शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत. कारण शिवशाही म्हणजे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.
Sunday, 18 February 2024
प्रिय नातवंडांनो...उद्या शिवजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे त्यानिमित्ताने हा पत्र प्रपंच...
भविष्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मत प्रदर्शित करणार असाल किंवा लहान मोठ्या सभेमध्ये व्याख्यान देणार असणार तर हे लक्षात ठेवा की,
शिवरायांचा लढा रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तांविरोधात होता हे मांडण्यााच भान म्हणजे 'शिव व्याख्यान'...
आणि
नफरतो के बाजार मोहब्बत की दुकान...
म्हणजे
'शिव व्याख्यान'.
या अर्थाने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात तुम्ही शिवरायांच्या मानवतावादी कल्याणकारी राज्याची भूमिका मांडली पाहिजे.
शिवरायांचा लढा कुण्या धर्माशी किंवा जातीशी नव्हताच तर शिवरायांचा लढा सर्वसामान्य कष्टकरी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तां विरुद्ध होता.
शिवरायांचा लढा हा मानव कल्याणकारी राज्यासाठी होता,ज्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी,शेत मजुर सर्वांनाच त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा,धर्म आणि जात निरपेक्ष लढा होता.
इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे
लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या. म्हणून शिवरायांचा वकील जन्मानं मुस्लिम असणारा काझी हैदर होता आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता,ज्याने अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर तलवारीने हल्ला केला होता.त्याचवेळेस जीवा महालाने अफजलखानाचे सहकारी सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा देखील वध केला.औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यशाहीकडून लढणारा औरंगजेबाचा सर्वात महत्त्वाचा साथीदार मिर्झाराजा जयसिंग होता.
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या नौसेनेतील प्रमुख सैनिक अधिकारी सिद्धी संभल,सिद्धी इब्राहीम (आरमार प्रमुख) मुस्लिम होते.शिवरायांचे चित्र सर्वप्रथम मीर मोहम्मद या चित्रकाराने काढले शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आणि गायला तर दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख या मुस्लिम शिवशाहीराने गायला.
शिवरायांचा तोफखाना सांभाळणारा शिवरायांवर जीवापाड प्रेम करणार त्यांचा सहकारी इब्राहिम खान होता जो बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे यांच्या सारखा स्वराज्यासाठी प्राणप्रणाने लढत होता.
अठरापगड जातींना सोबत घेणारे शिवराय जात-पात धर्म असा भेद मानत नव्हते म्हणूनच त्यांच्या अंगरक्षकांमध्ये येसाजी कंक,कोंडाजी कंक, संभाजी कावजी,काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड,सुरज कांडके, जीवा महाला,विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम देखील होता.
शिवरायांचा पहिला सरनौबत नुरखान बेग हा होता. शिवरायांना अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे अशी खबर देणारा आणि
शिवराय अफजल खानाला भेटीला जाणार म्हणून सतत काळजी करणारा,शिवरायांना वाघनखे बनवून देणारा रुस्तुमे जमान या धर्मानं मुस्लिम असणाऱ्या शिवरायांच्या मित्राला विसरून कसे चालेल? पन्हाळगडावरील सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांना विशालगडाकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी शिवा काशिद ने आपले बलिदान दिले.हुबेहूब शिवाजी महाराजां सारखाच दिसणारा शिवा काशिद न्हावी होता. आपण मेलो तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा असणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे म्हणून त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली.
शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि सचिव हैदर अली होते. आग्र्याहून सुटकेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून "राजे आम्ही मेलो तरी चालेल पण स्वराज्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात"असं म्हणणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे.
शिवरायांच्या सैन्यात सातशे मुस्लिम पठाण होते. शिवरायांचे दुसरे गुरु सुफी संत याकूब बाबा होते.
शिवरायांनी आपल्या सैन्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या आज्ञापत्रातून केल्या होत्या जसे की मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या कडेकडेने जावे उभ्या पिकांमधून जाऊ नये.असे कुठलेही कृत्य करू नये की ज्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतीमालाचे नुकसान होईल.
शिवराय आपल्या आज्ञापत्रात म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील स्पर्श करू नये. कुठल्याही जाती धर्माचे असो त्या सर्व महिला,लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.
या खेरीज शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रातून आपल्या सैनिकांना हेही सांगितले की कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम बांधवांकडे सुपूर्त करावी तिचा अवमान करू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्वप्रथम साजरा करणारे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांचा उल्लेख कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असा अगदी यथार्थ करतात.
रयतेचे जाणते राजे शिवराय हे छत्रपती झाले कारण स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर,कोंडाजी फर्जंद,सूर्यराव काकडे, कान्होजी जेधे,फिरंगोजी नरसाळा, रामजी पांगेरा, हिरोजी इंदुलकर,दौलत खान,वेंटाजी भाटकर, मायनाक भंडारी,तुळाजी आंग्रे, सिद्धी मिस्त्री कान्होजी आंग्रे अजिंक्यतारा झुंजणारे प्रयागजी प्रभू बाजी पासलकर मुरारबाजी नेताजी पालकर आणखी असंख्य अशा लढवय्या मराठ्यांची साथ होती.(या ठिकाणी मराठा जात नाही तर समूह किंवा मराठा समाज ज्यात असंख्य मराठी अमराठी जाती आहेत या अर्थाने)
एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण समाजात विविध धार्मिक आणि
जातीय बाबींमुळे तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अफवांवर आपण
विश्वास ठेवायला नको कारण अनेकदा सत्तेच्या लढायांना धर्माच्या लढाया दाखवून
वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे
लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी
होत्या.
थोडक्यात देशात शांततामय,बंधूभावाचे, सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी आपण
सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समाज माध्यमांचीही मोठी
जबाबदारी आहेच. अर्थात या ठिकाणी समाज माध्यम म्हणजे ती तांत्रिक उपकरणे नव्हे , तर
अशी तांत्रिक उपकरणे हाताळणारी 'हातं' या अर्थाने आहे. जबाबदार नागरिक आणि समाज
शिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य द्यावे, त्याची गरज सर्वाधिक आहे.
बाकी इतर सारांश पुढील पत्रात मांडणारच आहे तोपर्यंत हे विसरू नका आपलं समाजाशी एकमेकांशी असलेलं नातं हे आई आणि लेकराच्या नात्यासारखं पवित्र असू द्या आणि म्हणूनच त्यासाठी हे सांगावेसे वाटते की, तुमचं आमचं नातं काय..?🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩
तुमचा आजोबा
शैलेश✍️
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment