Saturday, 17 April 2021

LFH अर्थात Learning From HomeHomonym & Homophones

 Z.P.Upper Primary School Sheri 'Presents. 😇👇🏻

LFH अर्थात Learning From Home

सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना Homonym (हाॅमनिम) म्हणतात.तर स्पेलिंग वेगवेगळे पण उच्चारण सारखे असणाऱ्या शब्दांना '


Homophones होमोफोंन्स' म्हणतात.

चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.

✍️ शैलेश सर.

1) Right - राइट- योग्य,बरोबर 

2) Right - राइट -  उजवी बाजू

3) Right - राइट - हक्क ,अधिकार

 4) Write - राइट - लिही, लिहिणे 

👉 The man sitting in the *right* is *right* because he *writes* about his *rights.*

*उजवीकडे* बसलेला माणूस *बरोबर/योग्य* आहे कारण तो आपल्या *हक्कांबद्दल* *लिहितो.*

_______________________________________

1)Add - ऍड *जोडणे मिळविणे भर घालणे*

2) Ad  - ऍड- *जाहिरात*

3) Aid - ऍड ऐड- *सहायता मदत साधन.*

4) Ad -ऍड- *इसवी सन* (इतिहासातील कलखंडांचा उल्लेख करतांना ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या तारखांपूर्वी वापरले जाते ) उदा. *AD 1857 म्हणजेच इसवी सन १८५७*

या ठिकाणी AD म्हणजे Anno Domini अँनो डोमिनाय Uk  अँनो डॉमिनी US

👉 *In Ad 1970 Ad helped them to add better selling results it was  best aid by Ad.Shirsath*

*इसवी सन १९७० मध्ये जाहिरातीने त्यांना चांगले विक्री परिणाम जोडण्यास मदत केली ती अ‍ॅड.शिरसाठ यांनी केलेली सर्वोत्तम मदत होती.*

_______________________________________

1) Ail  - इल/ ऐल - *आजारी*

2) Ale - इल/ ऐल - *एक बिअरचा प्रकार ₹* (फळाची गुळचट चव असणारा बियर या पेयाचा एक प्रकार)

👉 He was ill so he avoided to drink ale.

तो आजारी होता म्हणून त्याने बिअर पिणे टाळले.

*Stay Home Stay Safe.*🏡 *घरी रहा सुरक्षित रहा.*

..To be continued.. Learning from home

 क्रमशः  लर्निंग फ्रॉम होम.✍️

shaileshshirsath.blogspot.com

Friday, 16 April 2021

Let's Enjoy Idioms and Proverbs- Learn From Home


 Let's Enjoy Idioms and Proverbs.👇🏻

*To be under a person's thumb =* to be unduly under a person's control- *एखाद्याच्या वर्चस्वाखाली असणे.*
All the team members are under the thumb of .संघातील सर्व सदस्य सावधगिरी आहेत.
______________________________________________To spread like wild fire -* to circulate with astonishing speed. *बातमी वा-यासारखे पसरणे.वनव्यासारखी पसरणे.*
The news of pendamic was spread like wild fire.👉साथीच्या आजाराची बातमी वनव्या सारखी पसरली होती./साथीच्या आजाराची बातमी जंगलातील आगीसारखी पसरली होती.
*Astonishing -* *आश्चर्यकारक,धक्कादायक.*
The fact is *astonishing.*
वस्तुस्थिती *धक्कादायक* आहे.
shaileshshirsath.blogspot.com

Homonyms- Learning From Home


 *We Smart- Speak Smart* 'Presents. 

*LFH* अर्थात *Learning From Home*

सारखे उच्चार असलेले किंवा उच्चारणात अगदी बारीकसा फरक असणारे भिन्न शब्द असतात, पण त्यांचे अर्थ मात्र सारखे नसतात अशा शब्दांना *Homonym (हाॅमनिम)* म्हणतात. चला तर मग आजच्या लर्निंग फ्रॉम होमाच्या भागात उदाहरणांसह जाणून घेऊयात काही शब्द.

*Except-एक्स्पेक्ट- शिवाय, व्यतिरिक्त, वगळता, अपवाद,* उदाहरणार्थ. No one is ready except Tope Sir. टोपेसरांखेरीज कोणीही तयार नाही.

