Sunday, 10 October 2021

सुनेने सासू-सासर्‍यांची सेवा केली पाहिजे असा विचार असणाऱ्या देशात पत्नीच्या आई-वडिलांची सेवा करणारे जावई निर्माण होऊ दे ग माता....✍️

 प्रिय नातवंडांनो.

सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

 विशेषतः माझ्या नातूंसाठी...

तुमची पत्नी ज्या पद्धतीने तुमच्या आई-वडिलांची म्हणजेच तिच्या सासू-सासर्‍यांची काळजी घेते आणि त्यांची सेवा करते त्याच पद्धतीने तुम्ही देखील जावई म्हणून तुमच्या सासू-सासर्‍यांची सेवा करता का ? आणि तुमचं लग्न अजून व्हायचं असेल तर भविष्यात फक्त जावई म्हणून नाही तर मुलगा समजूनच सेवा करणार का ? कारण समाजात अशी  उदाहरणे देखील आहेतच. मुलगी दिली तिकडे गेली असं म्हणून भागणार नाही किंवा आम्ही मुलीच्या घरचे पाणीही घेत नाही जर मुलाच्या घरी तुम्ही सहज वावरू शकता पाणी पिऊ शकतात तर मुलीच्या घरी का नाही? आधुनिक काळात असा भेदभाव बाजूला ठेवावा लागेल, त्याची सुरुवात तर खऱ्या अर्थाने जर मुलाचे कन्यादान करत नाही तर मुलीचे का करावे या मूलभूत समतावादी प्रश्नापासून करायला पाहिजे. दान करण्यासारखी एखादी वस्तू म्हणून आपल्या पोटची मुलगी कशी असू शकते? खरंतर तिला आपण दोन कुळांचा उद्धार करणारी माताच समजतो. मुलींची संख्या झपाट्याने कमी होत असताना आता हा भेदभाव नकोच.

कोरोनाच्या सावटाखाली असताना मी हे पत्र तुमच्यासाठी मुद्दामहून लिहीत आहे  या महामारीत प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असताना कुटुंबीयांच्या काळजीने देखील व्यथित झाला आहे विशेषतः लहान बालके आणि कुटुंबातील वयोवृद्धाबाबत.

उतार वयात आई-वडिलांची सेवा करावी अशा संस्कृतीत आपण वाढलो परंतु एखाद्या दांपत्याला फक्त मुलगीच असेल तर अशा मुलीचं लग्न झाल्यानंतर एकट्या पडलेल्या आपल्या आई-बाबांची सेवा किंवा त्यांची काळजी ती मुलगी घेऊ शकत नाही जसे मुलासोबत आई-बाबा जसे राहतात तसे मुली सोबत तिचं लग्न झाल्यावर ते राहत नाहीत अशा वेळेला मुलगा नसल्याची खंत त्या आई-वडिलांना वाटू शकते अशा वेळेला मुलगी आणि जावई यांचे नैतिक, सामाजिक कर्तव्य (आणि एक आनंद) म्हणून त्यांनी  आई-वडिलांचे काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं यासाठी तुम्ही देखील तुमच्या आई बाबांसह सासू-सासर्‍यांची देखील आई-वडिलांसारखेच काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच.मुलांच्या तुलनेत मुलींची कमी असणारी संख्या ही एक सामाजिक समस्या बनली आहे.

 लग्नात परंपरांच्या नावाखाली हुंडा तसेच लग्नानंतर देखील असणारा एकतर्फी मानपान हे मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे हे देखील आंतरराष्ट्रीय बालिका दिना निमित्ताने ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे.आपण स्वतःहून वधू माता पिता आणि वधूकडे अर्थात नवरी मुलीकडे सर्व मंडळींना तोच मान आणि सन्मान द्यायला हवा किंबहुना वर पक्षापेक्षाही अधिक मानसन्मान वधू पक्षाला द्यायला हवा हा सामाजिक बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल् लेकरू वाढवलेली मुलगी ज्यावेळेला आई वडील दुसऱ्या घरात डोळ्यात अश्रू घेऊन पाठवतात त्यावेळेला समाजाकडून त्यातही वर पक्षाकडून त्यांना अधिक धीर आणि आधार देण्याची गरज असते अशा वेळेला लग्नाच्या मानपानात वेळोवेळी वधू पक्षाला हीन आणि कमी दर्जाची वागणूक देणं ही गंभीर चूक आहे. आपल्याला आपल्या देशाच्या परंपरांचा अभिमान आहे परंतु त्याचा प्रत्यक्षात परंपरांच्या नावाखाली कोणाचा तरी दमन तर करत नाही ना याचाही समतेच्या दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे.

