आज पुन्हा चेंगराचेंगरीची बातमी वृत्तपत्रात वाचली. आणि पुन्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्या आठवल्या.
उपकारासाटी बोलो हे उपाय | येणेविण काय आम्हा चाड ? ||१||
बुडता हे जन न देखवे डोळां | येतो कळवळा म्हणउनि ||२||
तुका म्हणे माझे देखतिल डोळे | भोग देते वेळे येईल कळो ||३||
वारकरी संप्रदायातील संतांनी जनकल्याणाच्या उद्देशाने कार्य केले आहे संत तुकोबा राय हे यास अपवाद नाहीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले सर्व अभंग लोकशिक्षणासाठी अत्यंत उपयोगी आहे. ज्यांचे महत्त्व आजही आहे आणि उद्याही राहणार.
तुकोबाराय आपल्या अभंगातून म्हणतात की मी जे काही सांगतोय ते अभंगाच्या कीर्तनाच्या माध्यमातून जो उद्देश करतोय जे मार्गदर्शन करतोय ते सर्वांच्या कल्याणासाठी आहे ते तसे नसते तर मला किर्तन,अभंग,कथा यातून तुम्हाला उपदेश करण्याची गरज काय होती.संत तुकाराम महाराज हेही सांगतात की अज्ञानामुळे,अंधश्रद्धेमुळे हे जग बुडत आहे म्हणजेच वाईट मार्गाकडे वाटचाल करत आहे.नको त्या मार्गाने हे जग, लोक वाटचाल करत आहे आणि हे सारं मला पहावत नाही माझ्या डोळ्याला बघवत नाही म्हणून मला या लोकांचा कळवळा येतो.
अभंगाच्या शेवटच्या कडव्यात तुकोबाराय उद्वेगाने म्हणतात की जर तुम्ही माझे बोलणे मनावर नाही घेतले आणि मी सांगितलेला संदेश आचरणात नाही आणला तर माझ्या डोळ्यात देखत तुम्हाला तुमच्या चुकीच्या कृत्यांचे तुमच्या करणीचे पापाचे भोग भोगावे लागतील तुकोबारायांनी जनकल्याणासाठी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी,विज्ञानवाद, प्रयत्नवाद रुजवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या प्रचार, प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले होते त्यांच्या कार्याचा उद्देश देखील या अभंगातून स्पष्ट होतो.
ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळा असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी उत्कट इच्छा असते, ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवितात. असं करण्यामागं त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ करुणेपोटीच लोकांना उपदेश करत असतात. अशा प्रकारच्या उपदेशाविषयी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले आहेत.
No comments:
Post a Comment