*Expect-एक्सेप्ट- अपेक्षा करणे* उदाहरणार्थ  we  expect the decision.आम्ही निर्णयाची अपेक्षा करतो.

*Accept-अॅक्सेप्ट- स्वीकार करणे, मान्य करणे* Group head please accept the decision.गट प्रमुख कृपया निर्णय स्वीकारा.  ___________________________________________________                                                                              संवादाच्या माध्यमातून हे आणखी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात..

विजय सर: शैलेश सर शेवटी काल संध्याकाळी एकदाचा निर्णय झाला.

शैलेश सर:  विजय दादा आपण हे expect ( एक्स्पेक्ट) करत होतो पण Except (एक्सेप्ट) Some people काहींना ते Accept अॅक्सेप्टच नव्हतं.

To be continued   Learning from home

 क्रमशः  लर्निंग फ्रॉम होम.✍️

shaileshshirsath.blogspot.com

Thursday, 15 April 2021

शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.


 शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) आणि काही प्रश्न.

 विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संगीत,क्रीडा,सृजनशीलता, नेतृत्व,वक्तृत्व,चित्रकला यासह इतर क्षेत्रातील सर्वांगिन गुण आणि कौशल्यावर शिष्यवृत्ती परीक्षा आहे काय? तर याच उत्तर नाही असं आहे.(२१  व्या शतकात तरी स्कॉलर शब्दाची व्याप्ती खुप मोठी असलीच पाहिजे..)

या  प्रक्रियेतून जो केवळ अभ्यासात हुशार त्यालाच स्कॉलरशिप मिळणार.

 स्कॉलरशिप  परीक्षेत आपण सर्व विद्यार्थ्यांना पास करणार आहोत का? याचंही उत्तर नाही असआहे. परीक्षेचा निकाल पात्र किंवा अपात्र असा येणार.. याचा दुसरा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना आपण पास करत आहोत ( इयत्ता पहिली ते आठवी) त्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप परीक्षा अपात्र ठरवणार. विद्यार्थ्यांच्या बालमनाचा विचार करूनच विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीच्या वर्गात पास करण्याचा निर्णय घेतला आहे कारण विद्यार्थी नापास झाल्यावर त्याच्यात न्यूनगंड वाढीस लागून विद्यार्थी एकंदरीतच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा विचार करता आपण मूल्यमापनात विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमांकही काढत नाही कारण विद्यार्थ्यांमध्ये मी पहिला दुसरा तिसरा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. मग स्कॉलरशिप परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या  मनावर काय परिणाम होईल याचा विचार केला जात नाही.  म्हणजेच कॉलरशिप परीक्षा ही मूल्यमापनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या तत्वाशी पूर्णतः विसंगत आहे.हे सारं मुल्यमापनातील विसंगती स्पष्ट करण्यास पुरेस आहे. 

शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात ?

शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धापरीक्षा असू शकतात परंतु शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा नसाव्यात किंबहुना सक्तीच्या तरी नसाव्यात कुठल्याही प्रकारची अवास्तव स्पर्धा न करता आनंददायी पद्धतीने सहज शिक्षण असावे.

मुळातच शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्याच्या अंगी असलेले सर्वांगीण गुण शोधण्यासाठीची व्यवस्था आहे, त्यांच्यात केवळ बौद्धिक स्मरणशक्तीच्या आधारे पात्र अपात्र करण्याची व्यवस्था नसावी किंबहुना ती तशी नाहीच.आकारिक मूल्यमापनाच्या दैनंदिनी निरीक्षकांसह इतर क्षेत्रांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विचार मांडला गेला आहे.परंतु या प्रकारच्या परीक्षा या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांची वर्गवारी करीत आहेत दुर्दैवानं त्यात स्मरणशक्तीचा विचार अधिक केला जातो.

 विद्यार्थ्यांना आपल्याला थोडं शिकवायच आहे आणि त्यांच्यात लपलेल्या गुणांना अधिक वाव देऊन  शिक्षका पेक्षाही सुलभकाचे काम करायचे आहेे. शिक्षण घेतांंना विद्यार्थ्यांनी ते सहज आणि आनंददायी पद्धतीने घेणे अपेक्षित आहे स्पर्धा म्हटली की ताण तणाव येणारच किमान स्पर्धेचा ताण तणाव घेणे तरी ऐच्छिक असाव. शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया आहे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अर्थात स्पर्धा नाही, म्हणून शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षा असाव्यात की नसाव्यात, की त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्रित विचारांनी ऐच्छिक  असाव्यात याचा विचार करणेही आवश्यक आहे.

