न्यूज चैनल वर महाराष्ट्र विधानसभेचा पूर्ण निकाल लागल्याच पाहिल.. मला आजीने बालपणी सांगितलेली रामायणातील गोष्ट सहजच आठवली.
आजीने सांगितलेल्या गोष्टीत माता सीतेला जंगलातील सुंदर हरणाचा मोह झाला आणि प्रभू रामचंद्रांनी सीतेमातेसाठी त्या हरणाची शिकार करण्याचे ठरवले,ते त्या हरणाच्या मागे धावले. वरून सोनेरी आणि अत्यंत मनमोहक असणारा तो हरण रावणाने मुद्दामून पाठवलेला एक मायावी राक्षस होता. जो हरण्याच्या रूपात आला होता.
साध्या भोळ्या सीतेमातेला ते कळाले नाही आणि सोनेरी वाटणाऱ्या त्या हरण्याच्या मोहात त्या पडल्या. आता त्या लक्ष्मणासह वाटिकेत होत्या परंतु नंतर लक्ष्मण देखील मोठे बंधू प्रभू श्रीराम यांच्या काळजीपोटी सीता मातेच्या आज्ञेवरून जंगलात प्रभू रामचंद्रांच्या मागे धावले अर्थात त्याआधी त्यांनी सीतामातांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेली लक्ष्मण रेषा पार न करण्या संदर्भात विनंती केली होती.साध्या भोळ्या आणि धार्मिक भक्ती भाव असणाऱ्या सीता मातेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढण्यासाठी रावणाला साधूचा वेश घ्यावा लागला. आपला धूर्त कावेबाजपणा माता सीतेच्या लक्षात येऊ नये यासाठी रावणाने साधूचा वेश घेतला. भिक्षा मागण्यासाठी आलेले साधू महाराजांचा अपमान होऊ नये आणि त्यांनी चिडून आपल्याला श्राप देऊ नये म्हणून माता सीता लक्ष्मणरेषा ओलांडून साधूच्या रूपात आलेल्या रावणाला भिक्षा द्यायला बाहेर पडल्या आणि रावणाने त्यांचे हरण केले.
आजीने सांगितलेल्या गोष्टीचा मी माझ्या लहानपणी काढलेला निष्कर्षही मला या निमित्ताने आठवला की, कुठल्याही मोहापोटी एखाद्या गोष्टीच्या मागे धावणे चुकीचेच आणि आपल्या धार्मिक भावनांचा आणि साधे भोळेपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून साधूच्या वेशात आलेल्या संधी साधू कावेबाज लोकांपासून सावध राहावे.आपल्याला साधू आणि संधी साधू यांच्यातला फरक कळायलाच हव नाहीतर आपल्याला आणी आपल्या माता भगिनींना फसवल जाऊ शकत.
आजीने सांगितल्या रामायणातील निष्कर्ष थोडक्यात असा.
१) साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांपासून सावध राहावे.
२) आमिष दाखवलं तरी अमिष दाखवणाऱ्यांच्या मोहात आपण पडू नये.
३) अति साधे आणि भोळे राहून होऊ नये नाहीतर धार्मिकतेच्या नावावर संधी साधू भीती दाखवून गैरफायदा घेतात.
No comments:
Post a Comment