बोधकथा
बोधकथा (टीप- बोध घेतल्यास बोधकथा अन्यथा अहिराणी बोलीभाषेनुसार... बोध कथा? 🤔)
नेहमीप्रमाणेच एक आटपाट नगर होते. ते नगर अनेक वर्षापासून सुरक्षित होते कारण त्या राज्याची परंपरा होती तिथे चारही दिशांना चार वेगवेगळे सेनापती अनेक वर्षापासून नियुक्त होत असत. राज्याच्या राजाला राज्यकारभारावर देखरेख ठेवणे इतर राज्यात अभ्यास दौऱ्यावर जाणे वगैरे काम परंपरेने होते. परंतु राजाने उत्तर दिशेतील सेनापतीला राजाने स्वतः करावयाच्या कामासाठी नियुक्त केले. उत्तर दिशेतील सेनापती आता राज्याच्या उत्तर दिशेची सीमेचे संरक्षण करण्याऐवजी राजाने करावयाचे सर्व कामे करू लागला तो अत्यंत चोखपणे काम करणारा प्रामाणिक कारकून बनला.
मंत्रिमंडळाला आणि इतर दिशांसाठी नियुक्त सेनापतींना मात्र या गोष्टीने अधिक काळजी वाटू लागली कारण राज्याची उत्तर बाजू आता कमकुवत पडणार होती. हीच बाब राज्यातील नागरिकांना सतावु लागली आपल्या मुलांचे भविष्य आता राज्यात सुरक्षित नाही असं म्हणून ते इतर राज्यात स्थलांतरणाचा विचार करू लागली.
त्याचप्रमाणे शत्रू राष्ट्राला देखील ही गोष्ट कळू लागली होती की राज्याची उत्तर बाजू कमकुवत झाल्यामुळे उत्तरेकडून हल्ला करता येऊ शकतो.
लेखक म्हणून या कथेचा शेवट मला करता येऊ शकतो, परंतु ती जबाबदारी मी जाणीवपूर्वक वाचकांवर आणि बोधकथा ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोडली आहे.✍️
शैलेश शिरसाठ,जळगाव.
No comments:
Post a Comment