Saturday, 10 October 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पाळधी खुर्द येथे विद्यार्थिनींच्या ‘स्वचरित कविता’ पुस्तकाचे प्रकाशन.

 

दोन दिवसीय काव्यलेखन कार्यशाळेतून विद्यार्थिनींच्या प्रतिभेला मिळाली नवी झळाळी; डायटचे विषय सहायक शैलेश शिरसाठ तसेच केंद्रप्रमुख प्रदीप जाधव यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

*पाळधी खुर्द, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा, पाळधी खुर्द येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी लिहिलेल्या *‘स्वचरित कविता’* या कविता संग्रहाचे प्रकाशन उत्साहात करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), जळगाव येथील विषय सहायक शैलेश शिरसाठ सर आणि केंद्रप्रमुख प्रदीप जाधव सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

विद्यार्थिनींमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि साहित्यिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळेत गेल्या दोन दिवसांपासून काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ज्योती लीलाधर राणे आणि ज्योती उत्तमराव वाघ या शिक्षकांनी विद्यार्थिनींना कविता लेखनाचे तंत्र, विषय निवड, शब्दांची योग्य मांडणी, भावनांची अभिव्यक्ती आणि कवितेची रचना यासंदर्भात मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पना आणि अनुभवांना कवितेच्या माध्यमातून शब्दरूप दिले. त्यातून साकारलेल्या कवितांचे संकलन म्हणजे ‘स्वचरित कविता’ हा पुस्तक उपक्रम होय. या स्वरचित बालकाव्यसंग्रहाला "आनंदाची अक्षरगंगा" असे नाव देण्यात आले.

मराठी भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना आपल्या भावना आणि विचार साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करता यावेत तसेच वाचन व लेखनाची आवड विकसित व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थिनींनी स्वतः कविता लिहून पुस्तकाच्या स्वरूपात त्या प्रकाशित करण्याचा अनुभव घेतल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आणि साहित्यनिर्मितीची प्रेरणा वाढण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अरुण असोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. त्यामध्ये पदवीधर शिक्षिका ज्योती उत्तमराव वाघ, श्रीमती गीता बाळकृष्ण काळे, सौ. कांचन प्रशांत सोनवणे, श्रीमती ज्योती लीलाधर राणे, सौ. वंदना संजय चौधरी, श्रीमती अनिता उघडू गढरी, श्री. सुभाष गरबड पारधी, श्रीमती योगिता शिवाजी बागुल, श्रीमती वैशाली रमेश जाधव आणि श्री. सत्यवान भागवत जाधव यांचा समावेश आहे.

अभिजात मराठी भाषेचा गौरव जपत विद्यार्थिनींच्या लेखनकौशल्याला संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. विद्यार्थिनींच्या लेखणीतून उमललेल्या या कवितांमुळे मराठी भाषेप्रती प्रेम, अभिमान आणि सर्जनशीलतेची भावना अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.



No comments:

Post a Comment