Monday, 22 January 2024

'ओळखलत का भक्तांनो मला'?
ओळखलत का भक्तांनो मला?
तुम्ही मला चार भिंतीत मातीच्या एका विशिष्ट आकारात पाहत आहात पण
मी तर पृथ्वी,जल,अग्नी,वायू,आकाश
या पंचतत्वातील कणाकणात होतो,आहे आणि सदैव राहणार,
त्या कणाकणात बघा मला...
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

 कर्णकर्कश गोंगाटात नव्हे तर
 शांत,संयमी ध्यानधारणेत अनुभवा मला
 आणि खरंच सांगा ओळखलंत का भक्तांनो मला ?
जात,धर्म,लिंग असा भेद न करता
मानवता स्थापन करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे
त्या प्रत्येक प्रयत्नात बघा मला....
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
माझ्या लेकींची धिंड पाहणाऱ्या संवेदनाहीन झुंडींचा भाग होणाऱ्यांनो,
तुम्ही मला कधी पाहणार ?
मी तर लेकींसाठी लढणाऱ्या प्रत्येक बापात आहे,
त्या लेकींच्या निष्पाप नजरेतून बघा मला.. आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

धर्मांधतेने माखलेल्या तिरस्काराच्या भिंतीवरील
रूधिरांच्या धारा पाहून आसुरी आनंद घेणाऱ्या प्रवृत्तींनो,
आसुरी,अविवेकी धर्मांधतेच्या संहारात बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
जाती धर्म आणि स्त्री पुरुष असा भेद न करता.
समतेच्या घटनेची आणि घटनेच्या समतावादी मांडणीत मी आहे,
मांडणी करणार्‍या त्या हातांमध्ये बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?

एक राजा म्हणून 'माझे प्राण आणि माझी प्रतिष्ठा' माझी जनताच आहे.
'माझ्या नावाने होणाऱ्या तुमच्या सोहळ्यात
' माझे प्राण आणि प्रतिष्ठा असणारी 'माझी शबरी आई' दिसली नाही मला ..
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
चुकीला चुकीच योग्य ला योग्य असं परखड
पद्य,गद्यातील वाणी आणि लेखणीत बघा मला आणि
खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
✍️ 'शैलेशकमल'

2 comments: