जगाला प्रांतीयवादाचे आणि कट्टरवादाचे डोहाळे लागले आहेत का ? असा प्रश्न हल्ली निर्माण होतो,अशा प्रकारचे डोहाळे हे विध्वंसाला जन्म देणारे होऊ शकतात.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या आगी आणि वनवे हे केवळ भौतिकच नाही तर द्वेष, इर्षेचेदेखील आहेत. साम्राज्यवादाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक राष्ट्राला क्रमांक एक ची महासत्ता व्हायचे आहे..
जगाला भगवान गौतम बुद्धांच्या विश्वशांतीच्या मानवतावादी करुणामयी विचारांची नितांत आवश्यकता आहे. बुद्धांचा विचार जगाला विध्वंसापासून वाचवू शकेल.कारण जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.
प्रिय नातवांनो मी हे पत्र लिहायची सुरुवात 2024 वर्षाच्या शेवटी करत असलो तरी हे पत्र 2025 च्या सुरुवाती लिहून पूर्ण झाले आहे.
आपल्या देशातील बांधव जेव्हा इतर देशात जातात आणि आपले सण उत्सव तेथे साजरे केल्याचे फोटो, व्हिडिओ पाठवतात त्यावेळेला आपल्याला खूप अभिमान वाटतो. परंतु असंच जर इतर देशातील लोकांनी आपल्या देशात येऊन त्यांचे सण उत्सव साजरे केले तर आपल्याला ते आपल्यावरील आक्रमण वाटतं एवढंच काय पण परकीय लोकांनी आपल्या देशात येऊन जरी त्यांचे सण साजरे केले नाही आणि आपल्याच देशातील लोकांनी इतर देशातील सण साजरे केले तरीदेखील आपल्याला ते आक्रमणाच वाटते. अर्थात हे सर्वांना वाटते असं नाही परंतु असं वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांची संख्या आपल्या देशाबरोबरच जगातील प्रत्येक देशात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश देशातील आक्रमक सांस्कृतिकवाद, प्रांतीयवाद आणि अस्मितेच्या नावाखाली स्वतःच्या संस्कृतीला सर्वोच्च संस्कृती म्हणून इतरांबद्दल द्वेषाची भावना जगातील बहुसंख्य लोकांना वाटू लागली आहे आणि म्हणूनच त्या त्या देशांमध्ये तशा आक्रमक राष्ट्रवादाची पेरणी देखील होत आहे. जे देश अशी भूमिका घेत नाही त्यांच्यावर देखील आता आक्रमकतेचा प्रभाव पडण्याची भीती वाटत आहे.
जगाने आपली संस्कृती स्वीकारावी किंबहुना त्याचा आदर बाळगावा असं वाटत असताना आपणही इतरांच्या संस्कृतीचा आदर बाळगलाच पाहिजे.
आपण आजही जगात कुठल्याही विचारमंचावर गेल्यावर अभिमानाने हे सांगतो की आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो आहे. आपण आपली ओळख अशी देत असल्यामुळे आपल्याबद्दल अधिक आश्वासकता जगाला वाटतं कारण बुद्धांचा विचार म्हणजे विवेकी विचार जो मानवतावादाच्या करुणामय नजरेतून जगाला विश्वबंधुत्व सांगतो.
तुम्ही हे पत्र वाचत असताना संपूर्ण जगभरात काय परिस्थिती आहे हे आत्ताच नक्की सांगता येणार नाही परंतु विश्वाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हे मात्र तेवढेच खर.
Let's hope for a world without borders and wars.
No comments:
Post a Comment