व्यवसायिक शिक्षण असावे शिक्षणाच्या स्पर्धेतून निर्माण होणारं शिक्षणाचे व्यवसायीकरण असू नये.

खरे म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मोफत किंवा अत्यंत माफक असल्या पाहिजे, शिक्षणातील स्पर्धांमुळे शिक्षणात व्यवसायीकरण झाले आहे. एवढ्या शिक्षणातील स्पर्धा असल्यावरही आज देशात आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये  देशात असल्यावरही गणपती आणि दिवाळीला आपण लाइटिंग चायनाचीच घेतोय, बाजारातील साध्या वीस ते पंचवीस रुपयाच्या पायतानापासून महागड्या वस्तू मोठ्या प्रमाणात आपण परदेशातून आयात करतोय आपल्या देशाच्या एकूण आर्थिक बाबतीत अनेक घटकांचा समावेश असला तरी शिक्षण हा महत्वाचा घटक त्याच्या मुळाशी आहे. 

कारण विकसित देशांमधील आर्थिक वृद्धी शैक्षणिक ध्येयधोरणांवर आधारित आहे आणि शैक्षणिक धोरणात कौशल्यास महत्त्व आहे, शिक्षणातील स्पर्धेस नाही, म्हणून आपण ज्या देशातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात करतोय त्या देशातील शालेय विद्यार्थी सुद्धा घरातील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कामे स्वतः करु शकतात. आपल्याकडे मात्र आपण दैनंदिन उपयोगात येणारे व्यवहारिक काम न करता किंवा करू देता केवळ परीक्षेसाठी उपयोगी असणारे मार्क्स वाढवून देणार या घटकांचा अभ्यास करतो.शिक्षणातील स्पर्धेतून वैद्यकीय प्रवेश - त्यानंतर व्यावसायिक स्पर्धा - आणि मग आता औषध उपचार मिळण्यासाठी रांगेत उभा राहून उपचार घेण्याची स्पर्धा... अशा दृष्टचक्रात आपण कसे अडकलो आहोत याचाही विचार करावा लागेल...✍️

- शैलेश शिरसाठ,जळगाव.(माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून) 

Wednesday, 14 April 2021

'JAI BHIM' A Success Password of Humanity and Social Justice म्हणून बाबा साहेब.

प्रिय नातवांनो,तुमच्या घरात बाबासाहेबांची तसबीर ? उत्तर तुमच्याकडेही असाव म्हणून हा पत्र प्रपंच...

'JAI BHIM' (Dr.Babasaheb Ambedkar ) A Success Password of Humanity and Social Justice.

 थोतांडाला, बुवाबाजीला आणि फसव्या चमत्काराला नमस्कार करताना कुठलाही विवेकी विचार आणि प्रश्न न करणारे जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात बाबासाहेबांची प्रतिमा का, कशी ? असा प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना आवर्जून सांगा 

महिला सक्षमीकरण आणि एकंदरीतच मानवतावादाच सक्षमीकरण म्हणजेच विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांना हेही सांगा की पुरुषांप्रमाणे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. कदाचित याचं तुम्हाला फार विशेष वाटणार नाही परंतु अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 123 वर्षं लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हा हक्क मिळायला 100 वर्षं वाट पाहावी लागली.स्वित्झर्लंडच्या काही भागात महिलांना मत देण्याचा अधिकार आपल्या नंतर खूप उशिरा 1974 साली मिळाला.सौदी अरेबियात महिलांना मतदानाचा अधिकार तेथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत 2015 ला मिळाला. याउलट भारतीय महिलांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यादिवशीच मतदानाचा अधिकार मिळाला.हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारासाठी आग्रही असणाऱ्या बाबासाहेबांनी समस्त महिलांच्या अधिकारासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता 

1950 मध्ये आपल्या भारताला स्वत:ची राज्यघटना मिळाली धार्मिक आणि जातीय भेदभाव तसेच स्त्री-पुरुष असा भेदभाव नाकारून आणि लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांना मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या तात्कालीन नेतृत्वांच्या प्रयत्नातून मिळाला.

