Monday, 27 February 2023

'म'मराठीचा...

मराठी चित्रपटात कधीही नायक हा अहिराणी बोलीतील दाखवला नाही. भाषादेखील प्रमाण मराठी भाषाच वापरली किंवा पश्चिम महाराष्ट्रातील बोली, वऱ्हाडी भाषेतील नायक किंवा नायिका आपल्याला पाहायला मिळाले नाही.
मराठीच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना मात्र चित्रपट,नाटकांमधून पाहिजे तो न्याय मिळाला नाहीच. ग्रामीण बोलीभाषांना Vernacular Accent असे न हिणवता  खऱ्या अर्थान Vernacular Accent चा योग्य सन्मान केला गेला पाहिजे कारण प्रमाण भाषेला आदर्श ठेवून बोली भाषेच्या उच्चारांना आपण अशुद्ध कसं म्हणू शकतो ? मग बोली भाषेच्या दृष्टीने देखील शहरीकरण झालेल्या बोली भाषेतील शब्दही अशुद्ध असू शकतील. त्यामुळे प्रमाण भाषेने बोलीभाषेवर न्यूनगंड लादता कामा नये. असं श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व लादणं हे जात आणि वर्ण व्यवस्था लाागण्यासारखं तर नाही ना..? याचाही विचार व्हावा.
मराठी भाषेला अभिजात भाषेसाठी प्रयत्न होत असताना मराठी भाषेच्याच बहिणी असणाऱ्या बोलीभाषांना आपुलकी भावनेने पाहणे महत्त्वाचे आहे. आपला प्रयत्न हा मराठी मुलाखातील डोंगर,दर्या,खोरे,वने आणि समुद्रांच्याही पलीकडे जगभरात पसरलेल्या अशा मायबोली  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न आहे की, एक-दोन शहरांच्या मर्यादित प्रमाण मराठी भाषेसाठी असाही प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.

सैराट चित्रपटाच्या यशामागील अनेक कारणांपैकी एक म्हणजे चित्रपटातील भाषा.सैराट चित्रपट हा बोली भाषेचाही एक प्रकारचा बॅकलॉक होता तसा बॅकलॉग एका चित्रपटाने भरून निघणार नाहीच.

 मुंबई-पुण्यातील प्रमाण मराठी भाषेच्या जवळच्या असणार्‍या भाषाखेरीज इतर प्रमुख बोलीभाषांना कधीही मराठी चित्रपट सृष्टीत स्थान देण्यात आले नाही. आपल्या  देशात एक सर्वात जुनी असणारी एक भाषा जेव्हा फक्त एका विशिष्ट वर्गाला (जातीला) शिकण्याचा अधिकार असतो त्या वेळेला ती भाषा आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक घटकांचं संक्रमण थांबण्याचा धोका देखील असतो. स्वतःची भाषा संकुचित ठेवणाऱ्या संस्कृतीचा इतिहास कितीही दैदिप्यमान सांगितला गेला तरी त्याचं वर्तमान आणि भविष्य समाजातील सर्व घटकांना सोबत घेतल्याशिवाय वैभवशाली होऊ शकत नाही हे आपण समजून घेणे महत्वाचे आहे. 

इंग्रजांनी कधीही इंग्रजी आपल्या पुरता मर्यादित न ठेवता त्या भाषेतून व्यवहार करणे, ज्ञान देणे जगभरात सुरू ठेवलं इतर भाषेतील शब्दांना देखील आपलंसं केलं त्यातून आपल्या इंग्रजी भाषेतील शब्द भरणा वाढवला म्हणून आज आंतरराष्ट्रीय भाषा असणारी इंग्रजी जगातील एक महत्वाची भाषा बनली आहे.-✍️ shaileshshirsath.blogspot









 मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मिलन चित्रपटातील या गाण्याचा आनंद घ्या Thanks to Supergane YouTube Channel

Friday, 17 February 2023

श्रेष्ठत्वाच्या जाती अभिमानात जातीअंत केवळ दिवास्वप्न तर नाही ना ?

