Tuesday, 17 June 2025

हेडमास्तरास पत्र.

 हेडमास्तरास पत्र. 

महोदय, उद्या तहसील कार्यालयात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO)यांची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे आणि मी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) देखील असल्यामुळे,  मी किमान पहिल्या सत्रात तरी शाळेत उपस्थित राहू शकणार नाही.

उद्या मला भेटण्यासाठी काही पालक येतील. जे पालक मला उद्या भेटण्यासाठी येणार आहेत ते पालक त्यांच्या मुलांना आपल्या शाळेऐवजी पूर्ण वेळ केवळ अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या  खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांच्या मुलांची नाव दाखल करणार होती.त्या पालकांना हे सांगा की,आमच्या शाळेतील शिक्षक खूप हुशार, मेरिट चे विद्यार्थी आहेत आणि कामात प्रामाणिक असल्यामुळे, दिलेली जबाबदारी नेहमीच व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे त्यांच्यावर  इतर कामांची देखील जबाबदारी सोपविली आहे.अशी जबाबदारी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या किंवा सीबीएससी खाजगी शाळेतील शिक्षकांना दिली जात नाही. आमच्या शाळेतील शिक्षकाला अशा अशैक्षणिक परंतु महत्त्वाच्या कामांची जबाबदारी लाभली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसा तो पालक म्हणून तुम्ही देखील बाळगावा म्हणजे तुम्हालाही कमी त्रास होईल.

 आपण इंग्रजी विषयासाठी सुरू केलेला phonic drill या इतर इंग्रजी माध्यमातील शाळांपेक्षा वेगळा आणि अभिनव उपक्रम सुरू केला असून तुम्हाला शक्य झाल्यास आपल्या उपक्रमाबद्दल सांगा तसेच भाषा अध्यापनातील फोनिक ड्रिल चे महत्व देखील स्पष्ट करा,बाकी मी आल्यावर आणि मला वेळ मिळेल तशी माहिती देईलच.

दादा,जसे की आपल्याला ज्ञात आहे आज आपण 'Body body pop pop' या इंग्रजी राइम्सचा कृतीयुक्त सराव मोठ्या आनंदाने घेतला तीच राईम्स उद्या पुन्हा विद्यार्थ्यांसोबत नाचून गाऊन सराव करणार होतो.शक्य झाल्यास विद्यार्थ्यांना  सांगा की,"आपल्या राइम्सचा अधिक सराव आज होऊ शकणार नाही" अशी खंत करण्यापेक्षा "आपले शिक्षक राष्ट्रीय कामात आहेत" असा अभिमान बाळगा म्हणावं. 

आज विद्यार्थ्यांसोबत 'डोंगराला आग लागली पळा पळा' खेळलो आणि स्टॅच्यूही झालो. उद्या दुपारी धावत पळत आलो तर पुन्हा डोंगराला आग लागली खेळ खेळू म्हणावं... मी एका एका होळीत किती किती माणसं ? हा खेळ खेळता खेळता एका एका माणसाकडे किती किती होळ्या ! हा नवीन खेळ देखील शिकलो आहे,तोही यथावकाश मुलांना शिकवणार आहे.

मतदान यादी संदर्भात शाळेत मला कुणी मतदार राजा भेटण्यास आल्यास त्याला माझ्यातर्फे हे आवर्जून सांगा की आज ऐवजी सर उद्या भेटतील आणि सरांना भेटायचे असल्यास सर शिकवत असताना भेटण्याऐवजी मधल्या सुट्टीत जेवणाच्या वेळी सरांना भेटा, यामुळे सरांचे जेवण नाही झाले तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनात अडथडा होणार नाही.

उद्या थोडी धावपळ होईल पण काळजी करू नका मी डोक्यात खूप विचार न ठेवता नियंत्रित वेगात गाडी चालवेल आणि सुरक्षित प्रवास करण्याचा प्रयत्न करेल. 

आपलाही 

XYZ (उपशिक्षक /सुलभक /बीएलओ/ सर्वेक्षक, इत्यादी इत्यादी)

'माझ्या अस्वस्थ जगण्याच्या डायर'तून....✍️






No comments:

Post a Comment