स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित, वर्णव्यवस्थेवर आधारित किंवा जातीय आणि आणि धार्मिक भेदभाव न ठेवता सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार बहाल करून लोकशाहीचा विचार 1951 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच झाला होता याची त्यांना मुद्दाम आठवण करून द्या.

अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱ्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे.

 प्रिय नातवांनो हेही समजून घ्या आणि समजावून सांगा की वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद तार्किक विचार समतेचा अर्थ समजून घेणारी ग्रंथ आणि पुस्तके यांचे वाचन करा. समतावादी विचारवंतांचे साहित्य अवश्य वाचा. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारणाऱ्या काल्पनिक चमत्काराला नमस्कार करणाऱ्या कपोल कल्पित,भंपक काल्पनिक भाकडकथांचे वाचन करणार असाल तर मग आपलं प्रबोधन होणे कठीण आहे कारण असं चिकित्सेला, वैज्ञानिक दृष्टीकोनाला नाकारणारे साहित्य वाचन आपल्याला बौद्धिक गुलामगिरीकडे नेत असते.

नातवांनो ज्या लोकांना वाचायला, अभ्यास करायला खरा इतिहास समजून घ्यायला वेळच नाही अशा आपल्या बांधवांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि विशेषतः फुले,शाहू,आंबेडकर,राजाराम मोहन रॉय यांच्यासारख्या कर्त्या सुधारणावादी महामानवांचे विचार पोहोचवूया.

दुर्दैवाने भारतात असंख्य लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळालेच नाही तसे पाहिले तर जगात जिथे जिथे भेदभाव आहे, समतेचा अभाव आहे अशा ठिकाणी तिथल्या मानवी मूल्यांच्या लढ्यासाठी, न्याय हक्कासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अखंड प्रेरणास्त्रोत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेतृत्व करणारे महामानव आहेत,कारण त्यांनी वर्णव्यवस्थेतील सर्व जातींचा सर्व धर्मातील स्त्रियांचा तसेच ओबीसींचा सर्वप्रथम विचार केला मग स्वतःच्या जातीचा.असे असल्यावरही आज बहुजनांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी आहेत का ? याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. आता बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत तसबीरी घरात लावण्याची गरज काय? असा न पटणारा युक्तिवाद ही मंडळी करू शकतात कारण अशी माणसं जाती जातीत महापुरुषांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विभागणीच करतात आणि स्वतःच्या जातीशी संबंधित असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा मात्र आवर्जून घरात स्थापित करतात.आजही आपण कुणाच्याही घरात जाऊन तिथे असणार्‍या प्रतिमांवरून त्यांची जात ओळखू शकतो. याला काही ठिकाणी अपवादही असेल परंतु तेही अपवादानेच हे खेदाने नमूद करावसं वाटतं.

आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास ओबीसींसह सर्व समाज घटकांचे, सर्व महिलांचे ,एकंदरीतच मानवतेचे मसीहा म्हणजे विश्वरत्न,आधुनिक जगाचे खरे नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. खरं पाहता ओबीसींना बाबासाहेबांनी स्वतःच्या जाती आधी ओबीसींसाठीचे आरक्षण दिले. कळत नकळत काही समाज घटक स्वतःला मागासवर्गीय बांधवांपेक्षा वेगळे आणि उच्च समजण्याची चूक करतात.

देशातील सर्वच महामानवांना, समाज सुधारकांना जातीपातीत न विभागता जातीअंताचे मार्गदर्शक म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे,कारण हा लढा जातीपातींचा नसून मानवीय मूल्यांचा लढा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं.

महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे आणि त्यांच्या सामाजिक विचारांवर कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना कायद्याने सक्षमीकरणाच्या वाटा खुल्या करून दिलेल्या आहेत म्हणून भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने बाबासाहेब दैवत आहे,ते तर त्यांच्या गळ्यातील ज्ञानातंत्राचा ताईतच पाहिजे...✍️ पत्र प्रपंच क्रमशः 

या विषयावर मी खूप बोलत असतो लिहीत असतो पण आता या विषयावर दाखवण्यासाठी उत्कृष्ट अशी शॉर्ट फिल्म देखील मिळाली आहे. जी आज दिनांक 17 एप्रिल 2026 मी युट्युब वर बघितली. अतिशय सुंदर अशी निर्मिती आहे 👇Watch. Think. Share. Let’s start the conversation — Why not Babasaheb ? Thanks to Aaplisocialvaahini 🙏 व्हिडिओ आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. 🙏





Monday, 22 February 2021

कोरोना काळात शालेय शिक्षणातील आव्हाने आणि कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी..