या देशात जसे जोडणारे जाणते राजे झाले तसे फोडा व राज्य करा या तत्वाने काही राज्यकर्तेही झाले.. अनेक जुलमी राजवटींनी लोकांना गटातटात फोडून राज्य केले, म्हणजेच फोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबले. फोडा आणि राज्य करा या तत्त्वासाठी सध्या फोडण्याचीही गरज नाही आपण जाती धर्मात (सध्या लीगमध्ये) आधीच फुटलो आहोत शेवटी या देशातून जात जात नाही हेच खरं आणि म्हणूनच प्रत्येक राजवट आपल्याला गृहीत धरते अन हवं तसं राज्य करते. लोक म्हणतात राजकारणाने खेळ मांडलाय असे असले तरी द्रोणाचार्यांच्या नावाने पुरस्कार देणाऱ्या एकलव्यांच्या देशात खेळाने राजकारण मांडल नाही ना ? हे देखिल पाहिले पाहिजे.
जातीअंताचा लढा हा जातींचा नाही तर जातींपलीकडे मानवी मूल्यांचा लढा आहे.
श्रेष्ठत्वाच्या, जाती-अभिमानाच्या विळख्यात जाणत्या राजाच्या देशातील जनतेने अजाणतेपणे वागू नये म्हणून जाणीवपूर्वक...(जातीअंताच्या लढ्याबाबत मनातलं. माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...✍️ शैलेश शिरसाठ.)  shaileshshirsath.blogspot.com




Monday, 13 February 2023

विद्यार्थ्यांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचं काय ?

शेगावीचे गजानन महाराज यांच्या बाबतीत मनात अपार निष्ठा आणि श्रद्धा असणारे विद्यार्थी आणि इतर भक्त लोकही शाळा महाविद्यालयात आहेत परंतु शाळेत जेव्हा तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घ्यावा लागला त्यावेळेला त्यांचा गोंधळ उडाला. शेगावीचे गजानन महाराज हे चिलीम ओढतांनाची मनमोहक प्रतिमा त्यांनी लहानपणापासून पाहिली आहे शाळेत आल्यावर तंबाखूमुक्त शाळा अभियानात मात्र तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना शिकायला, समजून घ्यायला मिळाले. 

 शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनासह धुम्रपानाचे दुष्परिणाम समजून घ्यावे की,आपल्या समाजाची, पालकांची आई-वडिलांची अपार श्रद्धा असणाऱ्या चिलीम ओढणाऱ्या गजानन महाराजांचा आदर्श घ्यावा या संदर्भात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला कारण शाळेतील सुविचारांचा फळा गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छाही देतो आणि धूम्रपानमुक्त जीवनाचा संकल्पही...

माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायरीतून..✍️ shaileshshirsath.blogspot.com

Tuesday, 31 January 2023

We Smart या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांतर्गत २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ७ वी ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला Money PlanT उपक्रम.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात फक्त शालेय अभ्यासक्रमाच्याच विषयास आपण खूप सारे महत्त्व देतो. विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ उद्याचे नागरिक अशी संबोधने आपण लावतो. कोणत्याही राष्ट्राच्या विकासात महत्त्वाचा घटक असतो त्या राष्ट्राचा सर्व समावेशक आर्थिक विकास. राष्ट्राच्या आर्थिक विकासास असाधारण महत्त्व असल्याने त्या राष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आर्थिक बचत तसेच आर्थिक बाबीं संदर्भात ज्ञान गुंतवणुकीचे महत्त्व त्यासाठी लागणारे आर्थिक नियोजन इत्यादीचे ज्ञान आवश्यक आहे शालेय विद्यार्थ्यांना या संदर्भात ज्ञान असावे या व्यापक व सकारात्मक उद्देशाने वई स्मार्ट व्यक्तिमत्त्व उपक्रमात सन २००९-१० या वर्षा पासून इयत्ता ७ वी ८ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी Money PlanT या शैक्षणिक उपक्रमाचा अंतर्भाव केलेला आहे. प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांनी कुठल्याही आर्थिक व्यवहाराचा विचार करणे अपेक्षित नसते तर हसत खेळत शिक्षण घेणे ज्ञानार्जन करणे अपेक्षित असते परंतु माध्यमिक शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारिक कौशल्य प्रदान केल्यास ते या जागतिकीकरणाच्या युगात पैशांचा योग्य तऱ्हेने वापर करू शकते यात शंकाच नाही. शैलेश शिरसाठ. संस्थापक वुई स्मार्ट Money PlanT उपक्रम.

Saturday, 7 January 2023

'उरलं सुरलं' च्या निमित्ताने आयुष्याच्या संध्याकाळी स्नेहीजनांच्या भेटीचा आनंद.

