मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात.
"धर्म ही अफूची गोळी आहे" असं सांगणाऱ्या जगप्रसिद्ध विचारवंत,तत्त्वज्ञ, लेखक, सामाजिक सिद्धांतकार आणि अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्सची आठवण व्हावी असे प्रसंग सातत्याने घडत असतातच. दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करणे, आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांच्या घरांवर दगडफेक करणे, लहान बालकांचा अधिकार नाकारणे हा कुठल्या धर्माचा भाग असू शकतो? खरं पाहता असे वागणे हाच मुळी एक अधर्म आहे ,जो देवालाही कदापि मान्य होऊ शकत नाही. सदर लेख हा ब्रेन वॉश करण्यासाठी नसून मुळातच ब्रेन असण्याची किंवा नसण्याची मीमांसा करणारा आहे...
माझ्या 'अस्वस्थ जगण्याच्या डायरी'तून...
मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस हव्यात. कारण मैदानी खेळ हे आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.नैसर्गिक संकटात,आपत्कालीन परिस्थितीत ओपन स्पेस मोकळ्या असल्यास उपयोगी ठरतात. याखेरीज ओपन स्पेस आणि मोफत खेळाच्या मैदानांचा उपयोग मुलांच्या शारीरिक,बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे, अन्यथा ही मुलं चौका चौकातील कट्ट्यांवर टवाळक्या करताना दिसू शकतात किंवा मोबाईल मध्ये आर्थिक आमिष दाखवणारे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यास बाधक खेळ खेळू शकतात.
ओपन स्पेसचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकासाठी एक बाग म्हणून आणि मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण म्हणून असले पाहिजे कारण खाजगी जागेत क्वचितच कोणी मुलांना मोफत खेळू देईल,काही ठिकाणी तासांवर पैसे देऊन खेळण्याची सोय आहे असे असले तरी मुलांच्या खेळण्याच्या हक्काच्या जागेवर जर इतर कुठलाही प्रकारच काही उभारल जात असेल तर मग मुलांनी कुठे खेळायला जावे? कारण खिशात पैसे नसताना देखील मैदानावर घाम गाळता आला पाहिजे म्हणजे शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मैदानावरील सांघिक खेळामुळे संघभावनाही वाढीस लागेल.तुमच्या परिसरातील ओपन स्पेस फक्त मुलांना खेळण्यासाठी आणि गरज़ वाटल्यास शांतपणे अभ्यासासाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत का ?
- शैलेश शिरसाठ.
No comments:
Post a Comment