 

*कोरोना काळात शालेय शिक्षणातील आव्हाने आणि  कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी.*
Covid-19 अर्थात कोरोनाविषाणूच्या
प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणेची  खूप मोठी परीक्षा आहे तसेच ही परीक्षा आहे पालकांची,कुटुंबव्यवस्थेची आणि पर्यायाने समाजाचीही...ते कसे ते खालील मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ.

★कोरोना काळात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढण्याची भीती.

★वंचितांच्या निवासी शाळांचा प्रश्न.

★मुलींच्या शिक्षणातील गळती आणि स्थगितीचा प्रश्न.

★बालगुन्हेगारीसह अपप्रवृत्तीत वाढ होण्याची भीती.

★विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षणातील संपादणूक पातळीत घट. Learning loss

देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत आणि विशेषतः औपचारिक शिक्षणातील महत्त्वाची जबाबदारी शाळांवर असते.सध्या कोविड महामारी मुळे शाळा बंद आहेत.
Learning Loss with connecting loss ~ शाळा बंद तरी शिक्षण सुरू शिक्षण सुरू राहण्यासाठी  अधिकाधिक रंजक आणि तेवढं दर्जेदारपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण शालेय व्यवस्था सातत्याने प्रयत्न करत आहे परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि त्यातील घटक शिकवणे एवढ्यापुरता मर्यादित नसतो. विद्यार्थी हा शिक्षणासाठी शाळेत येत असताना समवयस्क मित्रांसोबत शाळेत खेळणे आपला टिफिन शेअर करणे आपल्या मनातील गोष्टी एकमेकांशी शेअर करणे साऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अनौपचारिक बाबीही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात  शाळा बंद असल्याने हे सारं थांबलं...
ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था असणारे आणि तशी सुविधा नसणारे पूर्णपणे वंचित असणारे अश्या दोन गटात विद्यार्थी अधिच विभागले गेलेले आहेत.
शाळा बंद असल्यामुळे दैनंदिन वेळापत्रकही कोलमडलं.. वेळापत्रकाचा सर्वात महत्त्वाचा भाग वेळेचे नियोजन आणि शिस्त. हसत खेळत शिक्षणासोबत शिस्त आणि नियोजनाचे धडे आपसूकच त्यांना शाळेत मिळत होते. शाळा आणि शिक्षक करत असलेली ही जबाबदारी पालक कितपत पेलू शकतात ? किंबहुना पालकांना ती पेलावी लागेल. मुल शाळेत आल्यानंतर शिक्षकांची केवळ सुलभकाची भूमिका नसून पालकांची देखील भूमिका असते त्यांची देखभाल, त्यांच्य भावविश्व समजून घेणे इत्यादी विद्यार्थी केंद्रित बाबी शिक्षण यंत्रणा शालेय शिक्षणात आजच्या काळात राबवत आहे.आता ही जबाबदारी शिक्षकांसह  कुटुंबव्यवस्थेची ,पालकांची देखील आहे.
.. *शिक्षकांमध्ये असलेल्या पालकांच्या भूमिकेप्रमाणे पालकात असलेल्या शिक्षकाची भूमिका कोरोना महामारी काळात अत्यंत महत्त्वाची आहे.*
त्यासाठी पालक, कुटुंब व्यवस्था एक जबाबदार घटक म्हणून काय करू शकते ते खलील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ.
◆आपल्या पाल्यासोबत क्वालिटी टाइम घालवणे.
आपल्या व्यवसाय नोकरी नंतर घरी आल्यावर काही  वेळ मुलासोबत खेळण्यासाठी देणं..
◆आपल्या पाल्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे फार आवश्यक आहे.
◆ किमान एक वेळ जेवण सर्व कुटुंबियांनी सोबत घेणे.
◆ रविवारी मुलांसोबत विविध प्रकारचे खेळ खेळणे (उदाहरणार्थ भाषिक खेळ).
*Let's have a fun Play Let's Enjoy Home Play*
★घरातील कामांसाठी आनंददायी पद्धतीने पाल्यांना सहभागी करून घेणे. 