स्त्री भ्रूणहत्येचा विरोध करत असताना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ असं म्हणत महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असताना विविध योजनांचा फायदा हा त्या महिलेशी संबंधित तिच्या आई-वडिलांना देखील मिळाला पाहिजे आणि तिच्यावर जर सासू-सासरे अवलंबून असतील तर त्यांना देखील मिळालाच पाहिजे.

परंपरेने कुटुंब पद्धती मातृसत्ताक असो, पितृसत्ताक असो किंवा मातृ-पितृ सत्ताक असो ती भविष्यात मानवतासत्ताक देखील कायम असली पाहिजे तरच पृथ्वीवरील मानवी संस्कृतीची पायमुळं घट्ट राहतील अन्यथा आपली आठवण मानव न राहता केवळ प्राणी (जनावर) अशी राहील असे वाटते.आणखी काय लिहिणार तुम्ही साक्षर आहात आणि सुशिक्षितही. आपल्या देशात देवांप्रमाणेच देवी मातेची ही पूजाअर्चा केली जाते तेव्हा देवी मातेला सांगणे की, सुनेने सासू-सासर्‍यांची सेवा केली पाहिजे असा विचार असणाऱ्या देशात पत्नीच्या आई-वडिलांची सेवा करणारे जावई देशात निर्माण होऊ दे ग माता....✍️






6 comments:

Anonymous said...

हा लेख अगदी मनातलं जाणणारा आहे..खूप च काळजाला भिडणारा आहे.. हीच परिस्थिती आहे सगळी कडे...असा विचार सर्वांनी केला तर किती सोप्प होईल ..एका मुलीच्या मनातील इकडे आड (माहेर)तिकडे विहीर (सासर)हे वादळ च थांबेल.. तिच्यासाठी दोन्ही कुटुंब हे तराजूच्या पारड्यासारखे असतात..त्यातील कोणतंच पारड तिला खालीवर झालेला सहन होत नसतं.आजच्या काळात असा विचार मांडणे खरोखर कौतुकास्पद आहे. सुनेला जशी सासरच्या लोकांची काळजी घेताना स्वतःच्या आई-वडिलांची चिंता असते, तशीच साथ जर नवऱ्याकडून मिळाली तर दोन्हीकडची नाती अधिक घट्ट होतील. मुलगा मुलगी हा भेद कमी होईल..मुलगी दोन कुळांचा उद्धार करते असे आपण मानतो, तर मग तिच्या आई-वडिलांनाही तोच आदर आणि सेवा मिळायला हवी. मुलगा असो वा मुलगी, दोघांनीही एकमेकांच्या पालकांना स्वतःचे आई-वडील मानणे हीच खरी काळाची गरज आहे.

shaileshshirsath.blogspot.com said...

Thank 🙏

shaileshshirsath.blogspot.com said...

धन्यवाद शितल मॅम.. 🙏

... said...

सरसऱ्याच्या घरी येणाऱ्या सुनेने असे विचार मांडले तर सासऱ्याला जमेल काय? हे पण बघितले पाहिजे.

मुलगा नसणाऱ्या आई वडील यांचेसाठी फक्त मुलगी असणाऱ्या = वय झाल्यावर सांभाळावेच लागेल पण पुन्हा समाज म्हणणार प्रॉपर्टी साठी सांभाळतोय

... said...

हर महिन्याचा पगार घेणारा वर -
👉 सून म्हणून घरी आलेल्या मुलीचा हर महिन्याला पगार घेणारा वरमुलगा एकप्रकारे हुंडाच घेत आहे ना
👉 पगार न घेता सांभाळावे म्हणजे आम्हालाही समजेल

shaileshshirsath.blogspot.com said...

बरोबर आहे सर आपले पण यानिमित्ताने एक हिंदी गाना आठवलं.... कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना... छोडो इन बेकार की बातो को कही बीत न जाये रैना...