विवेकी विचाराने आणि तुमच्यात असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधाराने काय करावे किंवा काय करू नये हे ठरवालच.
आपल्या वाडवडिलांच्या आणि पूर्वजांच्या आठवणींसाठी तुम्ही नातवंडे आणि वंशज म्हणून एकत्र येणार असाल आणि जुन्या आठवणींमधून आधीच्या पिढीत केलेल्या चांगल्या विचारांचा आणि कामांचा आदर्श घेणार असाल तर चांगलेच आहे कारण चांगले विचार तुमच्यासह समाजाला दिशादर्शक ठरतील.
याखेरीज किमान मलातरी तुमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या कर्मकांडांची अपेक्षा मुळीच नाही. आता राहिला मला मोक्ष किंवा शांती मिळण्याचा विषय तर त्याचा अनुभव मी माझ्या जिवंतपणीच काही चांगले मानवतावादी विचार आणि कार्याच्या माध्यमातून मिळवणार आहेच. माझी सदगती आणि मोक्षप्राप्ती वगैरे काही असल्यास ते माझ्या सत्कर्मातूनच घडणार असल्यामुळे माझ्या मोक्षाची आणि सद्गती ची जबाबदारी देखील पूर्णतः माझी आहे माझ्या येणाऱ्या पिढ्यांची नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी काही वेगळे कर्मकांड करण्याची मुळीच गरज नाही.माझ्या चांगल्या विचारांवर भविष्यात काम करता आले तर तेवढे करा आणि तेही करणार नसाल तरीही माझी काही हरकत नाही. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझ्या श्राद्धासाठी उठाठेव केल्यास मला काहीही मिळणार नाही तुम्हाला मात्र भजेवडे मिळतील त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा.माझ्या आठवणीत तुम्ही सर्व हेवेदावे भेदभाव विसरून एकत्र येत असाल आणि समता,बंधुता आणि स्वातंत्र्याची पाठीराखाण करत असाल तर चांगलेच आहे.
तुमच्यासाठी लिहिलेलं हे पत्र कागदावर आहेच पण नॅनो टेक्नॉलॉजीच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधुनिक युगात आपण आहोत तुमच्या जन्म दात्यांचा बाप अर्थात तुमच्या बापाचा बाप असल्यामुळे मी ही टेक्नोसॅव्ही आहेच म्हणून तुमच्यासाठी हे पत्र डिजिटल स्वरूपात माझ्या ब्लॉगवरही आहेच.
तुम्ही वापरत असलेल्या विविध गॅझेटसह स्वतःला अपग्रेड करत राहणारच आहात कारण आपल्याला हे जग जसं मिळालंय त्यापेक्षाही अधिक सुंदर करून जगण्याच्या रिले रेस मधून एक्झिट व्हायच आहे.
तुमचा आजोबा
शैलेश शिरसाठ.
खालीलपैकी कुठला मार्ग स्वीकारावा हे ज्याने त्याने आपल्या तर्कानुसार,विवेकानुसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या समाजानुसार किंवा नासमजानुसार स्वीकारावे.
भगवान गौतम बुद्ध👇
सर, आपण म्हणताय ते अगदी खरं आहे. मनुष्य त्याच्या कर्मामुळेच सगळ्यांच्या समरणात राहतो. आंबेडकर, फुले यांचे स्वतः चे अपत्य नव्हते परंतु ते त्यांच्या समाज कार्यामुळेच अजरामर आहेत. नाहीतर फक्त पितृपक्षात आठवण ठेवण्यापुरते तर अनेक येतात आणि अनेक जातात.
ReplyDelete