आयुष्य हे क्षणभंगुर आहे असा पण बऱ्याचदा ऐकतो आणि अनुभवतो देखील.आपल्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर होत जातात, बदल होत जातात. बदल हा जीवनातील महत्त्वाचा भाग असला तरी आपल्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी जवळीक असणारे अनेक लोक आज शिक्षण,नोकरी, व्यवसायामुळे एकमेकांपासून दूर राहत असले तरी स्नेह आणि जिव्हाळा आजही कायम आहे.अशा स्नेहाच्या, जिव्हाळ्याच्या माणसांना भेटण्याचा आनंद आई बाबांना दिला.फार वर्षांपूर्वीच्या मैत्रीला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न उरलं सुरलं च्या निमित्ताने केला.बराच वर्षानंतर आपला मित्र भेटतोय याचा आनंद मी माझे वडील आणि त्यांच्या मित्रांच्या डोळ्यात बघितला.आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा भेट होईल की नाही,की ही शेवटची भेट आहे या विचाराने बाबा भावुक झाले होत. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या खालील ओळी यानिमित्ताने आठवल्या त्यात ते म्हणतात "कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले । आयुष्याच्या संध्याकाळी दोन मित्रांची भेट घडवुन आणण्याचा आनंद आणि समाधान 'उरलं सुरलं' च्या निमित्ताने सध्या घेतोय."✍️ शैलेश शिरसाठ.








Saturday, 31 December 2022

प्रति.
मुख्याध्यापक /प्रभारी मुख्याध्यापक/ सेवा जेष्ठ,वरिष्ठ शिक्षक.
हल्ली एका वर्गात साधारणता दोन ते तीन प्रकारे अध्ययन स्तर असणारे विद्यार्थी असतात त्यामुळे एका वर्गात तीन स्तरावर वेगवेगळे प्रकारचे अध्ययन अध्यापन करावे लागत आहे. एका वर्गातील सर्वच विद्यार्थी एकच प्रकारच्या अध्ययन स्तरावर नसतात म्हणजे सारखेच अध्ययन कौशल्य अवगत झालेले नसतात. अशा वेळेला एका शिक्षकाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावे लागतात,ते वेळ आणि श्रम खाणारे तर आहेच पण बर्‍याचदा वेळेला तुलनेनं अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन कौशल्य अवगत असणारे या अध्ययन प्रकारात हुशार असणार्‍या मुलांवर अन्याय करणारेही होऊ शकते. त्यात विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance असे असते.
शाळेत इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी अर्थात संपूर्ण शाळेसाठी . विशेष अध्ययन अध्यापन वर्ग चालवताना सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांचे वर्गीकरण Basic, intermediate and advance अशा विशेष अध्ययन कक्षात (वर्गात) केल्यास अधिक परिणामकारकरीत्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना अध्ययनाचा तसेच त्यांच्या अध्ययन स्तरावरील योग्य अनुभव घेता येईल.
अध्ययन अध्यापनाची परिणामकारकता आणि गुणवत्ता सुधारेल शिवाय सर्वांचाच वेळ वाचेल आणि श्रमही वाचतील . म्हणजे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गात अक्षर आणि शब्द ओळख सराव करून देत असताना तुलनेनं अधिक चांगलं समज पूर्वक आणि अस्खलित वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असणार तेच ते पुन्हा पुन्हा न शिकता त्यांच्याप्रमाणे क्षमता प्राप्त असणाऱ्या इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांसह सहभागी होता येईल. आणि त्या advance गटासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात पुढील advance भाग शिकता येईल.
शाळेतील सर्व घटकांच्या एकमेकांना सहकार्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे हे सहज शक्य होईल. हा विषय पूर्वी देखील चर्चिला गेला आहे. ६ मार्च २०२२ रोजी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ देखील सर्वांसमोर दिला होता परंतु यावर अद्याप आपल्या शालेय स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो नाही म्हणून स्मरणासाठी हा पत्र प्रपंच

Saturday, 12 November 2022

ग्रामदेवतेच्या कोला उत्सवातील लोककलेच्या माध्यमातून आदिवासींच्या जंगल-जमिनीवर निसर्गदत्त अधिकाराचा दैवी आगाज म्हणजे 'कांतारा' चित्रपट.