★घरात फावल्या वेळात आई,आजी, आजोबा यांना मदत करणे. कामाचे वेळापत्रक तयार करणे.
★परिवारातील सदस्य व नातेवाईक यांच्या सोबत घालवलेल्या विविध क्षणांचे वर्णन करणे, शक्य असल्यास प्रवासवर्णन कथाकथन किंवा लेखन करणे  इत्यादी *Home-Play* अनौपचारिक पद्धतीने करता येऊ शकतात.
★पाल्यांच्या वयानुरूप (इयत्तेनुसार) किमान अध्ययन क्षमतांची यादी तयार करणे त्या कामी शाळेतील शिक्षकांची मदत घेणे.
★कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने किमान अध्ययन क्षमता कार्यक्रम कुटुंब स्तरावर आनंददायी पद्धतीने राबवणे.
★ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी उपलब्ध असलेल्या सर्व साहित्य जसे टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट मोबाइल यांचा उपयोग करता येऊ शकतो.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक अनुभव देण्याची तयारी शासनस्तरावर असते त्यासाठी शिक्षकांची प्रशिक्षणे होतात. विद्यार्थी हा जास्तीत जास्त वेळ घरी  राहतो त्यादृष्टीने 'पालकत्व' फार महत्वाची जबाबदारी आहे. पालकांनीही प्रशिक्षित होणे आणि कुटुंब व्यवस्था अधिकाधिक बळकट करून  शिक्षणात शालेय व्यवस्थेला मदत करणे गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक जबाबदार नागरिक घडवण्यासाठी पालकासह विविध समाज घटकांनी शिक्षण व्यवस्थेला, शिक्षकांना मदत करणं काळाची गरजे आहे.यात शिक्षक आणि पालकांप्रमाणे सुलभकाच्या भूमिकेत घरातील ताई,दादा ,गल्लीतील अभ्यास मित्र,वर्ग मित्र यांचाही सहभाग आवश्यक आहेच.

कोरोना काळात परीक्षा रद्द झाल्यामुळे खूप मोठ्ठं  नुकसान झालंय म्हणून काही पालक चिंतेत आहेत. " खूपच अभ्यास करून पुस्तकाच्या पुस्तक अक्षरश: पाठ केली होती हो " अशी हि व्यथा काही पालकांनी बोलून दाखवली. विशेषत: आज कोरोनाच्या  भीषण महामारी मध्ये गरज पडल्यास आपल्या प्रत्येकाला किंबहुना महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजेक्शन किंवा सलाईन लावता येते का ? कोरोना महामारीच्या काळात घरात कोणी आजारी पडल्यावर स्वयंपाक बनवणे किंवा घरातील इतर कामे करता येतात का? बरं या सगळ्याच शिक्षण सरकारच देणार का ? खरं म्हणजे शिक्षण कोणी देईल याची वाट न पाहता आपण शिक्षण घेतले पाहिजे, कुटुंब आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. कोरोना महामारी स्वतः एक परीक्षा म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळे आणखी वेगळ्या परीक्षेची सध्यातरी गरज नाही. 'कोरोना' या परीक्षेच्या काळात आपण शिकलो नाही तर मग येणारा काळ अधिक कठीण होणार आहे हे  सांगायला ज्योतिषाची गरज नाही..✍️

शैलेश किसन शिरसाठ.
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेरी, ता. धरणगाव,जि. जळगाव.

Tuesday, 12 January 2021

मूल्यवर्धन आणि समाज माध्यमांच्या भूमिका

वाढती व्यसनाधीनता आणि‌ समाज घटक, समाज माध्यमांच्या भूमिका.
गेल्या दशकभरात व्यसनाधीनता वाढण्यासोबतच व्यसनाधीन होण्याचा वयोगट हा कमी होत जात आहे. कुमारवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण सध्या वाढत आहे. वेब सिरीज, चित्रपटांसह मोबाईल,टीव्ही यासारख्या माध्यमातून तसेच इतरही समाज माध्यमातून व्यसनांचे उदात्तीकरण होतांना दिसत आहे याखेरीज लाइफस्टाइलचा एक भाग म्हणून एक social acceptance मिळू लागला आहे.

भारतीयांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास चित्रपटांचा, वेब सिरीजचा खूप मोठा प्रभाव सर्वांवर असतो विशेषतः तरुणाईवर त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो. तरुणांना आदर्श वाटणारे कलावंत जर तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करत असतील तर त्याचा परिणाम व्यसनांच्या उदात्तीकरणाचा होण्याचा धोका वाढतो. वेब सिरीज मध्ये,चित्रपटांमध्ये त्यातील नायक दाखवलेले पात्रसर्रासपणे व्यसन करताना दाखवला जातो पूर्वीच्या चित्रपटांमध्येही तसं दाखवलं जात होतं पण त्या वेळेला चित्रपटातला खलनायक व्यसन करताना दाखवला जात होता.
कथानकाचा भाग म्हणून आणि खूप मोठ अर्थकारण त्यामागे दडलं असल्यामुळे असं जरी दाखवलं जात असलं तरी त्याचा अतिशय नकारात्मक परिणाम विविध समाज घटकांवर होत असतो म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Social drinking सोशल ड्रिंकिंग.
एखाद्या सामाजिक कार्यक्रमात गेट-टुगेदर पार्टीमध्ये किंवा सणाच्या निमित्ताने वर्षभरात क्वचितच केले जाणारे मॉडरेड ड्रिंकिंग म्हणजे मर्यादित स्वरूपात केले जाणारे मद्यपान या प्रकारात येते. साधारणपणे हे कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा सहकाऱ्यांसोबत सामूहिक स्वरूपात घेतले जाते आणि तशा प्रकारचे पार्टी करणं हा एक प्रकारे स्टेटस सिम्बल समजल जात आणि अलिशान लाइफस्टाईलचा भाग समजला जातो.
अशा प्रकारच्या सोशल ड्रिंकिंग हे लोकांशी संवाद वाढवणे, ओळखी वाढवणे, विशिष्ट प्रसंग, कार्यक्रम समुदायांमध्ये अधिक आरामदायी आणि आनंददायी पद्धतीने वेळ घालवण्यासाठी केलं तर काय बिघडलं ? समर्थन करत असताना लोक दिसतात. 
सततच्या वाढत चाललेल्या ताण-तणावामुळे आणि मानसिक आरोग्य बिघडत असल्यामुळे रिलॅक्सेशनसाठी मोठ्या प्रमाणात विकेंड सेलिब्रेशन अर्थात वीकेंड पार्ट्या होत असतात अशा पार्ट्यांमध्ये होणारे सोशल ड्रिंकिंग हे व्यसनाधीनतेकडे वळण्याचा खूप मोठा धोका असतो. 
व्यसनाधीनता हा denial म्हणजे नाकारण्याचा एक आजारच म्हणावा लागेल. सोशल ड्रिंकिंग करून व्यसनाधीनतेकडे जाणारी व्यक्ती शक्यतोवर हे मान्य करतच नाही की ते व्यसनाधीन होत आहे.
व्यसनात अडकणाऱ्या वयात येणाऱ्या मुलांची व्यसनाधीनतेची सुरुवात साधारणत विडी सिगरेट, गुटखासारख्या यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून होते त्याला गेटवे ड्रग्स असेही म्हटले जाते. यातूनच कुमारवयीन मुलांचा प्रवास हा चहाच्या छोट्या हॉटेल पासून कॅफे सेंटर, पब आणि बियर बार कडे जाण्याचा धोका असतो. 
 संवादाचा अभाव हे देखील व्यसनाधीनतेचे एक महत्त्वाचे कारण आहे अर्थात ते सर्वच वयोगटाला लागू होते परंतु वयात येणाऱ्या मुलांच्या दृष्टीने ते अधिक महत्त्वाचे आहे. सुजान पालकत्वाच्या दृष्टीने संवाद हा विसंवाद न होता सुसंवाद असला पाहिजे.
मोबाईलचे व्यसन
 धूम्रपान,मद्यपान या व्यसना खेरीज आणखी एक व्यसन आपल्याला सध्या दिसून येतं आणि ते व्यसन म्हणजे वर्तनाच व्यसन ज्यात जास्तीत जास्त वेळ हा टीव्ही मोबाईलच्या स्क्रीनवर घालवण्याचे वर्तन किंवा सवय.
पूर्वी लहान बाळ खात नसेल तर त्याला चिऊ काऊ ची गोष्ट सांगून घास भरवले जात होते परंतु हल्ली पालकच मोबाईलची स्क्रीन लहान बाळांसमोर धरून त्यांना खाण्यासाठी विनवण्या करत असताना बघायला मिळते. आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मोबाईल वापरावा लागत असला तरी आपल्याला आता मोबाईलचा वापर,गैरवापर आणि व्यसन असे वर्गीकरण करावे लागणार आहे, आणि मग हेही ठरवता येईल की कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा. असं करू शकलो तरच आपला क्वालिटी टाईम आपल्या फॅमिलीसाठी वेळेचे नियोजन करू शकतो.
खरं तर प्रत्येकच वेळी कुठल्याही परिपत्रकाची वाट न बघता शाळा महाविद्यालयांमध्ये याबाबतीत विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न शिक्षणातील सर्वच घटक करत असतात,पण समाजाच्या सर्वच घटकांनी,माध्यमांनी याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

