Friday, 1 August 2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

 आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदनाताई पाटील होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. विश्वास पाटील यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ व श्री. विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोककलात्मक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणा दिली. विशेषतः त्यांनी लोककथांद्वारे समाज परिवर्तनाची वाटचाल कशी घडवली, हे उदाहरणासहित विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका सौ. छायाताई घुगे यांनी आभार प्रदर्शन केले.




 वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.🌿🌳🌾 🎋

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेरी येथे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळा व परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे व शोभिवंत झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमास गावाच्या सरपंच सौ. सुवर्णाताई कैलास बोरसे पाटील, कैलास भाऊ बोरसे, ग्रामसेविका सौ. विद्याताई पाटील, शिपाई श्री. मधुभाऊ उपस्थित होते. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदनाताई पाटील, शिक्षक श्री. विश्वास पाटील, श्री. शैलेश शिरसाठ व श्रीमती. छायाताई घुगे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण व वृक्षांचे महत्त्व यावरील मार्गदर्शनाने झाली. झाडे ही प्रदूषण नियंत्रण, पावसाचे प्रमाण वाढवणे, मातीची धूप थांबवणे आणि प्राणवायू निर्माण करणे या दृष्टीने फार महत्त्वाची असल्याचे विद्यार्थ्यांना समजावण्यात आले.

🌿🌳🌾 🎋

या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाची जबाबदारी घेतली. झाड लावणे, त्यास पाणी देणे, खत टाकणे आणि झाड वाढीस मदत करणे यासाठी विद्यार्थी पुढे सरसावले. ‘माझे झाड – माझी जबाबदारी’ हे ब्रीद विद्यार्थ्यांनी आत्मसात केले.

शाळेच्या परिसरात लावलेली झाडे परिसरास हिरवेगार ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सौ. सुवर्णाताई कैलास बोरसे (पाटील) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या. कैलासभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हा वृक्षारोपण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला. गावकऱ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची तयारी यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.