नैसर्गिक साधन संपत्ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी नाही अगदी राजा आणि जमीनदार बनलेला त्याचा वंशज असला तरी. 'भुता कोला' या प्राचीन मूलनिवासी सांस्कृतिक प्रतीकाच्या माध्यमातून मानवाच निसर्गाशी असलेल नातं सांगणारा चित्रपट म्हणजे 'कांतारा' अर्थात रहस्यमयी जंगल. निसर्गाचाच एक घटक असणारा मानव आणि निसर्ग यांच्यातील निस्सीम प्रामाणिक नातं हे शाश्वत असून ज्यावेळी माणूस निसर्गाशी अप्रमणिक स्वार्थी होतो त्या वेळेला तो विनाशाकडे जातो हे सांगणारा चित्रपट. चित्रपटातील ग्रामदेवता ही शेकडो वर्षापासून गावाचे रक्षण करत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे कोला उत्सवातील लोककलेच्या माध्यमातून गावातील लोक या ग्रामदेवतेची सेवा करतात. ग्रामदेवतेची सेवा करणारा सेवक विशिष्ट वेशभूषा धारण करून नृत्य सादर करतो यादरम्यान काही काळ त्याच्यात देवाचा वास असतो. गावावर व गावाच्या भोवताली जंगलावर वनविभाग आणि जमीनदार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दावा करताना दिसतात. चित्रपटातील कथानक गावकऱ्यांचे रक्षण करणारी ग्रामदेवता मूलनिवासी आदिवासी, जंगल-जमीन,वनविभाग आणि जमीनदार यांच्या भोवती फिरते. चित्रपट हे देखील स्पष्ट करतो की मूलनिवासी असणारे आदिवासी आणि जंगल हे नैसर्गिकरित्या परस्पर पूरक आहेत नैसर्गिक साधनसामग्रीचाा एका मर्यादेत किंबहुना जगण्यापुरता उपभोग घेणारे आदिवासी यांचा जंगलातील जमिनीवर नैसर्गिक अधिकार आहे. मूलनिवासी आणि मुलनिवासींपेक्षा स्वतःला वेगळे समजणारे चाणाक्ष परंतु कुबुद्धी असणारी विशिष्ट साम्राज्यवादी प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष देखील या निमित्ताने समोर येतो. चित्रपटात सातत्याने मास मच्छी खाणारा आणि सतत दारू पिणारा नायक आणि त्याचे मित्र पचवणं सामान्यतः प्रेक्षकांना थोड जड जाऊ शकत परंतु कोणताही प्रकारे हिंसक न होता अन्याय अत्याचार किंवा बळजबरी ते करत नाहीत. मद्यप्राशन खाणपिणं आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा उपभोग घेणे हे खूप नैसर्गिक आणि सर्वसाधारण असल्याचं नायकाचा गट दाखवतो.(हे पहात असताना प्राणी जीवनसृष्टीतील अन्न आणि संभोग या प्रथमतः मूलभूत आणि महत्त्वाच्या गरजा असाव्यात का ? असा प्रश्न पडतो.) राजाचा वंशज असणारा जमीनदार मात्र संपूर्ण जंगलाची जमीन स्वतःच्या नावावर करण्याच्या स्वार्थी हेतूने नायक आणि त्याच्या गटाच त्याच्या लेखी असलेलं उपद्रमूल्य लक्षात घेता त्यांचा खाण्यापिण्याची काळजी घेतो आणि त्यांना ते पुरवतो. आदिवासींच्या असलेल्या परंपरा,जीवन पद्धती आणि जंगलावरील त्यांचा अधिकार असला तरी जमीनदाराला तो निसर्गदत्त न वाटता उपद्रवच वाटतो. जंगलातील सर्वसामान्य लोकांची त्याच्यावरची निष्ठा कायम राहावी म्हणून सतत काही ना काही भेट वस्तू देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सर्वसामान्य साध्या भोळ्या आदिवासींना जमीनदाराचा कावेबाजपणाा उशिरा लक्षात येतो. संपूर्ण चित्रपटाच गमक चित्रपटाच्या शेवटात आहे शेवट अप्रतिम असून सर्व मानवाने (सामाजिक,राजकीय,प्रशासकीय यंत्रणेनेसह) एकत्र येऊन निसर्गाशी असलेले नाळ अधिक घट्ट बांधावी आणि मोठ्या गुण्यागोविंदाने राहावं असा संदेश स्वतः परमेश्वर ( निसर्ग ) सांगताना दिसतो
. स्वतःच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात नायकाची मध्यवर्ती भूमिका साकारणारा वृषभ शेट्टी हा खऱ्या अर्थाने या अप्रतिम कलाकृतीचा नायकच आहे. प्राचीन मूलनिवासी संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा अप्रतिम मांडल्याबद्दल वृषभ शेट्टी आणि टीमच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.  (या संपूर्ण ब्लॉग लिखाणा दरम्यान मी मूळ निवासी आदिवासी हा उल्लेख वारंवार केलेला आहे. कारण काही प्रेक्षकांना चित्रपटातून दाखवलेली रूढी परंपरा त्यांच्या रूढी परंपरांशी मेळ नसणारी वाटू शकेल.)✍️ शैलेशकमल   shaileshshirsath.blogspot.com