मोबाईलचे व्यसन हे मुलांसह सर्वच वयोगटासाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पालक आणि समाजाने काही प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. 

 १. पालकांनी करावयाचे उपाय:
 • वेळेचे व्यवस्थापन करूया : 
 मुलांच्या मोबाइल वापरासाठी वेळेची मर्यादा ठरवूया (उदा. दररोज 1 तास). अभ्यास, खेळ, झोप आणि इतर क्रियाकलापांसाठी वेळ निश्चित करूया.

 •पर्याय उपलब्ध करून देऊया : 
 मुलांना शारीरिक खेळांमध्ये खेळण्यात प्रोत्साहित करूया जसे की क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग. वाचन, चित्रकला, संगीत, नृत्य यांसारख्या सृजनशील गोष्टींसाठी प्रोत्साहन देऊया.

 •संवाद वाढवूया: 
मुलांशी नियमित संवाद साधा आणि त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेऊया. त्यांचे विचार ऐका आणि त्यांना सकारात्मक मार्गदर्शन देऊया. 
• स्वतःचा आदर्श ठेवूया:
 पालकांनी स्वतः मोबाइलचा योग्य वापर करून मुलांसमोर चांगला आदर्श ठेवावा. कुटुंबीयांसोबत जेवणाच्या वेळी मोबाइलचा वापर टाळा.
 • तांत्रिक उपाय: मोबाइलमध्ये पॅरेंटल कंट्रोल आणि ऍप्सच्या वापरावर मर्यादा ठेवणारे तंत्रज्ञान वापरा. मुलांनी कोणत्या प्रकारच्या ऍप्स आणि वेबसाइट्स वापराव्यात, यावर देखरेख ठेवा. 

 २. समाज घटकांनी करायचे उपाय

 •जनजागृती मोहिमा: 
 शाळा, ग्रामसभा, आणि सामाजिक गटांद्वारे मोबाइलच्या दुष्परिणामांवर चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे. पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते.
 •मैदानी खेळांचे आयोजन: 
 शाळा आणि स्थानिक संस्थांनी मुलांसाठी मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास अधिक चांगला उपयोग होऊ शकतो. अशा उपक्रमांमध्ये मुलांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया. 
  • डिजिटल डिटॉक्स डे: 
महिन्यातून एक दिवस 'डिजिटल डिटॉक्स डे' म्हणून साजरा करूया, जिथे सर्वजण मोबाइलचा वापर टाळतील. 
 • तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक उपक्रम: 
 मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करूया, जसे की कोडिंग, सायबर सुरक्षितता इत्यादी. 
 • पालकांसाठी मार्गदर्शन: पालकांसाठी मोबाइल व्यसनावर उपाययोजनांवर आधारित मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याची आवश्यकता आहे.
 ३. शाळांचे योगदान
शाळांनी मोबाइलच्या दुष्परिणामांवर आधारित प्रबोधनात्मक नाटके, गाणी, आणि उपक्रम राबवता यईल. विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, खेळांचे साहित्य, आणि इतर सृजनशील उपक्रम उपलब्ध करून देता येईल.